राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म कसा झाला याची एका रिपोर्टरच्या नजरेतून टीपलेली कहाणी... पुण्यात रिपोर्टिंग करत असतांना आलेला हा अनुभव! आता आठवणींचा एक एक तुकडा जोडतांना चित्र स्पष्ट होत जातं...
स्थळ पुणे. वर्ष 1999. एप्रिल महिन्याचे शेवटचे दिवस.
`व्हय मी सावित्रीबाई` ह्या एकपात्री प्रयोग सादर करणा-या सुषमा देशपांडे वर्तमानपत्रांच्या कार्यालयात चीफ रिपोर्टरांना भेटत होत्या. मे महिन्यात बायोटेक्नॉलॉजी या विषयावर एक नॅशनल सेमिनार आयोजित करण्यात आला होता. त्याचे निमंत्रण त्या सगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन देत होत्या. या सेमिनारचे उद्घाटन करणार होते 12 व्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार. खरं तर यात लक्षवेधी काहीही नव्हतं. शरद पवारांना बायोटेकमध्ये रस आहे हे सगळ्यांनाच माहित होतं. त्यामुळं करत असतील शरद पवार अजून एका सेमिनारचे उद्घाटन असं सगळ्यांना वाटलं. हे सेमिनारही भरणार होतं शरद पवारांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणा-या थरकुडे नावाच्या उद्योजकाच्या हॉटेल प्रेसिंडेट मध्ये. हे प्रेसिडेंट हॉटेल एरंडवण्यात प्रभात रोडवर नव्यानचं सुरु झालं होतं. निमंत्रण ठेवून घेऊन एखादा जनरल बीटचा रिपोर्टर किंवा फोटोग्राफर उद्घाटनाला पाठवायचा असं ठरवत चीफ रिपोर्टरांनी(सर्वसाधारणपणे वृत्तपत्रांमध्ये चीफ रिपोर्टर कुठला कार्यक्रम कव्हर करायचा आणि त्याला कोणाला पाठवायचे हे ठरवतात) त्या निमंत्रणाची फारशी दखल पुण्यातल्या वृत्तपत्रांनी घेतली नाही.
पण...
नंतर असं काही घडलं की फक्त पुण्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या मीडियाला त्या प्रेसिडंट हॉटेलमधील सेमिनारला गर्दी करावी लागली.
हे कसं घडलं ते जाणून घेण्यापूर्वी काही नाटयमय घडामोडीं पाहूया ...
स्थळ नवी दिल्ली. मे १५, १९९९काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी दिल्लीतली बैठक. १३ व्या लोकसभेच्या निवडणुकासमोर आहेत आणि त्यांना कसं सामोरं जावं यावर वर्कींग कमिटीत चर्चा सुरू होती. या बैठकीत वर्किंग कमिटीच्या तीन सदस्यांनी प्राप्त राजकीय परिस्थितीतून काँग्रेसनं काय करावं यासाठी काही सूचना केल्या. सोनिया गांधी नुकत्याच राजकारणात सक्रीय झाल्या होत्या. गांधी परिवार राजकारणात सक्रीय नसल्यानं सीताराम केसरी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद होतं. सोनिया सक्रीय झाल्यानंतर अध्यक्षपद साहजिकच सोनियांकडे आलं. त्यांच्याच अध्यक्षतेखाली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरु होती. याच बैठकीत काय झालं याचं वर्णन सोनियांचे निकटवर्ती के. व्ही. थ़ॉमस यांनी `सोनिया - द बिलव्हड ऑफ द मासेस` या पुस्तकात केलं आहे.
थॉमस पुस्तकात म्हणतात की “शरद पवारांना पार्टीत सेंकड-इन- कमांड व्हायचं होतं. जर सोनिया पंतप्रधानपद झाल्या नाहीत तर आपली पंतप्रधान होण्याची इच्छा कधीच पूर्ण होई शकणार नाही याची कल्पना आल्यानंच त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीत एक खेळी केली”.
त्या बैठकीला थॉमस हजर होते आणि तिथं काय घडलं याचं वर्णन थॉमस यांनी असं केलं आहे "पांढ-या सोफ्यावर मागे रेलत शरद पवार यांनी पुर्णो संगमांकडे पहात स्मित केलं. पक्षात बंड करण्याचा तो हिरवा कंदिल होता- या बंडाची त्या बैठकीत उपस्थित असलेल्या अनेकांना कल्पना होती." याच बैठकीत शरद पवार, पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर या सदस्यांनी ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माला कारण ठरलेली मागणी केली.
``राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान ही पदे नैसर्गिक रित्या भारतात जन्मलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठीच असावीत अशी घटनेत दुरुस्ती करावी अशी मागणी काँग्रेसने करावी`" असा आग्रह शरद पवार, पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर यांनी धरला. “वंशानं आणि जन्मानं भारतीय असलेला व्यक्ती सोडून इतर कोणी देशाचं प्रमुख होणं शक्य नाही," असं सांगत सोनिया गांधींच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेला थेट आव्हानच दिलं. अर्थात सोनिया गांधींनी पक्षाची उभारणी करण्यात दिलेलं योगदान किती महान आहे हेही सांगत आपला विरोध सोनियांनी पक्ष कार्य करण्याला नसून पंतप्रधान होण्याला आहे हेही पवार-संगमा-अन्वर यांनी खुबीनं स्पष्ट केलं. सोनिया समर्थकांच्या मते हे सोनिया गांधींविरुद्ध सरळसरळ बंड होतं तर शरद पवार आणि त्यांच्या सहका-यांच्या मते ते काँग्रेसला पुढे नेणारीच भूमिका मांडत होते! पवार, संगमा आणि अन्वर आणि इतर सदस्य यांच्यात मग वाद झाला. 12 व्या लोकसभेत विरोधी पक्ष नेते असलेल्या पवारांनी अशी भूमिका घेतल्यामुळं सोनिया गांधी शांतपणे बैठकीतून निघून गेल्या आणि आपली ही शेवटची काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक असल्याचं या तिघांनी प्रणव मुखर्जींना सांगितल्याची नोंद के.व्ही. थॉमस यांनी केली आहे. पवार-संगमा-अन्वर यांनी ही भूमिका घेतल्यानं राजकीय भूकंप झाला! नवी दिल्लीपासून बारामतीतल्या शरद पवारांच्या काटयाची वाडी पर्यंत याच विषयाची चर्चा सुरु झाली !
पुर्णो संगमा, शरद पवार आणि तारिक अन्वर यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राची प्रत पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना दिली.
"It is not possible that a country of 980 million, with a wealth of education, competence and ability, can have anyone other than Indian, born of Indian soil to head government," असे सांगत या पत्रात एक महत्वाची मागणी करण्यात आली होती.
"The Congress manifesto should suggest an amendment to the constitution of India, to the effect that offices of the President, Vice President and Prime Minister can only be held by natural born Indian citizens,"ही ती मागणी होती. सोनिया गांधींवर नाव न घेता थेट हल्ला करण्यात आला होता.
नवी दिल्लीत हे घडत असतांना पवार कुठे गेलेत याचा शोध फक्त पुण्यातीलच नव्हे तर मुंबई आणि नवी दिल्लीचेही पत्रकार घेऊ लागले.
पवार होते कुठे ? नवी दिल्लीत खळबळ माजवून पवार प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या बायोटेक्नॉलॉजी सेमिनारला हजेरी लावत होते !
तेच बायोटेक्नॉलॉजी सेमिनार ज्याची निमंत्रणं काही दिवसांपुर्वीच सुषमा देशपांडे वर्तमानपत्रांना देऊन आल्या होत्या !
देशभरातला मिडीया हॉटेल प्रेसिडेंटसमोर दाखल झाला. पण शरद पवार मिडीयाशी फारसे काही बोलायला तयार नव्हते.
"आम्हाला जे काही सांगायचे आहे ते आम्ही वर्किंग कमिटीमध्ये सांगितलं. आता मी बायोटेक्नॉलॉजी सेमिनारमध्ये भाग घेतो आहे. देशासाठी या घडीला बायोटेक्नॉलॉजी हा विषय महत्वाचा आहे," या पलीकडे शरद पवार काही बोलायला तयार नव्हते ! शरद पवारांना नेमकं हवं आहे तरी काय ? शरद पवारांनी सोनियांच्या पाठीत खंजिर खुपसला काय ? पवारांच्या बंडाचा देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार ? याची जोरदार चर्चा सुरु झाली होती आणि शरद पवार बायोटेक्नॉलॉजित रमले होते !
