Last Updated: Friday, April 18, 2014, 14:49
www.24taas.com, प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबईबीड जिल्ह्यातील दरडवाडी या एका खेडयातून सुरु झालेला वामन केंद्रेंचा प्रवास आता नवी दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ अर्थात राष्ट्रीय नाटय विद्यालयाच्या विशाल प्रांगणात विस्तारतो आहे. वामन केंद्रे म्हणजे मराठी मातीतले अस्सल नाटयकर्मी आणि अभ्यासक. एनएसडीच्या संचालकपदी वामन केंद्रे यांची निवड झाल्याचं जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया होती ती आनंदाची. एका सच्च्या रंगकर्मीला योग्य संधी मिळाली असल्याची भावना नाटयप्रेमींमध्ये होती. एका मराठी रंगकर्मीची निवड या पदावर होण्याची ही पहिलीच वेळ होती. वामन केंद्रे एनएसडीचेच विद्यार्थी. एकेकाळी जिथे विद्यार्थी म्हणून वावरले त्याच एनएसडीमध्ये आता वामन केंद्रे संचालक झाले आहेत. दरडवाडी, मुंबई ते आता नवी दिल्ली…एक एक पाऊल टाकत वामन केंद्रे पुढे चालले आहेत…
वामन केंद्रे म्हटले की आठवतं, ‘झुलवा’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘नातीगोती’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘रणांगण’, ‘राहिले दूर घर माझे’ चे दिग्दर्शन… वामन केंद्रे म्हणजे सतत नवे नवे प्रयोग. नवे आयाम. नवी झेप. आपल्या रंगपीठ संस्थेतर्फे त्यांनी एकाच संचात तीन भाषेतलं नाटक सादर केलं. ‘प्रिया बावरी’ मराठीत, ‘मोहे पिया’ हिंदीत तर ‘ओ माय लव्ह’ इंग्रजीत.. असा प्रयोग यापूर्वी तरी कोणी सादर केला नव्हता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठीही त्यांनी ‘लडी नजरीया’ आणि ‘जानेमन’ ही नाटके दिग्दर्शित केली. संगीत नाटक अकादमी हा मानाचा पुरस्कारही त्यांना नुकताच मिळाला. त्यापाठोपाठ एसएसडीचे संचालकपद…
सन्मान आणि जबाबदारीगेली दहा वर्षे वामन केंद्रे मुंबई विद्यापीठाच्या ‘अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स’चे संचालक आहेत. शून्यातून हा विभाग उभा करत तो केंद्रेंनी नावारुपाला आणला. अनेक विद्यार्थी घडवले. एनएसडीचे संचालक झाल्याची बातमी आली आणि मग केंद्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. वामन केंद्रे यांनी भेटण्यासाठी मुंबई विद्यापाठीतल्या कलिना कॅम्पसकडे पावलं वळली. ‘केंद्रे सरांकडे जायचं आहे होय ? असे पुढे जा आणि डावीकडे वळा. पुढेच आंबेडकर भवन….’ झुपकेदार मिशा असलेल्या टोपी घातलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बोलण्यातून वामन केंद्रे यांच्याबद्दलची आपुलकी डोकावत होती. केंद्रे यांनी किती तळापर्यंत लोकसंपर्क साधला होता त्याची ती पावतीच होती. पावसाळी हवेत झाडांमधून मार्ग काढत एक एक इमारत मागे आंबेडकर भवन गाठलं. आंबेडकर भवनाच्या दारात केंद्रेंनीच स्थापन केलेल्या ‘अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी स्वागताला उभा होता.
आपले सर एनएसडीचे संचालक झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दुस-या मजल्यावर ‘अकादमी ऑफ थिएटर ऑर्ट्स’मध्ये वामन केंद्रे यांची केबीनमध्ये फुलांचे गुच्छ स्वागत करत होते. विद्यार्थी आणि हितचिंतक, वामन केंद्रे यांची पत्नी नाटयकर्मी गौरी केंद्रे, मुलगा,ऋत्विक सगळ्यांचेच चेहरे फुलून आलेले होते. आलेल्या प्रत्येकाच्या हातावर पेढा ठेवला जात होता. केंद्रेच्या हातातला मोबाईल आणि टेबलावरचा लॅंडलाईन फोन सतत वाजत होता. आपल्या खुर्चीत बसून गुलाबी झब्बा घातलेले केंद्रे हसतमुखानं पण शांतपणे शुभेच्छांचा स्वीकार करत होते. शुभेच्छांचा वर्षाव झेलतच केंद्रेंनी माझ्याशी संवाद साधला.
यांची आठवण होते…एनएसडीचे संचालक म्हणून निवड होण्याच्या क्षणी कोणाची आठवण होते असे विचारताच वामन केंद्रे भावूक झाले. सर्वप्रथम त्यांना आठवले ते वडील माधवराव केंद्रे. माधवराव यांची ओळख दरडवाडीच्या पंचक्रोशीत होती ती एक अस्सल भारूडकार म्हणून. या शेतकरी कलावंतानं वामन केंद्रे यांच्यातला कलावंत फुलवला. दोन-अडीच वर्षांपूर्वी माधवरावाचं निधन झालं. व्ही. एम. शहा, बी. व्ही.कारंथ, डॉ. पिल्ले या आपल्या गुरुंची आठवण केंद्रेंना मग आली. आदरानं त्यांनी उल्लेख केला तो पु. ल. देशपांडे आणि डॉ. अशोक रानडे यांचा.
