Last Updated: Friday, September 20, 2013, 22:46
www.24taas.com
स्वानंद कुलकर्णी
असिस्टंट प्रोड्युसर, झी मीडिया
माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्द नाही....एखाद्या दंतकथेप्रमाणे भासणारे हे शब्द आपण कायम ऐकले आहेत..ते फ्रेंच लीडर नेपोलिअन बोनापार्टच्या बाबतीत....पण सध्या स्पेनचा राफाएल नदाल ज्यापद्धतीने खेळतो आहे...ते पाहिल्यास...राफाने नेपोलिअनच्या या डिक्शनरीची पारायणं केली असतील...असंच वाटतंय....वाटतंय..नाहीच असंच आहे...
जागतिक पातळीवर कुठलाही खेळ खेळणं हे आधीच एकतरं कठीण काम....एखाद्या खेळात जागतिक पातळीवर जाण्यासाठी कराव्या लागणा-या कष्टांची सुरुवात ही वयाच्या अवघ्या तिस-या किंवा चौथ्या वर्षापासून करावी लागते....राफानेही टेनिसचे धडे वयाच्या अवघ्या तिस-या वर्षापासून घ्यायला सुरुवात केली....वयाच्या आठव्या वर्षी त्याने आपली पहिली टुर्नामेंटही जिंकली होती....त्यापासून सुरु झालेला राफाचा प्रवास आजपर्यंत सगळे टेनिस फॅन्स पाहात आलेले आहेत...या प्रवासाला अचाट या शब्दाखेरीज दुसरा शब्द नाही....मुळात राफाने केलेल्या अशक्य गोष्टींची सुरुवात लहानपणापासूनच सुरु होते... स्पेनसारख्या फुटबॉलवेड्या देशात जन्म झालेल्या राफाचं पहिलं प्रेम खरंतर फुटबॉलंच....त्यात काका फुटबॉल खेळाडू..त्यामुळे लहानग्या राफाची पावलंही फुटबॉलकडेच वळली....पण काका टोनी नदाल यांनी मात्र आपल्या भाच्यातील टॅलेंट ओळखून...त्याला टेनिसकडे वळवलं....मुळात उजव्या हाताने खेळणारा राफा...आपल्या काकाच्या सांगण्यावरुन डावखुरा झाला....आपली नॅचरल स्टाईल त्याने बदलली...आज याच डावखु-या राफाचा फोरहँड जेव्हा कुठल्याही कोर्टवरुन सुसाट एखाद्या प्लेयरकडे येत असतो....तेव्हा त्याचं काय होत असेल याचा विचारही न केलेला बरा....टेनिस या खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता....अभ्यास म्हणून पाहणा-या अनेक थोरामोठ्यांनी राफाच्या खेळाचा अभ्यास करताना त्याच्या फोरहँडचा..जरा सखोलात जाऊन अभ्यास केला..तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की एखादा नॉर्मल खेळाडू जर आपल्या फोरहँडमधून बॉलवर साधारण 200 rpm (रोटेशन्स पर मिनिट) टॉपस्पिन निर्माण करत असेल तर राफाच्या बाबतीत हाच ऍव्हरेज जातो जवळपास 600 rpm...त्यामुळे समोरच्या कोर्टमध्ये असलेल्या प्लेअरकडे हा बॉल इतक्या अवघड पद्धतीने येतो...की जवळपास त्याला तो परतवणं अशक्यप्राय होऊन जातो....त्यातही राफाच्या प्लेसमेंट के क्या कहने...

