Last Updated: Friday, February 14, 2014, 13:18
www.24taas.com, झी मीडिया, ऋषी देसाई फेब्रुवारीचा वेध लागले ना कि आमचा वैशाख वणवा सुरु होतो.. वर्षभर आपण काय केलं याचा शोध घेण्याची ही वेळ असते अर्थात ऑफिशीयल इटस अप्रायझल टाईम.. पण कल्लोळात स्वताचा शोध घेणं ही उत्तम आनंददायीही घटना असते.. आणि याचा उत्तम आदर्शपाठ मनात घोळत होता पण नेमकं काय ते आठवत नव्हतं.. आणि अचानक
‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ... कुठलाही भव्य जलाशय नसतानाही देहास सचैल स्नान घालणारं आमचं शक्तीपीठ - श्री क्षेत्र आंगणेवाडी... महाराष्ट्रातल्या संत पंरपरेनं ज्या शक्तीपीठांची आस मराठी मनावर गोंदली, त्याच शक्तीस्थळाचं कोकणची काशी म्हणून आमच्या पिढीनं मनोमन पुजलं... असं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र आंगणेवाडी.. एव्हढंच काय पण कुठल्याही महिन्यात जिथं गेल्यावर स्वता:चे डोळेच ज्या जत्रेच्या आठवणी आजुबाजूच्या शेतमळ्यात शोधतात ते ठिकाण म्हणजे अर्थात ‘श्री क्षेत्र आंगणेवाडी’.
शोध चैतन्याचा आंगणेवाडी म्हटलं तर छोटसं टुमदार गाव, आणि म्हटलं तर अवघ्या कोकणाला उरलेलं ३६४ दिवस जगण्याची अविरत ऊर्जा देणारं एक शक्तीपीठ... या गावात, जत्रेत असं नेमकं काय आहे मला अजूनही नाही कळालं.. पण या सगळ्या उत्साहाला श्रध्देचा आयाम मात्र नक्की आहे. तो नजरेला दिसत असूनही चौकटीत नाही पकडता येत, हे मात्र नक्की... कारण या सगळ्या गोष्टी शोधता शोधता आपणचं त्या चक्रात गुरफटून जातो आणि या सगळ्या प्रचंड गर्दीत मिसळल्यावर आपणच आपला शोध घेतो. समोर माणसं असूनही काहीच दिसत नसतं. प्रचंड कोलाहलात एक गोष्ट मात्र शाश्वत असते ती म्हणजे रंगीबेरंगी प्रकाशानं न्हावून निघालेला बाई भराडीच्या मंदिराचा सोनेरी कळस... पायपीट करुन पंढरीला गेल्यावर निम्म्याहून जास्त भाविक केवळ कळसाचं दर्शन करुन मागे कसे येऊ शकतात? या माझ्या मनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मलाच आंगणेवाडीच्या जत्रेत गेल्यावर कळलं. अनेकासाठी गाभाऱ्यातलं मूक दर्शनाएवढाच जत्रेच्या दिवशी कळसाला केलेलं भक्तीभावाचं वंदनही तेवढचं श्रध्दावान असतं.
पारंपरिक सोशल मीडिया माझ्या लहानपणापासून ही जत्रा मी पाहिलीय, अनेक लेखांत वाचलीय... पण दरवर्षी असणारी ही जत्रा रिपीट कधीच होत नाही. कारण एवढ्या सगळ्या माणसांनी भरलेल्या या जत्रेत दरवेळेला एक नवा उत्साह असतो आणि हा सगळा उत्साह जत्रेच्या सगळ्या प्रक्रियेतचं असतो. खरंतर जत्रेची तारीख ही ‘पारध’ झाल्यावर मग कौल लावून ठरते आणि त्यानंतर जत्रेची तारीख ठरवली जाते. काही वर्षापूर्वीचा विचार केला तर त्यावेळी सोशल मीडिया अॅक्टिव्ह की ब्रेकींग न्यूजचा माराही नव्हता. ज्यांना हा प्रकार माहीत नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट आज रंजक ठरेल. जत्रेची तारीख ठरली की जणू काही निर्जीव असणाऱ्या खडूमध्येही रंग चढायचे... प्रत्येक ग्रामपंचायतीवर, चौकामध्ये असणाऱ्या निर्जीव सूचना फलकात प्राण भरायचा, लाल डबा म्हणून बोलल्या जाणाऱ्या पण प्रत्येक मालवण माणसाच्या हक्काची ‘येसटी’ तेव्हा एशियाड वाटायची, झाक-झूक रिक्षाही पॉश वाटायची... कारण या सगळ्या गोष्टींवर उमटलो जायची ती फक्त एक गोष्ट... आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख. आज आपण फेसबुकच्या प्रचंड आहारी गेलोय. त्याच भाषेत सागांयच तर कोणतरी तुमच्या वॉलवर जत्रेची पोस्ट टाकायची आणि सगळ्यानी ती नुसती लाईक नाही तर शेअर करायची. माझ्या मालवणी माणसानी फक्त जत्रेसाठी बनवलेली ती सोशल कनेक्टिव्हिटी आजही प्रचंड कूतुहलाचा विषय आहे. एरव्ही आपल्या वाहनावर विनापरवाना काहीही केलं म्हणून थेट हमरी-तुमरीवर येणारे वाहनचालक आजही या जत्रेच्या तारखेच्या जाहीरातीवरुन मात्र देवीची काम म्हणून अभिमानानं आपल्या वाहनावर मिरवतात हे सगळ्यात महत्त्वाचं... सण-उत्सव हे माणसं जोडण्यासाठीच असावी, या लोकमान्याचं शब्दांचं जिवंतपण या जत्रेत आणि या सगळ्या प्रकारात मिळून जातं.
