महिलांसाठी का नाही 'एक चावट संध्याकाळ'? - Marathi News 24taas.com

महिलांसाठी का नाही 'एक चावट संध्याकाळ'?

www.24taas.com, मुंबई
 
'एक चावट संध्याकाळ' या प्रौढ पुरूषांच्या नाटकाला महिलांना बंदी घातल्याने चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. स्त्री - पुरूष लिंगभेद केला जात आहे. असा एका सेनेच्या नगरसेविकेने आरोप केला आहे. या नाटकास महिलांना प्रवेश का नाही, असा मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेच्या एका महिला नगरसेविकेने आक्षेप घेतल्याने पालिकेनेही तत्परतेने या नाटकाच्या प्रदर्शनासाठी आपल्या नाटय़गृहांची दारे बंद करून टाकली आहेत.
 
वाढत्या वयाबरोबर पुरुषांच्या गप्पांमध्ये काही विशिष्ट शब्द येऊ लागतात. तसेच फक्त पुरुषांच्या पाटर्य़ामध्ये अनेक चावट विनोदांची देवाणघेवाण होते, शिव्यांची रसवंतीही सुरू असते. याच विषयावर अशोक पाटोळे यांनी ‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक लिहिले आहे. ‘चावट जोक्स आणि शिवराळ विनोद यांची मानसिक, शारीरिक आणि सामाजिक गरज’ या विषयावर एका महिलेला पीएच्. डी. करायची आहे. तिला मदत करण्यासाठी एक प्राध्यापक आणि एक सेक्सॉलॉजिस्ट एका संध्याकाळी भेटतात.
 
त्यांच्यातल्या गप्पा, हा या नाटकाचा विषय आहे. या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिरमध्ये पाहण्यासाठी गेलेल्या एका महिलेला, हे नाटक फक्त ‘प्रौढ पुरुषां’साठी असल्याने, अटकाव करण्यात आला. या महिलेने हे शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या कानावर घातले. महापालिकेच्या नाटय़गृहांमध्ये अशा प्रकारे लिंगभेद करून प्रवेश नाकारणे योग्य नाही, असा हरकतीचा मुद्दा शीतल म्हात्रे यांनी पालिकेच्या महासभेत मांडला. या मुद्दय़ाची दखल घेत महापालिकेने आपल्या नाटय़गृहांमध्ये या नाटकाचे प्रयोग करण्यावर बंदी घातली. मात्र, आपण नाटकाचे पहिले २५ प्रयोग केवळ ‘प्रौढ पुरुषां’साठी करण्याचे निश्चित केले होते.
 
त्यानंतरचे प्रयोग आपण प्रौढ महिलांसाठीही खुले करणार होतो. या नाटकाचा विषय आणि भाषा ही महिलांसमोर ऐकताना किंवा बोलताना पुरुषांना कितपत मोकळीक वाटेल, याबाबत आपण साशंक होतो. त्यामुळे पहिले काही प्रयोग आपण प्रौढ पुरुषांनाच प्रवेश दिला होता. मात्र आता आपण खास प्रौढ स्त्रियांसाठी एक प्रयोग आयोजित करणार असून त्याला खुद्द स्मिता तळवलकर हजेरी लावणार आहेत, असे पाटोळे यांनी सांगितले.
 
 
 
 

First Published: Thursday, August 9, 2012, 01:20


comments powered by Disqus