अर्थात काय सुरु आहे याची पूर्ण कल्पना शरद पवारांना होतीच.. त्यांनीच रचलेल्या पटकथेप्रमाणे राजकीय चित्रपट रंगत होता !
कधी प्रेसिटेंड ह़ॉटेलमध्ये तर कधी बारामती होस्टेलला शरद पवार आम्हा पत्रकारांना भेटत होते. पुण्यातीलच नव्हे तर देशभरातील पत्रकारांसाठी ही मोठी स्टोरी होती. बारामती होस्टेल म्हणजे पत्रकार नगरच्या समोर असलेली एक इमारत. इथे बारामतीची पुण्यात शिकत असलेली मुलं राहतात.. या इमारतीला लागूनच एका बैठया बंगल्यात शरद पवारांची केबीन आहे. पुण्यात आले की इथेच ते कार्यकर्त्यांना भेटतात. तिथं झुलत्या खुर्चीत बसून फोन घेत नेहमीच्या स्टाईलमध्ये स्मित करत, "आम्ही आमचा मुद्दा वर्किंग कमिटीत मांडला आहे. आता पक्ष त्याबाबत निर्णय घेईल हे बंड वगैरे काही नसून लोकशाही पद्धतीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे," असं पवार सांगत होते. दिवसातून अनेकदा पवारांना भेटूनही बातमीसाठी हाती यापलिकडे काही लागत नव्हतं. पवारांपाठोपाठ अनेक मोठे नेते काँग्रेस सोडतील असं सांगण्यात येत होतं. पण या तिघांशिवाय देशपातळीवर मोठं नाव समोर येत नव्हतं.
शरद पवारांसह,संगमा,अन्वर यांची पक्षातून शिस्त मोडली म्हणून हकालपट्टी करावी असा आग्रह काँग्रेस वर्किंग कमिटीतील काही सदस्य करत होते. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणत शरद पवार ब्रुटस(शेक्सपियरच्या नाटकातील एक पात्र ! पुढ्च्या प्रचारात त्याचा उल्लेख काँग्रेसनेते अनंतराव थोपटे वारंवार करत !) आहेत...अशी टीका शरद पवार विरोधक करत होते.
पुण्यात विठ्ठलराव गाडगीळ हे शरद पवार विरोधक आणि गांधी घराण्याचे जुने विश्वासू मानले जात. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर ते थोडे मागे पडले होते. विठ्ठलराव गाडगीळांना शरद पवारांच्या डोक्यात काय आहे याचा पूर्ण अंदाज आला होता.त्यामुळं गाडगीळांनी काँग्रेस नेतृत्वाला अनुभवी सल्ला दिला.
"शरद पवार, पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्याची गरज नाही. तुम्ही केलेली सुचनेवर आम्ही विचार करत आहोत, त्यावर चर्चेअंती योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं सांगून या विषयाचं घोंगडं भिजत ठेवावं," असा सल्ला विठ्ठलराव गाडगीळांचा होता.
शरद पवार आपल्यावर कारवाई ओढवून घेतील आणि काँग्रेसनेच आपल्याला काढले असे सांगत पुढची खेळी खेळतील याचा अंदाज शरद पवारांना ओळखणा-या विठ्ठलराव गाडगीळांना अचूक होता.
पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. सोनिया निष्ठा दाखवण्यासाठी पवार-संगमा-अन्वर यांना पक्षातून काढावं अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत होती.
सोनियांच्या इटालियन असण्याचा पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा काँग्रेस सहन करणं शक्यच नव्हतं. आपल्यावर कारवाई कधी होते याची जणू पवार वाटच पहात होते. त्याप्रमाणे काँग्रेस वर्किंग कमिटीच्या उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीत शरद पवार, संगमा आणि अन्वर यांनी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थळ प्रेसिडेंट हॉटेल, पुणे, 20 मे 1999. रात्री दहाच्या सुमारास शरद पवारांना एक फोन आला. काँग्रेसनं शरद पवारांना पक्षातून काढून टाकल्याची माहिती या फोनव्दारे मिळाली. संगमा आणि अन्वर यांच्यावरही कारवाई झाली होती.
" चला, डोक्यावरचं ओझं उतरलं ! " प्रेसिडेंट ह़ॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या पवारांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनीच लिहिलेल्या चित्रपटाचा तो अपेक्षित असलेला क्लायमॅक्स होता !
