... नाही तर छाती फुटून मी मरेन !, Endyuro thrills in Sinhagad, Pune

... नाही तर छाती फुटून मी मरेन !

... नाही तर छाती फुटून मी मरेन !
www.24taas.com, संदीप साखरे, झी मीडिया

हेच वाक्य परवा किमान ५० वेळा तरी माझ्या तोंडातून निघालं.. प्रत्येक दोन-दोन पावलांवर अंगावर काटा उभा राहील अशी परिस्थिती.. मागून ढकलत ढकलत आपल्याला पुढे ओढणारी दोन निर्लज्ज मंडळी.. नुसतं खाली बसलो तरी ‘खाली बसलास’ असं जोरजोरात कंठशोष करणारा एक खवीस.. खाली बसलो म्हणजे मी एखाद्याचा खून केला अशी भावना माझ्याच काय पण माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या मनात निर्माण करणारा त्याचा आवाजातला सूर.. वाटेत मिळेल तिथे बसण्याची किंवा झोपण्याची इच्छा.. आता यापुढे एक पाऊलही टाकू नये अशी परिस्थिती आणि सारखं ‘चल संदीप..चल संदीप’ असा घोशा लावणारी दोन बोगस मंडळी... विशेष म्हणजे या दृष्टचक्रात मीच स्वत:ला अडकवून घेतलं असल्यानं माझा माझ्यावरच होणारा संताप हा यातला तिसरा भाग .. एवढ्या हाल अपेष्टा आणि तुम्हाला मुळातूनच भानावर आणणाऱ्या या दृष्टचक्राचं सुमधूर नाव एन्ड्युरो...

सुमारे १४ वर्षांपूर्वी असणारे आपण आणि आजचे आपण किती फरक पडलाय, याचं एक भयंकर वास्तव आपल्या नजरेसमोर आणणारं, म्हणजे एखाद्या सिनेमात ‘याददाश’ वापस आल्यासारखा सीन किंवा एखाद्या चिरकुट मालिकेतला ठिश ठिश असा विविध अंगल्सनी दाखवणारा आणि तुम्हाला जमिनीवर आणणारा सीन.. (हा हा.. )

१९९७ ते २००० या काळात केलेले ट्रेक आणि त्यानंतर नोकरीच्या रगाड्यात अडकल्यानंतर, सुमारे १४ वर्षांनी त्या अनुभवाच्या बळावर एन्डयुरोसाठी धरलेला आग्रह.. सगळचं चुकत गेलं.. (हा हा..) रात्री अपरात्रीच्या प्रवासानंतर पुण्यातल्या कटारिया हायस्कूलमध्ये पोहचल्यावर सकाळचा एन्ड्युरोचा तो माहौल.. रंगीबेरंगी, जल्लोषाचं वातावरण, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशातून एवढचं नाही तर परदेशातून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, किंवा पुन्हा पारखण्यासाठी किंवा ट्रेकिंग, सायकलिंगवर असणाऱ्या प्रेमापोटी पोहचलेली शेकडो मंडळी.. कुणी ओपनमध्ये, कुणी अम्युच्युअर, कुणी कॉर्पोरेटमध्ये, कुणी डॉक्टर, तर कुणी ज्युनिअरमध्ये आणि या ज्युनियरच्या जोडीला मीडिया ग्रुप.. ज्यात आमची टीम सहभागी झालेली.. झी २४ तास, मुंबई रॉक्स...