...पुण्याची गणना कोण करी प्रत्यक्ष जत्रेचा दिवस उजाडतो तेव्हा या सगळ्याला विलक्षण रंग चढलेला असतो. सूर्यदेवही गुलाबी रंगाची प्रभावळ घेऊन लगबगीन सकाळी येतो. पण प्रात:समयी गर्दीचा तुडूंब जनसमुदाय पाहून त्या किरणांनाही एक तेज येतं. खरतर प्रचंड गर्दीमुळेच रात्रीपासूनच मंदिरात ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरु असतो. पण या सगळ्यातही सकाळी सूर्याच्या किरणस्नानाचा प्रकार हा अनुपम्य असतो. तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेत खरी गंमत मात्र पहिल्याच दिवशी असते. दिवसभर प्रचंड गर्दी पाहणारी आंगणेवाडी भांबावून कधीच जात नाही. कारण या जत्रेत आलेला प्रत्येक भाविक हा श्रध्देनंच आलेला असतो. त्याच्या मनात भक्ती नसेलही, पण आईच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी त्याच्या मनात श्रध्दा मात्र कुणीच नाकारु शकत नाही. हौशे, नवशे, गवशे असं आजपर्यंत तीन प्रकरांत गर्दीचं लॉजिक मांडणारं तर्कशास्त्र गर्दीत मला तसं कधीच दिसत नाही... कारण प्रत्येकाची गरजेची, भक्तीभावाची व्याख्या जरी वेगवेगळी असली तरी या सगळ्याला बाई भराडीच्या मंदिराकडेच यावं लागतं. त्यामुळे या गर्दीला मी फक्त निस्सीम श्रद्धा असणाऱ्यांचा जागर म्हणेन... कारण ऑनलाईनच्या ‘चॅटींग’च्या जमान्यात माणसं स्वता:हून एकत्र येणं हे कुठली तरी अनामिक श्रद्धा असल्याशिवाय शक्यच नाही, हा माझा ठाम दावा आहे.
यजमानदेवो भव या तीन दिवसांच्या जत्रेत मला सगळ्यात अप्रुप वाटतं आंगणे ग्रामस्थांचं... तसं पाहिलं तर ही आंगण्याची जत्रा, पण असं असतानाही या जत्रेत समस्त आंगणेमंडळींचं ‘यजमान’पण हाही एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखाचा विषय आहे. आपल्या गावात जत्रा असूनही दिवसभर कडक उपास करणे, हे म्हणायला साधं असलं तरी आचरणास अत्यंत कडक अशी गोष्ट आहे. पण समस्त आंगणेबंधूंचा दिवसभर असणारा उपास ही मुद्दाम अभ्यासण्याची गोष्ट आहे. कुठल्याही जत्रेत येणारे पाहुणे त्यांचं आगत-स्वागत हा समस्त महाराष्ट्रात ओघानं विषय आलाच. पण या जत्रेत एक वेगळी गोष्ट असते. आंगणेवाडीला दूरदुरुन अनेक माणसं येतात. यातली अनेक माणसही कुठच्याही ‘आंगणे’च्या घरात गेली की त्या व्यकतीचे स्वागत नातेवाईक म्हणूनच होतं. त्या ओळख, ना पाळख असलेल्या व्यक्तीला घरच्या जेवणाचा आनंद दिला जातो. एवढ्या प्रचंड गर्दीत, घरात राबता असूनही बाहेर अंगणात देवीच्या जत्रेसाठी आलेला भक्त हा माझाच नातेवाईक स्वागत आहे, असं समजून त्याचं आगत स्वागत करणं, ही गोष्ट मला वाटत फार वेगळी आहे.