“काँग्रेसमध्ये आता लोकशाही राहिली नाही. आम्ही फक्त मत व्यक्त केलं तर काँग्रेसनं आमच्यावर कारवाई केली. आम्हाला घराबाहेर काढलं. आता आम्हाला स्वत:चं घर बांधावं लागणार,” असं सांगत नवा पक्ष काढत असल्याचे स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिले.
काँग्रेसनं कारवाई केल्यानंतर शरद पवार नवा पक्ष काढत असल्याची बातमी वा-यासारखी पसरली. देशभर पवारांच्या बंडाची आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईची चर्चा सुरु झाली.
शरद पवार, पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर यांचे सूत जुळले कधी ? बंडाची तयारी त्यांनी कधी केली ? परदेशीपणाचा मुद्दा मांडणारे इंग्रजी पत्र नेमकं कोणी लिहिलं असेल ? याची चर्चा पुण्यात सुरु होती.
शरद पवार यांनी नवा पक्ष काढण्याची घोषणा केल्यानं काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवारांसोबत कोण कोण जाणार याची चर्चा सुरु झाली, अजित पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील हे मुख्य नेते शरद पवारांसोबत होतेच. इतरही लहान मोठे सरदार शरद पवारांना येऊन भेटू लागले आणि शरद पवारांमागे काँग्रेसचा एक मोठा गट जाणार हे स्पष्ट होत गेलं.
सोनियांच्या परदेशी पणाबद्दल आपण नेमकी काय भूमिका मांडली आणि काँग्रेसनं कशी त्याची दखल न घेता आपल्यावरच कारवाई केली आता नवा मार्ग शोधावा लागेल अंसं सांगत पवार नव्या पक्षाची बांधणी करत होते. अजून पक्षाचं नाव ठरत नव्हतं. शरद पवार भाजपशीही हातमिळवणी करतात की काय अशीही चर्चा सुरु होती. दिवसातून अनेकदा पत्रकार शरद पवारांना भेटत होते. पवार पुढं काय करणार हे जाणून घेत होते.
"आम्ही भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतरावर राहणार आहोत," शरद पवार वारंवार सांगत होते. नव्या पक्षात काँग्रेस हा शब्द असेलच आम्ही काँग्रेस विचारसरणी मानतो असेही ते सांगत असत. अखेर शरद पवारांनी नव्या पक्षाची घोषणा केली...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.... ! 10 जून 1999 हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस!सोनियांच्या परदेशी मुळाचा प्रश्न उपस्थित केला म्हणून राष्ट्रवादी ! मूळ विचारसरणी काँग्रेसची म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस! हा नवा पक्ष जोमात होता.. मुंबईत मोठा मेळावा झाला.. त्याला प्रचंड गर्दी जमली.. राष्ट्रवादीच्या कार्यालयात या गर्दीचा फोटो ठळकपणे लावलेला असे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरुद्ध जोमानं लढले.. पवारांनी पाठीत खंजीर खुपसला, पवार ‘ब्रुटस’ आहेत त्यांचा पक्ष ‘लोटस’ काँग्रेस आहे अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली. शरद पवार आणि भाजपची हातमिळवणी हाही चर्चेचा विषय होता. पण भाजप आणि आपला काहीच संबंध नाही. भाजपची विचारसरणी आपल्याला मान्य नाही असं पवार वारंवार सांगत होते.
अखेर एकमेकांशी लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत १९९९ मध्ये महाराष्ट्रात सत्ता मिळवली...
२०१४ उजाडलं तरी अजून भाजप-सेना युतीला सत्ता मिळवता आलेली नाही. आता महायुती करुन ते सत्ता परत मिळवायची स्वप्न पहात आहेत..
विशेष म्हणजे स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे.. संसद दे ग्रामपंचायत सगळीकडे पक्षानं विजयाची नोंद केली आहे. विरोधक जोरदार टीकाही करताहेत तसा जनाधार वाढतोही आहे.
हा पक्ष जन्मतांनाच्या काही क्षणांचा मला साक्षीदार होता आलं.. पत्रकारितेतला हा एक रोमहर्षक अनुभव होता !
राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की मला नेहमी ती 1999तली पुण्यातली एप्रिलची दुपार आठवते आणि बायोटेक्नालॉजी सेमिनारचं निमंत्रण घेऊन आलेल्या सुषमा देशपांडे आठवतात !!
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 23, 2014, 19:30