Last Updated: Thursday, January 31, 2013, 11:45
रोहित गोळे, कॉपी रायटर, 24taas.com
अभिनेता शाहरुख खानची पाठराखण करण्यासाठी आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक पुढे सरसावले आहेत. शाहरूख खानने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या वादात आता रेहमान मलिक यांनी उडी घेतली आहे.
पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना शाहरूख खानचा बराच पुळका आलेला दिसतो
आहे.
पाकिस्तानमध्ये असेलेली असुरक्षितता, क्रिकेट सामन्यांवर दहशतवाद्यांचे सावट हे सारं काही पाकिस्तानच्या उंबरठ्यावर ठाण मांडून बसलं आहे, आणि तरीही त्यांची काळजी करायची सोडून गृहमंत्री भारतीय अभिनेता शाहरूख खान याचीच काळजी वाहतायेत.
`भारतानं अभिनेता शाहरुख खानला योग्य ती सुरक्षा पुरवावी असं रेहमान मलिक म्हणाले. `शाहरुख हा चित्रपट अभिनेता आहे. त्यामुळं सर्व भारतीयांनी त्याला संरक्षण द्यायला हवं. `जे कोणी शाहरुखबाबत बोलत आहेत ते त्याला धमकावत असल्याचं सांगत त्यांनी असं करु नये असंही रेहमान मलिक म्हणाले.`
त्यामुळे स्वत:चं ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ! अशीच काहीशी अवस्था रेहमान मलिका यांची झाली आहे. असं असतानाही शाहरूखबाबतची चिंता त्यांना काही शांत बसू देत नाहीये. आणि त्यामुळेच त्यांनी भारत सरकारलाही सल्ला देण्यास मागे पुढे पाहिले नाही. हाच समजुतदारपणा त्यांनी भारत-पाक मैत्रीबाबत दाखवला असता, सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना काळजी करण्याचं कारणच पडलं नसतं.
नेहमीच भारताच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान हा डोईजड होण्याआधीच त्याला त्याची जागा दाखवून देण्याची गरज आहे. भारताच्या अंतर्गत गोष्टीत नाक खूपसून भारताला डिवचण्याची एकही संधी पाक सोडत नाही हे मात्र नक्की
काही भारतीय राजकारणी आपल्याला देशद्रोही समजत असल्याचं वक्तव्य शाहरुख खाननं एका नियतकालीकाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. आणि त्यामुळेच शाहरूखच्या मदतीला पाकिस्तानचे गृहमंत्री मात्र पटकन पुढे सरसावले आहेत.
First Published: Tuesday, January 29, 2013, 10:14