सौजन्याची ‘साथ’, saujanyachi sath...

सौजन्याची ‘साथ’

सौजन्याची ‘साथ’
रमेश जोशी
असिस्टंट प्रोड्युसर, झी २४ तास


कर्णकर्कश आवाज करीत लोकल स्टेशनमध्ये शिरली आणि तोफेतून गोळा जसा बाहेर पडावं तसा मी लोकलच्या डब्यातून बाहेर फेकला गेलो. कामावरुन परतलेल्या मुंबईकरांमध्ये स्टेशनवर उतरताना एवढा जोश कुठून येतो? हा खरंच संशोधनाचा विषय आहेत. सैनिक जसे कामगिरीवर जाताना हेल्मेट सावरत जातात तसा मी हातातली बॅग सावरत रेल्वे स्टेशनबाहेर पडलो. रिक्षा स्टँड परिसरात आलो. तिथं कर्रकर्र आवाज करीत रिक्षा निघून चालल्या होत्या. रिक्षाचालक तुच्छ नजरेनं माझ्यासारख्या अनेक बापुड़्या लोकांकडं पाहत होतो. लोक हात हलवून थांबवण्याचा इशारा करीत होते. रिक्षावाले मिजासीनं नजरेनंच विचारत होते... कुठं... कुठं... सुखसागर म्हटलं... तर ते अगदीच तुच्छतेनं पाहत पुढं जात होतं. जसं काही हे फुकटचं नेणार आहेत. असो… एक रिक्षावाला आला. त्याच्या रिक्षात रिक्षावाला धरुन चार जण बसले होते. या फुटकळ माणसाला रिक्षात घेऊन त्याच्यावर उपकार करतोय या आविर्भावात त्यानं मला एका बाजूला बसवून घेतलं. बुडाची एक बाजू तिथं राहिली होती. तशा टांगलेल्या अवस्थेतच सहा जणांनी फुल्ल भरलेली रिक्षा कर्रकर्र आवाज करीत निघाली. सोसायटीजवळ येऊन रिक्षा थांबली. खिशातून पन्नासची नोट काढली. रिक्षावाल्याला पन्नासची नोट दिसताच त्याचा हिटलरच झाला. तो माझ्यावर खेकसलाच ‘अहो आठ रुपये सुट्टे नव्हते तर पायी यायचं... उगाच आमच्या डोक्याला कशाला ताप देता.’ सोसायटीसमोर तमाशा नको म्हणून स्वतःच्या हातानं स्वतःची अंगझडती घेतली. चिल्लर शोधून काढली आणि त्याच्या हातावर टेकवली. त्यावरही त्याने आहेत तरी सुट्टे पैसे ही लोकं लवपून ठेवतात, असं म्हणून रिक्षा पुढं दामटली.

सोसायटीचा गेट उघडल्या उघडल्या भटक्या कुत्र्यांनी भोभो करुन स्वागत केलं. सोसायटीतल्या खाष्ट लोकांना पाहून एरव्ही धूम पळणारी कुत्री माझ्यासारख्याकडं पाहून उगाचच भुंकतात... कदाचित भुंकण्याचा सराव करीत असावेत... चार मजले चढून गेल्यावर माझं घरं लागतं.... अरे माझं का म्हणतो... मी त्या घराला... सॉरी माझ्या बायकोचं घर... बायकोच्या घरात मी भाडेकरु म्हणून राहतो, अशी ती मला वागवते. बेल वाजवल्यानंतर सेल्समनसारख्या अगंतूकाकडं जसं पाहतात तसा कटाक्ष तीनं टाकला. घरात प्रवेश करता झालो. नवरा थकून भागून घरी आल्यावर बायको प्रेमानं त्याला चहा आणि पाणी देते हे दाखवणाऱ्या सिनेमावाल्यांच्या आणि सीरियलवाल्यांच्या मोजून पैजारा माराव्यात. ती कधीच चहा काय पाणीसुद्धा विचारीत नाही. स्वतःच जाऊन फ्रिज उघडला. पाण्याची बाटली घेतली. थंड झालेला चहा कपात ओतून घेतला आणि हॉलमध्ये येवून बसलो. बायको राधा ही चावरी... उंच माझा... मला सासू... अशा सिरीयल पाहत बसली होती. या सीरियलच्या ब्रेकमध्ये ती स्वयंपाक करीत असते. तर असो... तिचं सीरियल पुराण संपल्यानंतर टीव्हीचा दूरनियंत्रक म्हणजे रिमोट हातात आला... तोपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेलेले होते. माझ्यासारख्या सामान्य माणसाचं जग जाणून घेण्याचं माध्यम म्हणजे वृत्तवाहिन्या... सध्या मराठीत बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचंही पीक आलंय. सह्याद्रीच्या त्या निस्तेज बातम्या पाहून वाढलेल्या आमच्या पिढीला या खासगी वृत्तवाहिन्यांच्या बातम्या अधिकच जवळच्या वाटतात. बातम्या सुरुच होत्या... राज्याच्या बड्या नेत्यानं उपस्थित केलेल्या ‘लघु’शंकेनंतर त्यांना आत्मक्लेश झाला होता. दादा नेत्यानं काय करावं... थेट काकांच्या गॉडफादर असलेल्या दिवंगत नेत्याचा समाधीसमोरच ते आत्मक्लेश म्हणून दिवसभर बसले. बस्स सगळ्या टीव्ही चॅनलला त्या आत्मक्लेशाचा ओव्हरडोस झाला होता. चॅनलवरच्या त्या बायका आणि पुरुष तावातावाने बोलत होते. हातवारे करुन त्या दादाच्या आत्मक्लेशाचं सांगत होते. झाडून सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर तेच ते सुरु होते. एरव्ही मारकुट्या वळूसारखा चेहरा करुन फिरणाऱ्या दादाचं ते समाधीसमोर निर्विकार बसणं पाहून गलबलल्यासारखं झालं. सोफ्यावर अंग टाकून पडलो होतो. चॅनलवर त्या बातम्यांचा ढ्या... ढ्या... सुरु होता. तेवढ्यात कधी डोळा लागला कळलं नाही.
सौजन्याची ‘साथ’

