सुखी आयुष्याचं मंत्र सांगणारेः अधिक शिरोडकर, Noted lawyer Adhik Shirodkar no more

सुखी आयुष्याचा मंत्र सांगणारेः अधिक शिरोडकर

सुखी आयुष्याचा मंत्र सांगणारेः अधिक शिरोडकर
www.24taas.com, प्रकाश दांडगे, मुंबई

सदैव हसतमुख, प्रत्येक वेळी भेट झाल्यावर आपुलकीने बोलणारे अधिक शिरोडकर गेले. एक ज्येष्ठ वकील, शिवसेनेचे माजी खासदार आणि एक उत्कृष्ठ वन्यजीव छायाचित्रकार..काही दिवसांपूर्वीच त्यांची जहांगिर कला दालनात भेट झाली होती. छायाचित्रकार बिभास आमोणकरांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होते, गानसरस्वती किशोरी आमोणकरांच्या हस्ते. तिथे अधिक शिरोडकर मुख्य वक्ते होते. प्रसन्नपणे ते प्रत्येकाशी बोलत होते..त्यांच्याशी गप्पा मारल्या. एका खुर्चीत ते प्रसन्नपणे बसलेले होते.

सुखी आयुष्याचा मंत्र सांगणारेः अधिक शिरोडकर

सिल्कचा जांभळा झब्बा पांढरा पायजमा. हातात छानशी काठी आणि चेह-यावर मंद स्मित.. प्रसिद्ध एरियल फोटोग्राफर गोपाळ बोधेही होते. ऐंशी पार केलेल्या अधिक शिरोडकरांनी जीवनाबद्दल, जगावे कसे यावर भाष्य केले. "मी आयुष्यात एक नियम पाळला. दुस-यानं जसं आपल्याशी वागू नये असं आपल्याला वाटतं, तसं आपणही दुस-याशी वागू नये! एवढा एक नियम पाळा. आयुष्य सुखी होईल... " ते सांगत होते. "निसर्गाची ओढ आणि छायाचित्रणाची आवड यामुळं मला मन शांत ठेवण्यासाठी व्यसनं करावी लागली नाहीत. मी अनेक तरुण वकील दारु, सिगरेट मध्ये अडकलेले पाहिलेत. मी त्यांनाही निसर्गात फिरण्याचा सल्ला देतो. मी जगभरचा निसर्ग पाहिला. छायाचित्रं काढली. त्यातून मला आनंद मिळाला! "

अधिक शिरोडकर आपला अनुभव सांगत होते. अधिक शिरोडकर शिवसेनाप्रमुखांचे मित्र. त्यांचे सल्लागार. शिरोडकर राज्यसभेचे खासदारही होते. "मी बाळासाहेबांना सांगितले होते, मी राज्यसभेत गोंधळ घालणार नाही. घोषणा देत वेल मध्ये उतरणार नाही. संसदेत चाललेला गोंधळ बघून मला वाईट वाटतं.." शिरोडकर सांगत होते. राज आणि उद्धव यांच्यात सूप आणि बटाटावडा आणि खंजिर खुपसणे यावर होत असलेले वाद टाळायला हवे होते असं मत शिरोडकरांनी व्यक्त केलं. पण ते खरे रमले ते निसर्ग आणि छायाचित्रणाबाबतच्या गप्पांमध्ये. "आता मी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात चाललोय. ही माझी शेवटची वाईल्डलाईफ टूर.." अधिक शिरोडकर म्हणाले. पण ही ट्रिप त्यांना करता आलीच नाही. त्या आधीच शिरोडकर गेले. ते शेवटपर्यंत फिट होते. "मी खूप चालायचो. त्यामुळं फिट राहिलो.नंतर गुढगे दुखायला लागले. डॉ नंदू लाड यांनी गुढग्याचे ऑपरेशन केले. आता छान वाटतयं..." शिरोडकर सांगत होते...त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्यांनी प्रसन्नपणे हसत निरोप दिला....

त्यांच निधन झाल्याचं कळलं तेव्हा गोपाळ बोधेंना फोन केला."अहो काल संध्याकाळीच मी त्यांच्याशी बोललो. जिम कॉर्बेटला जाण्याचे सगळे काही ठरले होते. आणि अचानक....माझे डोकेच चालत नाहिये...." बोधे सांगत होते. धक्का बसलेल्या बोधेंना पुढे बोलताही येईना.

अधिक शिरोडकर.....प्रसन्नपणे हसत आपुलकीनं बोलणारे निसर्गप्रेमी अधिक शिरोडकर आठवत राहतील...


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 21, 2014, 16:40


comments powered by Disqus