चार दिवसांत १ लाख नेत्रदानाचा संकल्प, Zee 24taas: eye donations campaign

चार दिवसांत १ लाख नेत्रदानाचा संकल्प

चार दिवसांत १ लाख नेत्रदानाचा संकल्प
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एकापेक्षा एक समाजसेवी उपक्रम राबवणा-या 'झी २४ तास'ने यंदा अनोखा विक्रम केलाय... सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या 'झी २४ तास'च्या नेत्रदान मोहीमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. अवघ्या ४ दिवसांमध्ये १ लाखाहून अधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडलाय. या उदंड प्रतिसादाबद्दल 'झी मीडिया कॉर्पोरेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भास्कर दास यांनी कौतुक केलं.

'नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान' हा संदेश जनमानसात रूजवण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने नेत्रदान मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह राज्याच्या विविध भागांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. विविध रेल्वे स्थानकांवर तसेच शहरांतील मोक्याच्या ठिकाणी नेत्रदान करू इच्छिणा-या व्यक्तींसाठी अर्जांचे वाटप सुरू असून, अवघ्या चार दिवसांतच १ लाखाहून अधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यामध्ये तरूणांपासून अगदी वयोवृद्ध नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.

गेल्यावर्षी या मोहीमेअंतर्गत सुमारे दीड लाख लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडला होता. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, यंदा ही संख्या ५ लाखाच्या घरात पोहोचेल, अशी आशा 'झी २४तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.

'झी २४ तास'ने समाजसेवी उपक्रमांची आपली परंपरा सुरूच ठेवली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना, 'वसा भगीरथाचा' ही मोहीम 'झी २४तास'ने राबवली.

दुष्काळ निवारणासाठी विविध चांगले प्रयोग राबवणा-या असंख्य भगीरथांना 'झी २४ तास'ने जगासमोर आणले. त्यानंत 'पाणी वाचवूया...' आणि 'पक्षी वाचवूया...' असे उपक्रम राबवण्यात आले. दिवाळीच्या काळात होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी यंदा 'मिशन दिवाळी' हा खास उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत महाराष्ट्राच्या विविध भागांतील लाखो विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची शपथ घेतली. आता नेत्रदान मोहीमेलाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 22, 2013, 17:16


comments powered by Disqus