बॅंकेत १०,५०० जॉब, चला लागा कामाला - Marathi News 24taas.com

बॅंकेत १०,५०० जॉब, चला लागा कामाला

www.24taas.com, भोपाळ
 
आज काल नोकरी मिळणे कठीण आहेच आणि मिळाली तर ती टिकविणे महाकठीण. आर्थिक मंदीचे कारण देऊन कामावरून कमी केले जाते. मात्र, चांगली आणि भरोशाची संधी असेल तर ती बॅंकेत आणि हि बॅंक राष्ट्रीयकृत असेल तर, सोन्याहून पिवळे. मित्रानो चांगल्या जॉबच्या विचारात असाल तर आतापासून कामाला लागा. स्टेट बँकेत मेगाभरती आहे.
 
स्टेट बँकेतर्फे वर्षभरात तब्बल १0,५00 कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. यापैकी ९,५00 जागा लिपिकांच्या असतील, तर १000 जागा प्रोबेशनरी अधिकार्‍यांच्या असतील, असे एसबीआयचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी येथे सांगितले.
 
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात कर्मचार्‍यांची संख्या ७,४५२ ने कमी झाली आहे. ३१ मार्च २0१२ पर्यंत बँकेतील कायम कर्मचार्‍यांची एकूण संख्या २,१५,४८१ आहे. त्यात ९५,७१५ लिपिक असून ८0,४0४ अधिकारी आहेत. उर्वरित ३९,३६२ उपकर्मचारी आहेत. २0११-१२ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा निव्वळ नफा ४२ टक्के वाढला असून, एकूण नफा ११,७0७ कोटी रुपये झाला आहे.
 
देशातील कॉर्पोरेट क्षेत्रातील हा सर्वाधिक नफा आहे. वाहन, गृहकर्जाच्या क्षेत्रात स्टेट बँक आघाडीवर असून, बँकेच्या रिटेल क्षेत्रात १0.९ टक्के वाढ झाली आहे. ३१ मार्च २0१२ पर्यंत ही वाढ १,८२,४२७ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
 
नोकरीसाठी काय कराल..
बँक परीक्षेसाठी लागणाऱ्या गोष्टींची माहिती करून घ्या
परीक्षा कशी असते. परीक्षेचे स्वरूप समजवून घ्या.
बँकेच्या शाखेतून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा.
परीक्षेची तयारी आणि अभ्यासावर भर द्या.
आपले सामान्य ज्ञान वाढवा (जनरल नॉलेज)
अंकगणित, तर्कशास्त्र, सामान्य इंग्रजी, सामान्य ज्ञान, संगणक आणि मार्केटिंग या विषयांचा अभ्यास करा.
http://www.sbi.co.in/ येथे  बँकेची माहिती जाणून घ्या.
 

First Published: Wednesday, June 27, 2012, 09:06


comments powered by Disqus