मॉडर्न डे टेनिसमधील एक दंतकथा झालेल्या राफाच्या फोरहँडप्रमाणे राफाचे कमबॅक्स हे देखील एक दंतकथा होऊन गेले आहेत....मुळात खेळण्याची अतिशय फिजिकल पद्धत असलेल्या राफाचं शरीर गेल्या काही वर्षातील इतकं डिमांडिंग टेनिस कसं काय सहन करु शकतं असा प्रश्न माझ्या सारख्या सर्वसामान्य टेनिस फॅनला पडतो.....2012 च्या विंबल्डनमध्ये चेक रिपब्लिकच्या ल्युकास रोसोलकडून दुस-या फेरीत झालेला राफाचा पराभव सगळ्यांना अजूनही जिव्हारी लागत असेल....त्यानंतर तब्बल 222 दिवस राफा हा टेनिसपासून दूर होता....पूर्वी दिसलेला राफा आता पुन्हा कधीच दिसणार नाही असंच सगळ्या टेनिस फॅन्सना वाटत होतं...पण तरीही प्रत्येक जण अगदी चातकाप्रमाणे वाट पाहात होता ते राफाच्या मस्ट अवेटेड कमबॅकची.....
आणि अखेरीस तो क्षण आला तो फेब्रुवारीमध्ये जेव्हा राफाने आपल्या आवडत्या क्ले कोर्टवर कमबॅक केलं. चिलीमधल्या विना डेल मारमधल्या क्ले कोर्ट टुर्नामेंटमध्ये राफा पुन्हा एकदा त्याच चिकाटीने खेळताना दिसला....मात्र फायनलमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला. राफाला सूर तर गवसलेला होता...मात्र तो हा टिकून ठेऊ शकणार का नाही..? शंका..प्रश्न हे फक्त टेनिस अभ्यासकांकडूनच नाही तर त्याच्या चाहत्यांकडूनही उपस्थित केले गेले..पण आपल्या बाबतीतल्या टीकांना आणि चर्चांना जो आपल्या कोर्टवरच्या कामगिरीने जो चोख प्रत्युत्तर देतो तोच तर असतो खरा चॅम्पियन....आणि राफाने आपण खरंच कसे चॅम्पियन आहोत...हे दाखवायला सुरुवात केली...साओ पाओलो आणि अकापुल्कोमधल्या टुर्नामेंट्स जिंकत राफाने 2013 मधलं आपलं टुर्नामेंट विजयाचं खातं उघडलं....
त्यानंतर मात्र होती...ती राफाची खरी परीक्षा....अमेरिकन हार्ड कोर्टवर लागणार होता तो राफाचा खरा कस....कारण क्ले कोर्ट स्पेशालिस्ट असलेल्या राफाला हार्ड कोर्ट्स फारशी आवडत नाहीत हे जगजाहीर आहे...पण दुखापतीनंतर पुनरागमन केलेला राफा या नव्या आव्हानाला कसा सामोरा जातो याची सगळ्यांनाच उत्सुकता होती....राफाने आपलं हार्ड कोर्ट कँपेन दणक्यात सुरु केलं....आपला कट्टर प्रतिस्पर्धी रॉजर फेडररला त्याने इंडियाना वेल्सच्या स्पर्धेत पुन्हा एकदा पराभवाचा धक्का दिला....तर फायनलमध्ये धोकादायक हुआन मार्टिन डेल पोत्रोला हरवत त्यानं जेतेपद पटकावलं....