सकाळी बायकोच्या मंजूळ आवाजानं जाग आली. असा आवाज फक्त लग्नानंतर पहिल्या काही महिन्यांतच ऐकला होता. अहो उठा... सात वाजले... अंघोळीला पाणी काढलयं. ऑफिसला जायची वेळ झाली. याची मला सवय नव्हती... लग्नाचे नवे दिवस सोडले तर हा अनुभव माझ्यासाठी सुखद धक्काच होता. आंघोळ उरकली... या धक्कातून सावरतो ना सावरतो तो आणखी एक सुखद धक्का बायको चहाचा कप घेऊन समोर उभी होती... मी तिला थोडं भीत भीतच विचारलं... अगं हे काय... आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे काय? आज कॅलेंडरमध्ये एक तारीखही नव्हती... ती लाजून म्हणाली, तुम्ही पण काहीतरीच... अहो मला पश्चाताप झालाय. आत्मक्लेश म्हणून... प्रायश्चित्त म्हणून मी तुमच्याशी सौजन्यानं वागण्याचं ठरवलं आहे... स्वर्गात गेल्यासारखं वाटलं.... डबा, रुमाल, कंगवा, पाण्याची बाटली, बॅग सगळं रेडी... ऑपरेशन अगोदर डॉक्टरनं अनेस्थेशिया दिल्यासारखा गुंगीत घराबाहेर पडलो. सोसायटीच्या गेटसमोर रिक्षावाला उभा होता. मला पाहताच त्यानं स्मित हास्य केलं. या साहेब, स्टेशनला जायचं ना, मी मागं वळून पाहिलं... मागं कोणीही नव्हतं. तो अजून अदबीनं म्हणाला... साहेब तुम्हालाच म्हणालो... रिक्षाच्या मागं बसायला सांगितलं... रिक्षात फक्त तीनच सीट बसवले... चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. न रहावून विचारलं... काय हो काय झालं... ‘आत्मक्लेष झालाय... प्रायश्चित घेतोय... आजपर्यंत गिऱ्हाईकांशी खूप आगाऊपणं वागायचो... आता सौजन्यानं वागायचं ठरवलयं.’ स्टेशनला उतरलो... खिशात हात घातला. शंभरची नोट काढून त्याच्या हातावर टेकवली. त्यानं हसत सुट्टे पैसे दिले आणि पुढं निघाला... झपझप चालत प्लॅटफॉर्मवर आलो.
सौजन्याची ‘साथ’