त्यांच्यापासून खूप शिकायला मिळालं, कलेची जाण तर वाढलीच पण शिस्तही शिकायला मिळाली याचा केंद्रेंनी आवर्जून उल्लेख केला. नंतर निवड समितीचे आणि एनएसडीच्या संचालकपदी निवड होण्यासाठी मदत करणाऱ्या राजकारण्यांचेही ते आभार मानायला विसरले नाहीत. नाटकातले आपले सगळे सहकारी, कलावंत-लेखक, बॅकस्टेजवाले, समीक्षक-टीकाकार आणि मुख्य म्हणजे प्रेक्षक यांचा आवर्जून उल्लेख केंद्रेंनी केला. तसाच आदराने उल्लेख केला तो मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा. मुणगेकरांनीच केंद्रेंना विद्यापीठात आणले होतं
…
वामन केंद्रे एक सच्चा माणूसआपला जवळचा मित्र आणि नवरा असलेल्या वामनची एनएसडीच्या संचालकपदी निवड झाल्यामुळं गौरी केंद्रे आनंदून गेल्या होत्या. वामन केंद्रे यांच्या केबीनमध्ये त्यांनाही शुभेच्छा दिल्या जात होत्या. एक सच्चा माणूस, एक प्रतिभाशाली आणि नाटयकलेच्या सर्व क्षेत्रांमध्ये गती असलेला कलावंत असं वर्णन करत गौरी केंद्रेंनी वामन केंद्रेंच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. गौरी केंद्रे इतकं वामन केंद्रे यांना कोण ओळखत होतं? आपला नवरा, सहकारी, जवळचा मित्र अशा विविध नात्यांनी गौरी, वामन केंद्रेंना ओळखतात.
गौरी केंद्रे स्वत:च रंगकर्मी. बालरंगभूमीवर त्याचं काम. “जेव्हा केव्हा मी अडखळते तेव्हा मी वामनची मदत घेते. तो मला हमखास मार्ग दाखवतो.. कुठेही अडले, अगदी संगीताच्या बाबतीतही तरी. वामनला संगीताची प्रचंड जाण आहे याची अनेकांना माहिती नाही,’ गौरी सांगतात. केंद्रेंचा मुलगा ऋत्विक फेसबुक अपटेड करता करता वडिलांचं होणारं कौतुक आनंदानं पहात असतो. फेसबुकवरही वामन केंद्रे यांचं अभिनंदन होत असतं.
‘एनएसडीला उर्जा प्राप्त करुन देणार’
वामन केंद्रे एनएसडीचेच माजी विद्यार्थी. त्यामुळे एनएसडी त्यांना नवी नाही. आता केंद्रे यांच्यासमोर स्वप्न आहे ते एनएसडी सर्वसामांन्यांपर्यंत नेण्याचं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अधिक ‘नॅशनल’ कशी होईल? भारतभरातल्या सगळ्या भाषेतल्या सगळ्या नाटयकर्मींना ती आपली कशी वाटेल? यासाठी आपण प्रयत्न करू असं केंद्रेंनी आवर्जून सांगितलं… ऩाटयकलेसाठी एक प्रगत संशोधन केंद्र, टीव्ही, नाटक, मीडिया, सिनेमा या सगळ्यांना कवेत घेणारा एखादा फ्यूजन कोर्स, काळाशी सूसंगत नाटयप्रशिक्षण, नाटयकलेच्या सगळ्या अंगाचं वेध घेणार, नाटयकलेचे सगळे पदर उलगडून दाखवणार म्युझियम… अशी कितीतरी स्वप्न घेऊन केंद्रे एनएसडीत जाताहेत.
निरोप घेतांना…केंद्रे म्हणजे आपल्या मातीतलं अस्सल व्यक्तिमत्व… एनएसडीला उर्जा प्राप्त करुन देणं, तीचं सौदर्यात्मक महत्व वाढवणं, उपक्रमांची उंची वाढवणं, त्यात नाविन्य आणणं, नवी प्रकाशने, नवे कोर्सेस सुरु करणं असे अनेक संकल्प घेऊन केंद्रे नवी दिल्लीत दाखल होताहेत…वामन केंद्रे यांच्या काळात एनएसडीनं ऩवी उंची गाठावी. एनएसडी लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं त्याचं स्वप्न साकार व्हावं यासाठी शुभेच्छा देत असतांनाच वामन केंद्रेंचा मोबाईल पुन्हा वाजतो….पलीकडून मिळणाऱ्या शुभेच्छा स्वीकारतांना हात हलवत हसतमुखानं वामन केंद्रे तुमचा निरोप घेत घेतात..
प्रत्येक नाटयकर्मीला नवी दिल्लीची एनएसडी आपली वाटो, एनएसडी खरचं लोकांपर्यंत जावो,, या मातीचा अस्सल सुगंध एसएसडीच्या कामातून सर्वत्र दरवळो….अशीच शुभेच्छा देत मीही बाहेर पडलो
या ब्लॉगचे लेखक झी २४ तासमध्ये सिनिअर प्रोड्युसर आहेत.*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, July 29, 2013, 18:11