यानंतर मियामीच्या स्पर्धेतून माघार घेत त्याने क्ले कोर्ट सिझनवर आपलं लक्ष केंद्रीत केलं...ज्या माँटेकार्लो मास्टर्स स्पर्धेवर त्याने आठ वर्ष अधिराज्य गाजवलं त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतही तो पोहोचला मात्र ज्योकोवचने त्याला हरवलं...पण या पराभवाने राफा खचला नाही तर आणखी पेटून उठला...फ्रेंच ओपन स्पर्धेच्या आधी त्याने बार्सिलोना, माद्रिद आणि रोमच्या स्पर्धांमध्ये त्याने विजय मिळवला....साहजिकच आपल्या लाडक्या फ्रेंच ओपनसाठी राफा पुन्हा एकदा रनिंग फेव्हरिट ठरला....रोलाँ गॅरोवरच्या लाल मातीने राफावर आणि राफाने या लाल मातीवर जितकं प्रेम केलं...तितकं टेनिसच्या इतिहासात कुणीच केलं नसेल....या दोघांचंही नातं काही औरंच....2005 मध्ये अवघ्या 19 वर्षांच्या असलेल्या राफाने पहिल्यांदा या कोर्टवर पाय ठेवला आणि चॅम्पियन म्हणून त्याने त्यावर्षी पॅरिसचा निरोप घेतला....त्यानंतर 2009 चा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी फ्रेंच ओपनची ट्रॉफी विसावली ती राफाच्याच हातात.....यंदा मात्र परिस्थिती वेगळी होती....राफा दुखापतीनंतर परतत होता...तर सगळेजण पॅरिसमधली त्याची एकहाती सत्ता उलथवण्याची स्वप्न पाहात होते....सेमी-फायनलपर्यंत राफा अगदी सहज पोहोचला....मात्र सेमीफायनलध्ये राफाचा सामना झाला तो त्याचा आणखी एक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक ज्योकोविचशी....tennis of the highest quality…..असंच ज्याचं वर्णन करावं लागेल अशी ही मॅच झाली...4 तास 37 मिनिटं चाललेल्या या मॅचमध्ये अखेर राफा अजिंक्य ठरला.....आणि फायनलमध्ये आपला मित्र डेव्हिड फेररला हरवून राफाने ऐतिहासिक आठव्या फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं.....
या विजयाने आनंदाने बेहोष झालेले माझ्या सारखे सर्व राफा फॅन्स पुन्हा एकदा दुःखात बुडाले....ते विंबल्डनला....2012 मध्ये दुस-या फेरीत बाहेर पडलेल्या राफाला यंदा पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला..जागतिक क्रमवारीत 135 व्या स्थानावर असलेल्या बेल्जियमच्या स्टिव्ह डार्सिसने नदालला हरवलं....आणि पुन्हा एकदा शंका-कुशंका आणि चर्चांना ऊत आला....नदाल या पराभवातून सावरणार?
राफाने पुन्हा एकदा खास आपल्या स्टाईलमध्ये या सगळ्या शंकांना उत्तरं दिली....ज्योकोविच, राओनिच सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत राफाने माँट्रिआलची स्पर्धा जिंकत वर्षातील दुसरी हार्ड कोर्ट टुर्नामेंट जिंकली....लगेचच पुढच्या आठवड्यात आत्तापर्यंत कधीही न जिंकता आलेली सिनसिनाटी मास्टर्स जिंकत नदालने वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या यू.एस ओपनसाठी आपला दावा छातीठोकपणे सादर केला.....
नदाल विरुद्ध ज्योकोविच...यापेक्षा चांगल्या पद्धतीने वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅमचा शेवट होऊच शकला नसता....2010 मध्ये राफाने ज्योकोलाच हरवत यू.एस ओपन जिंकली होती...या विजयाने अवघ्या 24 व्या वर्षी राफाने करिअर स्लॅम पूर्ण केलं होतं...तर 2011 मध्ये राफाला हरवत ज्योकोने या पराभवाची सव्याज परतफेड केली होती.....त्यामुळे क्लॅश ऑफ टायटन्स असलेल्या या सामन्याकडे अवघ्या टेनिस जगताचं लक्ष लागलं होतं....आणि काय सांगावं....राफा आणि नोव्हाकला खेळताना पाहणं हा काय अनुभव असतो... तो तुम्ही प्रत्यक्षात घ्यायला हवा... शॉट्स... प्लेसमेंट... स्ट्रॅटेजी... स्टॅमिना... या सगळ्याचा परिपाक जणू... दुस-या सेटमध्ये झालेली तब्बल 54 शॉट्सची रॅली म्हणजे या मॅचचा परमोच्च क्षण होता....साडेतीन तासांनंतर जेव्हा मॅच पॉईंटनंतर नदाल कोर्टवर पडला तेव्हा त्याला अश्रू आवरत नव्हते.....माँट्रिआल...सिनसिनाटी आणि यू.एस ओपन हे ट्रेबल मिळवणारा राफा अँडी रॉडिक नंतरचा फक्त दुसरा टेनिसपटू.....

पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली....नदाल हा आत्तापर्यंत टेनिस खेळलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे?....टेनिसप्रेमींच्या परिभाषेत याला GOAT अर्थात Greatest Of All Time असं म्हटलं जातं..वयाच्या 19 व्या वर्षी पहिलं ग्रँडस्लॅम...24 व्या वर्षी करिअर गोल्डन स्लॅम...8 फ्रेंच ओपन जेतेपदं....विक्रमी 26 मास्टर्स जेतेपदं....विक्रमी 14 मास्टर्स 500 टुर्नामेंट....आणि एकूणात 13 ग्रँडस्लॅम जेतेपदं अशी ज्याची करिअर स्टॅटिस्टिक्स आहेत....त्याच्याबाबत अचानक ही चर्चा कशी काय सुरु होते...? मुळात ती कायम असायला हवी होती....पण अर्थात याकडे माझं आंधळं राफा प्रेम म्हणून पाहिलं जाऊ शकतं....पण तरीही अनेक जण या मताशी सहमत असतील असं मला वाटतं....
मग या वर्षी असं काय वेगळं घडलं...की सगळं जग फक्त राफाच्या नावाचा जयघोष करतंय....? अर्थात डेव्हिस कप धरुन 62-3 असा मॅच रेकॉर्ड..आणि 10 टायटल्स यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतात....पण राफाने दुखापतीनंतरची प्रत्येक मुव्ह...प्रत्येक मॅच ही प्लॅनिंग आणि प्रिसिजनने खेळली.ज्याचं हे फळ आहे....दुखापतींनी राफाचा पिच्छा कधीच सोडलेला नाही...त्यात त्याची प्रचंड फिजिकल स्टाईल ही दुखापतींना आणखी आमंत्रण देणारी....यासाठीच आपलं करिअर आणखी वाढावं यासाठी राफा आणि त्याच्या टिमने प्रत्येक प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करत खेळात योग्य ते बदल घडवले... बेसलाईनवरुन लांबलचक रॅली खेळणारा राफा....आता सर्व्ह अँड व्हॉलीचा खेळ करत पॉईंट्स छोटे करण्याचे प्रयत्न करु लागला....दमछाक वाचवू लागला....सर्व्हिसमध्ये जास्त थ्रस्ट आणि व्हेरिएशन आणत राफाने प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली....
या सगळ्याबरोबर सगळ्यात जास्त मह्त्वाचं आहे..ते राफाचं डेडिकेशन आणि कनव्हिक्शन....प्रत्येक पॉईंट हा जणू मॅच पॉईंट आहे...असं समजून खेळणा-या राफाच्या फोकसला आणि मेंटॅलिटीला ज्योको सारखे खेळाडूही कुर्निसात करतात....
जॉन मॅकेन्रोने rafa is the Leonardo da vinci of tennis असं म्हणत राफाच्या खेळण्याच्या शैलीवर आणि त्याच्या जिगरबाज खेळावर स्तुतिसुमनं उधळली आहेत....राफाच्या आत्मचरित्रात राफाने आपल्या या टेक्निकबाबत फार सखोल लिहीलं आहे....ते प्रत्येक टेनिसप्रेमीनं जरुर वाचण्यासारखं आहे.....
राफाला आता रॉजर फेडररच्या विक्रमी 17 ग्रँडस्लॅमची बरोबरी करण्यासाठी आता फक्त 4 ग्रँडस्लॅम जिंकण्याची गरज आहे....तर ग्रेट पीट सॅम्प्रासची बरोबरी करण्यासाठी फक्त 1.....पण एवढं केल्यानेच तो goat ठरेल....माझ्यासाठी तरी नाही....पण इतरांसाठी....याचं उत्तर लवकरच मिळेल.....
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 20, 2013, 17:43