Last Updated: Friday, April 20, 2012, 10:36
www.24taas.com,मुंबई मोबाईल धारकांनो आता आपल्या खिशाला थोडी कात्री लावावी लागणार आहे. कारण दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल रिचार्ज कुपनवर जादा कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फटका प्रीपेड मोबाईल ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे मोबाईल रिचार्ज करणे महाग होणार आहे.
ट्रायने रिचार्ज कुपनच्या (टॉपअप व्हाऊचर) दरवाढीसाठी मंजुरी दिली. त्यामुळे २० रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या व्हाऊचरसाठी आता जादा प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे. ही फी व्हाऊचरच्या किमतीतच समाविष्ट असणार आहे. देशभरातील ९० टक्के प्रीपेड मोबाईल ग्राहकांना ही दरवाढ लागू होईल. मात्र, २०रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या व्हाऊचरसाठी दरवाढ लागू नसेल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. अडीच वर्षांत पहिल्यांदाच अशा दरवाढीला मान्यता दिल्याचे ट्रायतर्फे सांगण्यात आले.
ट्रायच्या आदेशानुसार टॉपअप व्हाऊचरच्या प्रोसेसिंग फीची कमाल मर्यादा २ रुपयांवरून ३ रुपये करण्यात आली आहे. पण २० रुपयांखालील व्हाऊचरसाठी हे शुल्क २ रुपये इतकेच राहील. ग्राहक प्रतिनिधींच्या मागणीवरूनच २०रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या व्हाऊचरसाठी प्रोसेसिंग फी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेवढाच काय तो सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
First Published: Friday, April 20, 2012, 10:36