फ्लॅग होस्टिंग, त्यानंतर सुरु केलेलं सायकलिंग, कित्येक वर्षांनंतर हातात आलेली सायकल आणि त्यामुळे आपण किती अवघड जागी फसलेलो आहोत याची पहिल्या तीनच मिनिटांत झालेला साक्षात्कार.. त्यात भर म्हणून की काय आमच्या तीन जणांच्या ग्रुपमधला दुसरा एक खवीस माझ्यासह रस्ता चुकला.. तेही पुण्यात.. म्हणजे तो चुकला की मी चुकवला हा भाग अलहिदा.. पण खापर त्याच्याच डोक्यावर.. त्यामुळे उगाचच सायकलचा जरा जादाच फेरा पडला.. आणि मग सारसबागेशी पोहोचून, सायकली टेम्पोत आणि आम्ही बसमध्ये असा आमचा प्रवास सुरु झाला तो सिंहगडाकडे, म्हणजे खऱ्या छळाकडे....
तीन जणांचा एक गट, त्यांच्या सायकलींसह डोंगरदऱ्यांतून पार पाडावी लागणारी ही स्पर्धा.. विशेष म्हणजे अगदी स्टार्टिंग पॉईंट ते एन्ड पॉईंटपर्यंत तिघांनी सोबतच गेलं पाहिजे सायकलसह हा बेसिक नियम.. त्यामुळे मी पुढे, तु पुढे असा ऑप्शनच नाही.. त्यात आम्ही मीडियावाले म्हणजे लिंबू टिंबू त्यामुळे आपलं साधं १२ किलोमीटरचं सायकलींग, आणि सिंहगड चढून आणि गडावर पार सगळीकडे फिरवून परत उतरण्याचं एक छोटं आव्हान ( म्हणजे त्यांच्यासाठी) हे आमच्यासाठी.. तर दुसऱ्या ग्रुपसमोर आव्हानं काय तर ७५ किलोमीटर सायकलींग, २५ किलोमीटर ट्रेकिंग, त्यानंतर रिव्हर क्रॉसिंग, रायफल शूटिंग आणि मग त्यानंतर एन्ड पॉईंटला पोहोचायचं.. हे थोडं फार वरखाली.. त्यात जेवायला वेळचं नाही, झोपायचं नाही, काही नाही.. चालत रहायचं किंवा सायकलिंग करायचं.. बा बा बा.. हे लिहिताना पण मला दम लागतोय.. पण या सगळ्या मंडळींनी जवळपास ३६ तास कसे काढलेत हे मी अगदी जवळून पाहिलंय आणि हबकलोही आहे.. आणि एसीत दररोज फिरणारे पाय पार जमिनीवर आलेत..

थोडी गम्मत...
गेल्या वेळेपेक्षा मीडियासाठी स्पर्धा थोडी सोप्पी केली आहे, असं सगळेजण सांगत होते.. आम्ही म्हणजे आदरार्थी बहुवचन, हा आपले कधी एकदा स्पर्धा सुरु होते याची वाट पाहतोय.. स्वतःवर खूप दांडगा विश्वास.. हे काय आपण यू करु अशी आत्मस्तुतीची भावना.. आणि स्पर्धा सुरु झाली आणि पहिल्याचं टर्ननंतर रस्ताच नसलेल्या भागात आमचं सायकलिंग सुरु... एखाद दोन किलोमीटर दुपारच्या उन्हात आधी स्वतःचं आणि नंतर सायकलचं काय करायचं, आणि हे संपणार कधी हा पडलेला पहिला प्रश्न.. हे वाटतं तितकं सोप्पं नाही, हे जाणवायला सुरुवात.. त्यात दोन किलोमीटर पुढे जाऊन परतणारे स्पर्धक म्हणजे आता परतायचं ही भावना..पण नंतर कळलं की रस्ता चुकलाय..सगळ्यांचाच.. इतरांवर सोडाच पण स्वतःवरचा पण विश्वास उडायला लागला.. त्यात परतणारी मंडळी सांगेचनात रस्ता चुकलाय, कारण त्यांना फेरा पडला होता ना, मग आम्हालाही तो पडावा ही निर्मळ भावना.. अखेर स्पर्धाच ना.. (हा हा..) मग एका चढावर हा रस्ता एवढीच एका मार्शलनी केलेली खूण.. आता हे मार्शल म्हणजे या एन्ड्युरोचे कार्यकर्ते, स्वयंसेवक ( यांच्याबाबत विस्ताराने बोलीनच )..

