Last Updated: Thursday, April 19, 2012, 06:46
www.24taas.com, पुणे 
फेसबुक वरून कोण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत असाल तर, जरा सावधान. कारण, फेसबुक वरील अशाच मैत्रीतून पुण्यातील एका मुलीचं अपहरण झालं. आणि तिच्या घरी खंडणी देखील मागण्यात आली. पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यानंतर या कारस्थानामागे दुसरं तिसरं कोणी नसून, संबधित मुलीचा फेसबुक फ्रेंडच असल्याचं समोर आलं.
समर्थ पोलिसांच्या कोठडीत असलेल्या नीरज बाबरची फेसबुक वर एका मुलीशी मैत्री झाली. या मैत्रीचे घनिष्ठ ओळखीत रुपांतर झाले. त्यानंतर फोनद्वारे हे दोघे एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. यातच सोमवारी नीरज या फेसबुक मैत्रिणीला भेटण्यासाठी साताऱ्याहून पुण्यात आला. त्यावेळी क्लासला म्हणून गेलीली नीरजची मैत्रीण परत आलीच नाही. संध्याकाळी तिच्या घरी फोन आला तो अपहरणाचा आणि खंडणीचा.
त्यानंतर घाबरलेल्या या मुलीच्या आईला दुसऱ्या दिवशी फोन आला तो, ही मुलगी वानवडी येथील एका रुग्णालयात दाखल असल्याची. तोपर्यंत पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला. आणि काही तासातच नीरज पोलिसांच्या जाळ्यात आला. मुळचा साताऱ्याचा असलेला १९ वर्षांचा नीरज इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. चारच महिन्यांपूर्वी त्याची या मुलीशी मैत्री झाली होती. चारच महिन्यात त्याने अपहराणापर्यंत मजल मारली. आणि या मुलीच्या आईकडे एक लाख रुपयांची खंडणी देखील मागितली. परिणाम ही मुलगी हॉस्पिटल मध्ये आणि नीरज पोलीस कोठडीत.नीरज सज्ञान असला तरी तो १९ वर्षांचा आहे.
तर अपहरण झालेली मुलगी सोळा वर्षांची. या मुलांची वये पाहता टीन एजर्स ने केलेला हा गुन्हा असल्याचे पुढे येतो आहे. आणि कारण ही पुन्हा तेच ऐश आरामासाठी पैसा. त्यामुळे टीन एजर्स मधील ही वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहेच. त्यामुळे सोशल नेट्वर्किंग साईट वर मैत्री करताना जरा सावधानच.
First Published: Thursday, April 19, 2012, 06:46