‘लाईफ ऑफ पाय’... जगण्याची कहाणी , life of pi film review

‘लाईफ ऑफ पाय’... जगण्याची कहाणी

‘लाईफ ऑफ पाय’... जगण्याची कहाणी
शुभांगी पालवे
shubha.palve@gmail.com


पाय... आपल्यातील बऱ्याच जणांना बोअरिंग आणि किचकट वाटणाऱ्या गणितातला हा ‘पाय’… तीन पूर्णांक चौदा (३.१४)... आणि हेच नाव असलेल्या एका मुलाची ही कहाणी... बॉक्सऑफिसवर बरीच भाव खाऊन गेलीय. पण, हे बोअरिंग नाव असलेल्या मुलाची ही कहाणी अजिबातच बोअरिंग वाटत नाही. बरं, हे किचकट नाव का दिलं गेलं असेल या मुलाला? असाही प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल... साहजिकच आहे म्हणा ते... पण, ते उत्तर न सांगितलेलंच बरं... कारण, हा मुलगा सिनेमाच्या सुरुवातीलाच त्याचं नाव असं अजब-गजब का? या प्रश्नाचं उत्तर देतो आणि ते पाहणंच जास्त रंजक ठरेल.

कहाणी सुरू होते ती पाँडिचेरीमधल्या एका छोट्या शहरातून... पण, काही कारणास्तव ‘पाय’च्या वडिलांवर कुटुंबासहित ही जागा सोडून कॅनडाला स्थलांतर करण्याची वेळ येते. का विचारु नकाच…(गोष्ट तुम्ही स्वत: पाहिलेलीच बरी)… आपल्या प्राणी संग्रहालयातील सगळा लवाजमा घेऊन पायचे वडील कुटुंबासहीत प्रवासासाठी सज्ज होतात. त्यानंतर सुरु होतो पायचा पाण्यावरून प्रवास... समुद्रात आलेलं वादळ आणि त्यावर हेलकाव्यांत समुद्रात गडप झालेली बोट... आणि या घटनेत सगळं काही हरवून बसलेला पाय... हा प्रवास तुम्हाला ‘टायटानिक’ सिनेमाची आठवण नक्कीच करून देतो… हा सिनेमा ‘टू’ डी आणि ‘थी’ डी स्वरुपात प्रदर्शित झालाय. त्यामुळे ‘पाय’चे पाण्यातील प्रवासाचे रंजक अनुभव आपल्याला आणखीनच घट्ट धरून ठेवतात.

लहानपणी, देव म्हणजे नक्की काय? याचं उत्तर शोधणाऱ्या पायला आता कोडं पडलेलं असतं ते स्वत:च्या जिवंत राहण्याचं... आता सगळं काही संपलंय असं वाटत असतानाही आपण का वाचलोय, असा प्रश्न पडणारा आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी धडपडणारा ‘पाय’... आणि त्याच्या सोबतीला बोटीत आहे एक वाघ... त्या बिचाऱ्यानंही या घटनेत आपले प्राण कसेबसे वाचवून या बोटीत प्रवेश केलेला असतो आणि आता सुरू होतो ‘पाय’चा खरा जगण्याचा आणि जगवण्याचा संघर्ष... एकाच छोट्या नावेत एक हिंस्र प्राणी आणि मनुष्य यापैकी शेवटी कोण वाचतं? हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावाच लागणार आहे.
‘लाईफ ऑफ पाय’... जगण्याची कहाणी

काही थरारक प्रसंग पडद्यावर थ्रीडी स्वरुपात उभे राहिले की ते सरळ-सरळच अंगावर येतात. यातलं बरचसे खऱ्याखुऱ्या प्राण्यांवर चित्रित केले असले तरी बराचसा भाग टेक्नॉलॉजिची कमाल आहे. पण, सिनेमांतली अनेक दृश्यं (उदा. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात समुद्रभर पसरलेल्या जेली फिशमुळे दिसणारं दृश्यं, एक भला मोठा व्हेल पायच्या डोळ्यांसमोरून आकाशात झेपावतो आणि पुन्हा पलटी मारतो तेव्हाचं दृश्यं, समुद्राचे अंतरंगाची दृश्यं) डोळ्यांना खुपच आरामदायक वाटतात. तर काही दृश्यं मूळ परिस्थितीतलं गांभीर्य बाजूला ठेऊन अनेक सिरीअस सिन्सदेखील प्रेक्षकांना हसायला भाग पाडतात. माणसाच्या वृत्तीतला चिवटपणा, जगण्याची धडपड, प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आणि तो अर्थ हाती लागेपर्यंत विचार करण्याची प्रक्रिया... आणि पुन्हा हे सगळं परिस्थितीनुसार बदलणारं... तसंच काहीसं प्राण्यांचही असतंच की. म्हणूनच माणसाइतक्या स्पष्टपणे नाही पण ते जाणवून देणाऱ्या प्रतिक्रिया त्यांच्याकडूनही मिळतात... न बोलताही स्पष्ट उमजणाऱ्या प्रतिक्रिया...

तैवानी दिग्दर्शक अँग ली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘लाईफ ऑफ पाय’मध्ये तरुण ‘पाय’च्या भूमिकेत सूरज शर्मा हा दिल्लीचा तरुण खुपच परफेक्ट वाटतो तर प्रौढ पायच्या भूमिकेत इरफान खान दिसतो. ‘पाय’च्या 'अम्मा'ची छोटीशी पण आपली छाप पाडणारी भूमिका तब्बूनं रेखाटलीय. मूळ कथा यान मार्टेल यांच्या कादंबरीवर आधारलेली... भारतात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा चार भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमातून हॉलिवूड आणि बॉलिवूडचे रंग सुंदर पद्धतीनं एकमेकांत मिसळलेले जाणवतात.

First Published: Tuesday, November 27, 2012, 18:42


comments powered by Disqus