मग समोर एक आख्खा डोंगर हा यांचा योग्य रस्ता... मग त्या डोंगरावर सायकली चढवायला सुरुवात... त्यातही एकमेकांना म्हणजे ग्रुपवाले स्वतःच्या ग्रुपला करणारे चिअरिंग, देणाऱ्या शिव्या सगळं काही.. सगळा डोंगरच उरावर यायलाय अशी परिस्थिती... कसाबसा वर पोहोचलो आणि दोन पावलं डोंगर राहिला असताना समोर आमच्या ग्रुपमधला एक खवीस वर उभं राहून नाहक सल्ले देणारा.. ‘हा सायकल अशी झेड आकारात चालव’.. अरे इथे एक पाऊल टाकवेना आणि हा म्हणतोय झेड आकारात चालव, फटकवावं याला अशी भावना.. पण पुन्हा एवढी शक्ती उरलीय का असा प्रश्नही.. मग त्याला सांगितलं आता मी येत नाही, खाली ये आणि सायकल घेऊन जा.. अखेरीस तो आला आणि डोंगरावर सायकल नेण्यात मी यशस्वी झालो. ( हा हा).. त्य़ानंतर डोंगरावरुन उतरुन आम्ही सिंहगडाच्या पायथ्याच्या दिशेने रवाना झालो.. आता रस्ता चांगला डांबरी झाला असला, तरी चढावर सायकल चढवणे अवघड जात होतं, त्यावेळी या दोन खवीसांमधला एक खवीस त्याच्या सायकलसह मलाही ओढत मला पुढे ओढण्याचा प्रयत्न करत, रस्ता पार करत होता.. त्याच वेळी आमचे शहाणे कॅमेरामन आमची ही दुर्दशा शूट करण्यासाठी त्याठिकाणी पोहोचले.

मी आपला त्या खवीसापासून दृश्यात तरी आपली अब्रू जाऊ नये यासाठी प्रयत्नशील..तेवढ्यात पुन्हा चढ आला, मग मीच त्याला सांगितलं की दे धक्का म्हणून.. अशी सायकलवरची कसरत पार करत अखेरीस एकदाचा सिंहगडाचा पायथा आला... आणि शर्यत संपली असं वाटण्याचं फिलिंग असतानाच पुढचा सिंहगडाचा प्रवास सुरु झाला.. जसजसा गड चढत गेलो तसतसा उर फुटून हातात येतो की काय अशी बिकट स्थिती निर्माण झाली.. काही पायऱ्या तर फक्त लिंबू सरबतांच्या आमिषाने आणि काही शिव्या खात चढलो.. काय काय हाल पाहिले ते लेखाच्या सुरुवातीला दिलेच आहेत.. असा कसाबसा अत्यंत केविलवाण्या अवस्थेत अखेर सिंहगडावर दाखल झालो, पण हा छळ तिथेही संपेना. कल्याण दरवाजा ( जो गडाच्या मागच्या बाजूला आहे) त्याला एक फेरा मारुन अखेरीस पुन्हा हा गड उतरायचा होता.. पण मध्येच आमचे मित्र अरुण मेहेत्रे म्या पामराच्या मदतीला धावून आले. आणि त्यांनी सिंहगडावर मला जरा दिलासा देत पिठलं भाकरी, दही आणि चटणीच्या मेजवानीचा खुराक दिला.. तब्बल चार ते पाच भाकऱ्या आणि आठ वाट्या दही रिचवल्यानंतर गड उतरायला सज्ज झालो... तर आमचे दोन खवीस माझीच वाट पाहत त्या चेक पॉईंटला बसले होते.. अखेरीस पुन्हा या खवीसांच्या मदतीनं आम्ही सिंहगड उतरलो.. तानाजी मालुसरेंपासून ते पार शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्या इतिहास पुरूषांबाबत एक आदराची भावना उगाचच मनात दाटून आली.. सिंहगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आमची शर्यत संपली... हुश्श म्हणत सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला...