ट्रेन स्टेशनमध्येच घुसताच रोजच्यासारखी गडबड झाली नाही. ट्रेन थांबताच लोकं शिस्तीत ट्रेनमध्ये चढू लागली. कोणतीही हाणामारी नव्हती. शिस्तीनं लोकं ट्रेनच्या डब्यात चढली. रोजची चौथ्या सीटसाठी भांडाभांडी नव्हती. सीटवर बसलेल्या तिघांनी स्वतःहून सरकून चौथ्यासाठी जागा दिली. ठराविक स्टेशननंतर उभ्या प्रवाशांसाठी स्वतःहून उभं राहून बसायला जागा दिली. सगळं आनंद देणारं होतं. आज सगळं जग रंगित दिसत होतं. ओठावर गाणं आलं. गाणं गुणगुणत ऑफिसात आलो. टेबलावर एका कोपऱ्यात बॅग ठेवली. तेवढ्यात आमचे मालक म्हणजे गणू... गणू हा आमचा शिपाई आला... ऑफिस याच्या मालकीचं अशा अविर्भावात महाराज वागत असतात. ते आले हातात चहाचा कप होता. तो माझ्या टेबलावर ठेवला. भीती वाटून मी चहाच्या कपाला हात लावला नाही. ‘सायेब तुमच्यासाठी चहा आणलाय. तुम्हाला आलं आवडतं ना चहात... म्हणून आलं टाकून आणलयं.’ चहाचा घोट घेताना त्याच्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तो म्हणालं सायेब ‘आत्मक्लेष... प्रायश्चित.... दादांसारखं वागायाचं ठरवलयं.’ टेबलावरचा फोन वाजला. देशपांडे केबिनमध्ये या... साहेबाचा आवाज... मनातून म्हटलं.. चला हजामतीला... साहेबांच्या केबिनमध्ये जाताना मनाची तयारी करायची... आतमध्ये धारातीर्थी पडणार याची... म्हणजे शाब्दिक वार सहन करण्यास सोपं जातं. केबिनचा दरवाजा थोडासा लोटून आत जाताच, ‘या देशपांडे.... (हातातलं लेटर दाखवत...) हे लेटर तुम्ही टाईप केलयं?’ हो... मी म्हणालो... देशपांडे.... ‘लिहताना घाई करु नका... आरामशीर टाईप करत जा... चुका आहेत... त्या दुरुस्त करा.. आणि पुन्हा आणा...’ मी खुर्चीतून उठणार एवढ्यात म्हणाले. ‘देशपांडे तुम्हाला नंबर आहे ना?’ हो.... मी म्हटलं... ‘मग आजच जा चष्मा खरेदी करा. टाईप करताना शब्द चुकून टाईप होतात तुमच्याकडून हे माझ्या लक्षात आलयं. पैसे आहेत का...’ मी काहीच बोललो नाही... अच्छा अकाऊंटंटकडून व्हाऊचर घ्या... पगारातून कापून घेईन... असं सांगून त्यांनी पैसे दिले....

आजच्या दिवसभरातल्या सौजन्यपूर्ण वागणुकीचा मला ओव्हरडोस झाला होता. अख्खं वातावरण सौजन्यानं भारलेलं होतं. बायको, रिक्षावाला, ट्रेनमधील सहप्रवासी, ऑफिसमधील सहकारी... सगळ्यांनाच सौजन्याची लागण झाली होती. लोक किती अनुकरणप्रिय आहेत. याचा मला अनुभव आला होता. एका दादानं प्रायश्चित काय घेतलं अख्ख जगचं प्रायश्चित घेतंय. पूर्वी प्लेग, पटकीची साथ यायची... साथीची लागण लोकांना व्हायची... आणि लोकं पटापट मरायची... तसं... प्रायश्चित घेण्याची साथ तर नाही ना असं मला वाटू लागलं... नाहीतरी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एरव्ही सौजन्यानं वागणूक मिळते कुठं... पांढरपेशी म्हणून प्रत्येक जण मला चिडवत असतो. डिवचत असतो. हा सहन करतो, उलटून बोलत नाही, याचा सगळेच फायदा घेतात. मात्र, आजच्या सौजन्याच्या वागणुकीनं मला हवेत तरंगत असल्याचा भास झाला. तरंगत असल्याचा भास झाला. फुगत असल्याचा भास झाला... मी फुगत चाललो होतो... मोठा होत चाललो होतो... फुग्यासारखा मोठा होत चाललो होतो. सौजन्याची हवा भरली होती सर्वांगात... फुगत... फुगत.. गेलो आणि फट्ट असां आवाज आला.

मी धडपडत उठलो... बायकोनं पेपरचा रोल माझ्या गालातच मारला होता... उशीर झालाय कामाला जायचं नाही का ?.... रात्रभर टीव्ही पाहता... सकाळी झोपून राहता... कामाला गेला नाही तर खायचं काय... आळशी कुठले... असं म्हणून ती दुसऱ्या कुशीवर होत झोपून गेली. मी बापुडा उठलो. गिझर लावला... अंघोळीची तयारी केली... तर रात्री आपण स्वप्नात होतो, हा विचार करीत ऑफिसची तयारी करू लागलो.

First Published: Saturday, April 20, 2013, 12:16


comments powered by Disqus