कितीक देतलसं सांग? खरंतर जत्रेच्या दृष्टीनं अनेक पैलू आहेत आणि त्या प्रत्येक पैलूचा स्वत:चा असा गाभा आहे. या सगळ्याचं कारण म्हणजे ही सगळी जत्रा जशी धार्मिक श्रद्धेनं बांधली गेलीय तशीच नात्याच्या घट्ट अशा बंधानेही जोडली गेलीय. या जत्रेत फिरण्याचा, वस्तू खरेदी करण्याची गंमत आजच्या ऑनलाईन शॉपिंग, टेलिफोन शॉपिंगपेक्षाही वेगळी असते. शांतपणे गर्दीत फिरताना कोणीतरी गावातला शाहरुख किवा सलमान कर्णकर्कश्श् आवाजातलं ती पिपाणी किवा पेपारं वाजवतो तेव्हा एक क्षण राग येतो पण दुसऱ्याच क्षणी आपलं हसू आपल्यालाच आवरत नाही. मोबाईल आणि डेस्कटॉपवर फुलाच्या निर्जीव वॉलपेपरात आनंद फिल करणारी माझी पिढी, त्या जत्रेच्या बाजारात अबोलीच्या किवा पिवळ्या फुलांच्या प्लास्टिक हाराची वेणी खरेदी करते, तेव्हा निर्जीव वस्तूंचं जिवंतपण म्हणजे नेमकं काय, हे त्या क्षणाला कळतं. त्या गर्दीत एखादा बारका पोरगा आपल्या समोर ‘चल छैय्या छैय्या’चा तो दहा रुपयावाला मोबाईल वाजवत फिरत असतो तेव्हा त्याचा तो मोबाईल म्हणजे आपल्या आईनं दिलेला ‘अँड्रॉईड ४.० अपग्रेड व्हर्जन प्लस विंडो एट’वाला मोबाईल असतो. जत्रेत एखादी बाई १२०० ची वस्तू कमी कमी करत, अक्षरश रेट पाडत १२० रुपयाला घेते तेव्हा तो सगळा कोलमडलेला अर्थव्यवस्थेचा भार पाहून एखाद्या अर्थतज्ज्ञालाही सांगताना हसू फुटेल.. कुठलाही मिस कॉल न देताही आपल्याबरोबर आलेल्या सगळ्या मित्रांचा-सगेसोयऱ्यांचा नेटवर्क हे बरोबर ठरवून दिलेल्या घड्याळ्याच्या ठोक्याला एकत्र कसं जमतं, हे पाहण्यासाठी जत्रेतच जावं लागेल. एरव्ही मोबाईलच्या गेमशिवाय कुठलाही बैठा खेळ ठावूक नसलेल्या यंग जनरेशनला पाळण्यात बसून ओरडताना पाहणं आणि नशिबाच्या खेळात कोकच्या बॉटल्ससाठी रिंग फेकताना पाहणं ही सगळी जिवंतपणाची लक्षणं अनुभवण्याची संधी फक्त जत्राच देते. एरवी ‘डेटॉल’ संस्कृतीत आणि टिश्यू पेपर घेऊन जगणाऱ्या शहरी माणसांना घामघूम होऊन दमलेल्या अवस्थेत मळ्यात शांतपण बसलेलं पाहणं, हाही एक वेगळा अनुभव असतो. कारण त्यांच्यासाठी आसमंतात उडालेला धुरळा हा धूळ नसतेच तर ती असते एक चैतन्यानं माखलेली गुलालपंचमी... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारख्या कमावत्या पोरालाही गर्दीत आपल्या घरातला कुणी नातेवाईक दिसला की हक्कानं ‘जत्रेक पैसे’ अर्थात आमच्या भाषेत ‘पॉस’ मागायचा हक्क हा फक्त जत्रेतच मिळतो. किती गोष्ट सागांयच्या या जत्रेच्या, कारण काही गोष्टींना पूर्णविराम नसतोच मुळी...
आनंदवनभुवनी आज मी एवढी वर्ष जत्रा पाहतोय. आता फक्त चाकरमानी म्हणून जत्रेसाठी मुंबईहून जातो. पण मुंबईच्या मातीत या जत्रेच्या आठवणी घट्ट आहेत. आज ‘स्टँडिंग’ जावं लागेल म्हणून लोकल चुकवणारा मी सो कॉल्ड गावाला गेल्यावर मात्र मालवणच्या खास आंगणेवाडी स्टँण्डवर उभं राहून यात्रा स्पेशल एसटीनचं प्रवास करतो तोही ‘स्टँडिंगनचं’... अख्खी रात्र तीन तीन मैल नुसते रन्स काढायचे, नुसतं हुंदडायचे, रांगेत उभं राहून दर्शन घ्यायचं, एक क्षण देवीचं दर्शन घेतल्यावर गाभाऱ्यात केलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीचा हेवा करायचा, कारण त्या फुलांनी उमलण्यापासून ते निर्माल्य होईपर्यंत बाई भराडीचं दर्शन घेण्याची संधी मिळते. असा छोटा छोटा आनंद शोधायचा... आणि दमून दूर जाऊन शांतपणे ही जत्रा पाहायची, अंगात त्राण नसतानाही आणखी एकदा फिरण्याच्या कल्पनेनं देहाला झपुर्झा अवस्थेत हे सारं साठवायचं... परत पुढल्या वर्षी जत्रेला यायचंय या जिद्दीनंच...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 13:00