एन्ड्युरोच्या बेस कॅपवर
आता वेळ होती एन्ड्युरोचा खरा थरार पाहण्याची.. सिंहगडाच्या पायथ्याशी थोडा टाईमपास आणि फोटोसेशन झाल्यानंतर आम्ही मुक्कामी निघालो एन्डुरोच्या बेस कँपवर.. खऱ्या एन्डयुरोला जाणाऱ्या स्पर्धकांसाठी हा बेस कँप गाठणे महत्त्वाचे.. सिंहगडाच्या पायथ्याहून निघालेली मीडियाची बस सुमारे दोन तास वळणावळणांचा प्रवास करत अखेर या बेस कँपवर पोहोचली. रात्रीचे साडे आठ वाजलेले.. अगदी नदीला लागून असलेल्या काठावर, इमारत अशी नाहीच.. नदीच्या तिरावर असलेल्या दोन तीन झाडांचे पार, तिथेच एका बाजूला एन्ड्युरोच्या कार्यकर्त्यांसाठी आणि मीडियासाठी चाललेली स्वयंपाकाची तयारी.. सर्व मार्शल्सशी संपर्क साधण्यासाठी असलेल्या वॉकीटॉकी, बॅटऱ्या, चार्जिंगची व्यवस्था, झाडांच्या परिसरात लावलेले बल्ब, नदीत रात्री रिव्हर क्रॉसिंग करणाऱ्यांसाठी फ्लड लाईटची व्यवस्था.. तिथेच एका उंचवट्यावर लावलेले दोन टेन्ट.. अगदीच दमलात तर विश्रांतीसाठी, तेही मीडियाच्या मंडळींसाठी.. स्पर्धकांसाठी नाही.. दोन पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरत्या रुपात लावलेल्या टाक्या.. असा सगळा माहौल.. मस्त पिठलं भात आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन किंवा मटन असा बेत.. आम्ही जाम दमलेलो असल्याने सगळ्यांनी जेवणावर आडवा ताव मारला.. आणि गप्पा हाणत बसलो.. झोपायचं कुठे, याचं उत्तर होतं झाडाखाली.. त्यासाठी स्लिपिंग बॅग देण्यात आल्या..

रात्री उशिरा या स्पर्धेत सहभागी झालेल्या एक एक टीम दाखल होणार होत्या.. म्हणजे ७५ किलोमीटरचं सायकलिंग करुन ती मंडळी बेस कॅपवर येणार होती, त्यानंतर इथे दोन तासांच्या कम्पल्सरी विश्रांतीनंतर त्यांना ट्रेकिंग करायचं होतं. त्यानंतर पुन्हा बेस कॅपवर येऊन इथं रिव्हर क्रॉसिंग आणि रायफल शूटिंग करुन सायकली चालवत एन्ड पॉईंट गाठायचा होता.. साधारण दुपारी १२च्या सुमारास सुरु झालेल्या स्पर्धेतील स्पर्धक रात्री कँपवर एक एक करुन दाखल व्हायला सुरुवात झाली.. पहिली टीम दाखल झाली तेव्हा वाजले होते रात्रीचे अडीच.. सुमारे ७५ किमी सायकलिंग करुन आलेल्या या टीममध्ये होती वाईची तीन तरुण मंडळी, त्यात एक मुलगीही.. तिघेही नॅशनल लेव्हलचे अँथलिट.. वाईतील एका स्पोर्ट्स दुकानाने त्यांना स्पर्धा स्पॉन्सर केलेली.. सगळे मांढरदेवी डोंगरावर दररोज सराव करणारे.. लहान लहान बॅगा.. खाण्यासाठी काय तर कच्चे मूग असलेली छोटी पिशवी आणि दुसऱ्या पिशवीत काजू, बदाम, खारका यांचा खुराक.. बस्स.. एवढं दमून पोहचल्यावर सुद्धा इन केल्याबरोबर त्यांना निघायची घाई झालेली.. त्यांना लवकरात लवकर स्पर्धा संपवायची होती.. अखेरीस इथे तीन तासांचा कम्पल्सरी मुक्काम असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी बळेबळेच विश्रांती घेतली.. झोपायला आंथरुण वगैरे काही नाही हा.. त्यांना प्रत्येकी एक एक मोठी अल्युमिनियम फॉईल देण्यात आली, त्यात स्वतःला गुंडाळून ही मंडळी चटकन झोपून पण गेली.. आणि तीन तासांनी नव्या दमाने पुढे रवाना..

