निवडणुकीचे `झोलबच्चन`, Drama Blog by Nilima Kulkarni

निवडणुकीचे `झोलबच्चन`

निवडणुकीचे `झोलबच्चन`
निलीमा कुलकर्णी, रिपोर्टर, 24taas.com

जबरदस्त ड्रामाबाजी असलेल्या नाटकालाही लाजवेल अशी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक.’सगळे उभे आहेत’ म्हणत नाट्यमय घटनांचा रोज नवा अंक इथे पाहायला मिळाला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे रोजच ‘मानापमाना’चा प्रयोग रंगला आणि नाट्यक्षेत्रात आम्ही ‘सख्खे शेजारी’ म्हणवणारे ‘झोलबच्चन’ एकमेकांनाच ‘बेचकी’ मारू लागले.पोस्टाने मतपत्रिका पाठवणे त्याही हस्ते-परहस्ते, ही निवडणूक प्रक्रिया मुळातच सदोष.त्यात खोट्या मतपत्रिका छापल्या गेल्या.तब्बल 1999 मतपत्रिका बनावट आढळल्याने मुंबई विभागाची निवडणूकच रद्द करण्यात आली.

घरपोच मतपत्रिका पाठवल्या असतानाही अनेकांना त्या मिळाल्याच नाहीत.खोट्या मतपत्रिका मतमोजणीदरम्यान दिसल्या आणि ‘बे दुणे पाच’चा धक्कादायक हिशोब पुढे आला, तेव्हा या निवडणूक नाट्याने अक्षरश: क्लायमॅक्स गाठला. ‘विच्छा माझी पुरी करा’ म्हणत सर्व उमेदवारांनी कंबर कसली होतीच, मात्र त्यांची नजर होती मराठी नाटकांसाठी जाहीर झालेल्या पाच कोटींच्या अनुदानावर!

निवडणुकीचे `झोलबच्चन`

त्यातच वर्षातून एकदा भरणारं नाट्यसंमेलनही राजाश्रयाशिवाय होत नाही.राजकीय स्वागताध्यक्षाशिवाय संमेलनाची नांदी सुरु होत नाही.तरीही राजकारण्यांनाही लाजवेल अशी ‘चेहराफेरी’ नाट्यपरिषद निवडणुकांमध्ये दिसली.एकमेकांवर कुरघोड्या करणारे नाट्यवर्तुळातले ‘बहुरुपी’ रोजच मुखवटे बदलताना दिसले. एक वेळ ‘गिधाडे’ बरी पण ही कलावंत मंडळी त्याहीपेक्षा पुढे गेली.सरकारी पैशांवर डोळा ठेवून खुर्चीसाठी वाट्टेल ते करताना त्यांनी ‘सौजन्याची ऐशी तैशी’ तर केलीच पण निवडणुकीचेही धिंडवडे काढले.

सत्वहीन मंडळी अधिकच निसत्व उद्योग करू लागली. ‘तो मी नव्हेच’ म्हणत सत्तेसाठी इथे अक्षरश: ‘आंधळ्यांची शाळा’ भरली.नटराज पॅनेल आणि उस्फूर्त पॅनेल यांनी एकमेकांवर केलेले आरोप पाहून ‘संशयकल्लोळ’ अधिकच बळावला. रंगभूमीचे हे ‘घाशीराम’ रंगभूमी सोडून इतर मोहांना बळी पडले की काय अशी शंका वाटू लागली आहे.स्वत:ला ‘नटसम्राट’ म्हणवणा-या या कलावंतांनी कला सोडून बाकीच्या गोष्टींना दिलेलं असाधारण महत्व पाहता आता त्यांनी घरी बसावं हेच उत्तम. कारण ‘सुखान्त’ हवा असेल तर कलेचं ‘वस्त्रहरण’ आता पुरे झालं.अखेर नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी ‘नवा गडी नवं राज्य’ पाहायला मिळेल अशी आशा होती, मात्र या खुर्चीलोलूप धटिंगणांमुळे रंगभूमीचा ‘सूर्यास्त’ पाहावा लागू नये हीच रंगदेवतेचरणी प्रार्थना!!!

First Published: Thursday, February 21, 2013, 19:04


comments powered by Disqus