त्यानंतर आली ती दुसरी टीम. यातील एक जण मुंबई-पुणे सायकलिंग चॅम्पिअन, त्यांच्यासोबत एक परदेशी महिला.. तिघांची टीमच पूर्णपणे प्रोफेशनल.. आपल्यापुढे ऑलरेडी एक टीम आहे, हे कळताच त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं.. वाईच्या तिघांना सायकलिंगचा प्रॉब्लेम, तर ही टीम सायकलिंगमध्ये एकदम माहीर.. अशा एकेक टीम त्यानंतर रात्री येत गेल्या.. प्रचंड थकलेल्या अवस्थेत पण जिद्दीने पुन्हा नव्या प्रवासासाठी सिद्ध..

बरं या स्पर्धेत सायकल पंक्चर होण्याचे प्रमाणही जास्त.. एक टीम अशी आली की त्यातील एकाची सायकल या प्रवासात तब्बल सात ते आठ वेळा पंक्चर झालेली.. पण ही मंडळी एवढी जिद्दी, की पंक्चर काढून पुन्हा स्पर्धेत सहभागी.. स्पर्धकांमध्ये काहीजण अगदी कोवळे तरुण, काही परदेशी, काही वयाने मोठे.. पण प्रत्येकाच्या मनात जिद्द, स्वत:ला टेस्ट करण्याची आणि स्पर्धा पूर्ण करण्याची.. त्यातल्या मुलींचं विशेष कौतुक वाटत राहिलं सारखं.. इतक्या जिद्दीने त्याही या इतक्या थकवणाऱ्या स्पर्धेत अगदी पुरुषांच्या बरोबरीने सहभागी..

सकाळीही ट्रेकिंगहून परतलेली मंडळी येत गेली.. एवढ्या थंडीतही आणि दमलेल्या अवस्थेत रिव्हर क्रॉसिंग करुन एन्ड पॉईंट गाठण्याची प्रत्येकाची घाई पाहताना, व्यक्तिश: भरुन आलं.. का करतायेत हे सगळं.. काय असावं यामागचं कारण.. ट्रेकिंग, सायकलिंगवरचं प्रेम फक्त की स्वत:ला मिळणारा निर्मळ आनंद.. स्वतची क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न की निसर्गावर असणारं प्रेम.. काहीच उत्तरं नसतात कधी कधी अशा प्रश्नांना..
एक परदेशी तरुणी होती, तिच्यासोबतचे दोन तरुण गळपाटले.. त्या दोघांच्या आणि तिची स्वतःची अशा तिघांच्या सायकली दोन डोंगर ही पोरगी एकटी घेऊन आली.. त्यानंतर तिला ही स्पर्धा पूर्ण करता येईल ना, असा सवालही तिनं उपस्थित केला.. रिव्हर क्रॉसिंग करताना दोन्ही मार्ग ती पोहून आली.. तिची जिद्द पाहून हबकायला झालं.. अशी एक नाही दोन नाही..अनेक उदाहरणे.. कुठल्यातरी गावातून, शहरांतून आलेली ही मंडळी न थकता एका जिद्दीने भारावलेली होती..

काय जाणवलं ?
‘ही तरुणी काय परग्रहावरुन आली आहे का, ही क्षमता आपल्या सगळ्यांच्यात आहे, आपणही ही स्पर्धा पूर्ण करु शकतो, अशी मानसिकता निर्माण होण्याची गरज आहे’, हे स्पर्धा आयोजित करणाऱ्या प्रसाद पुरंदरेंचं वाक्य जास्त भिडलं. केवळ साहसाच्या प्रेमापोटी गेली सात वर्षे हा खटाटोप करणे, हे तसे जिकिरीचे काम.. यासाठी मनुष्यबळ मिळवताना, पैसा उभा करताना. मार्शल घडवताना, प्लॅनिंग करताना कसे अनुभव येतात, हे ते सांगत होते. या सगळ्या स्पर्धेमागची एक वेगळी दृष्टी समोर येत गेली.. टीमभावना निर्माण होणे, नव्या जबाबदाऱ्या पेलणे, साहसावर प्रेम असणारी आणि सध्याच्या ऐषोआरामाच्या काळात एक शारिरिक संस्कार देणारी पिढी घडवण्याचा हा या स्पर्धेमागचा निर्वाज्य दृष्टीकोन जाणवत गेला.. आणि हे कुठेतरी आपल्या नाळेशी जोडणारं आहे, असं जाणवत गेलं.. वडिलांचा वारसा एका वेगळ्या अर्थाने नव्या पिढीकडे सोपवताना प्रसाद पुरंदेरींची शिस्तही तितकीच महत्त्वाची वाटली.. माध्यमांसमोर न येता नव्य़ा तरुणांना वाव देण्यामागची त्यांची दृष्टीही अनोखीच..

मार्शल म्हणजे या स्पर्धेतील स्वयंसेवक. त्या १००-१५० किलोमीटर परिसरात चेक पॉईंटवर एकटे दुकटे असणारी ही तरुण पोरं-पोरी. एक पैसाही न घेता, केवळ या साहसाच्या प्रेमापोटी तिथे राबतात. त्यातली अनेक मंडळी ही चांगल्या घरातली, चांगली डॉक्टर, इंजिनिअर असलेली, चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यांवर काम करणारी.. पण प्रेम आणि ध्येय नवी पिढी घडवण्याचं.. एन्ड्युरोसाठी काम करताना मिळणारे अनुभव त्यांना आयुष्यात अनेक टप्प्यांवर उपयोगी पडत असावेत. त्यासाठी खूप चांगलं वातावरणही इथं निर्माण केल्याचं ध्यानात येत गेलं.. त्या बेस कँपवरची करडी शिस्त सातत्यानं जाणवत राहिली..

रोज एसीत १२-१२ तास घालवून ऑफिसमध्ये तीर मारत असल्याचा आनंद हळुहळु नाहीसा होत गेला.. आपली शारिरिक क्षमता काय आहे, हे तपासायला हवं कधीतरी, असं वाटायला लागलं.. गेल्या १४ वर्षांत आपण स्वतःचीच कशी माती करुन घेतली आहे, याचं भान आलं..

सकाळी तिथल्या नदीत कयाकिंग केलं, काही जण पोहलेही. नाश्ता, चहा, जेवण करुन परतायच्या मार्गावर लागण्याची वेळ झाली.. गेले दोन दिवस मोबाईलव्यतिरिक्त, एसीव्यतिरिक्त, निसर्गात अगदी असंच नदीकाठी राहण्याची संधी मिळाली, याचं अप्रूप वाटत राहिलं.. अरे आपण तर मूळचे इथलेच आहोत, असं वाटायला लागलं.. धावपळीच्या, ऐषोरामाच्या जगात आपल्या शारिरिक क्षमतांसाठी, एक नवी पिढी घडवण्यासाठी झगडणाऱ्या या सगळ्या मंडळींना एक सलाम करावासा वाटला.. परतताना जाणवत राहिलं की आपण स्वतःकडे, फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे ‘..नाहीतर छाती फुटून मी मरेन’ असं म्हणण्याची पाळी आपणावर येणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 6, 2014, 17:52


comments powered by Disqus