Last Updated: Friday, June 22, 2012, 22:22
संदीप साखरे www.24taas.comबदलापूर परिसरात असलेल्या एका अनाथाश्रमात मी आणि माझे दोन मित्र शनिवारी किंवा रविवारी वेळ काढून गेल्या एका वर्षापासून जातो आहोत.. टार्गेट होतं त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचं..सोनावळ्याला हा अनाथाश्रम....
यावर्षी निकाल लागलेत, आणि शाळेतली सर्व मुलं 80 टक्क्यांच्या गुणांनी पास झालीयेत.. 10 वीला दोन विद्यार्थिनी होत्या, त्याही चांगल्या मार्कांनी पास झाल्यायेत.. तीन महिन्यांपूर्वी या मुली पास होतील का, अशी शंका आमच्या मनात होती.. त्यांना एकदा विचारलं काय अडचण आहे ती.. त्यावेळी त्यांनी शाळेतलं कळत नसल्याचं सांगितलं.. त्यांना 21 अपेक्षित प्रश्नसंच हवे होते.. माझ्या एका मित्रानं हे अपेक्षित प्रश्नसंच दिले.. या दोन्ही मुली पास झाल्याचं त्याला सांगितलं, तेव्हा तो म्हणाला पैसे सत्कारणी लागले..
गेल्या जूनपासून आम्ही वर्षभर या अनाथाश्रमात प्रवास करायचा, असं ठरवलं होतं.. माझ्या दोन मित्रांपैकी एक पुण्याला असतो, एका मल्टिनॅशनल कंपनीत तो काम करतो, शनिवार रविवार बदलापुरात असतो.. दुसरा मित्र डाऊ कंपनीत नोकरीला आहे.. शनिवार-रविवार सुट्टी आणि काहीतरी करायचंय, या भावनेनं आम्ही एकत्र आलोत..मग बाईकवरुन कधी मित्राच्या कारनं आम्ही फिरत असू..मग ठरवलं एका संस्थेवर लक्ष देण्याचं.. सुरुवातीला सोनावळ्यात गेलो, तेव्हा तिथल्या 25 मुलांना शाळेत जाण्यासाठी चपला नसल्याचं कळलं.. मग आम्ही एका दुकानात गेलो..दुकानदाराला सांगितलं.. तर त्यानं चपला दिल्या, मात्र त्याचे पैसे घेतले नाहीत.. आजूबाजूला चांगली माणसं आहेत, म्हटल्यावर हुरुप वाढला.. मग सातत्यानं प्रवास सुरु झाला..

संस्थेच्या ट्रस्टींची भेट घेतली.. त्यांनी सांगितलं मुलं आहेत, शाळेत जातात, मात्र शैक्षिणक गुणवत्तेची बोंब आहे..मग काही दिवस आम्ही ठरवून शिकवण्याचं काम सुरु केलं.. त्या मुलांची स्वच्छता तपासू लागलो.. वात्रट मुलांना रागवू लागलो..यातून बंध वाढत गेला.. मुलं ओळखीची झाली.. परीक्षा झाली की ते मार्क सांगायला यायचे.. चांगल्या मार्कांचं कौतुक होऊ लागलं.. अजून दोन-तीन शिक्षकही येत-जात..नंतर लक्षात आलं शिकवणं हे आपलं काम नाही.. मग फक्त त्यांना जाणीव करुन देणं एवढचं केलं.. याचा फायदा हा एवढा झाला.. आता या वर्षापासून बारावीत चांगला मार्क मिळवलेला एक विद्यार्थी या आश्रमशाळेत शिकवायला येणार आहे. त्याचीही घरची परिस्थिती चांगली नाही, कॉलेज शिक्षणासाठी त्याला या कामाचे पैसे मिळणार आहेत, आणि या मुलांनाही वर्षभरासाठी हक्काचा शिक्षक उपलब्ध झालाय.
या शिक्षकासाठी आम्ही गेले सहा महिने अनेक ठिकाणी चकरा मारल्यात, मात्र सगळीकडून फक्त नकारच पदरी पडलेला होता.. या संस्थेचे अजूनही अनेक प्रश्न आहेत.. ट्रस्टी दूरवर राहतात, प्रश्न सोडवायचे आहेत, मनुष्यबळाची कमी आहे.. ही एक संस्था नाही, नेरळपासून १५-२० किलोमीटरवर असलेल्या कोठिंब्याजवळ एक वनवासी कल्याण आश्रमाचं केंद्र आहे.. गेल्या जुलैत आम्ही तिथल्या 35 मुलांसाठी कंपास बॉक्स पोहचवलेत. आम्हालाच समाधान वाटलं.. यावर्षी तिथं काय हवं आहे, याचा विचार सुरु आहे..
बदलापूर गावाजवळ एक सत्कर्म नावाचा आश्रम आहे.. चांगली 30-35 मुलं शिकत होती, चांगल्या हेतूनं काही जणांनी एकत्र येऊन या संस्थेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न चालवला होता..मात्र चांगल्या कामात अडचणी येतातच, या न्यायानं काहीतरी बालंट आलं, काही दिवस आश्रमशाळा बंद ठेवावी लागली, आता जूनमध्ये पुन्हा सुरु झालीय..तिथल्या मुलांचे प्रश्न आहेत..
परवा वांगणीजवळ असलेल्या कारावला गेलो होतो, मोठी आदिवासी निवासी आश्रमशाळा आहे, 500 विद्यार्थी आहेत, शाळेचं बांधकाम सुरु, पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होईल, शाळेच्या मुख्याध्यापिकांना भेटलो. सुमारे 100 ते 120 आदिवासी, कातकरी मुलं आहेत, गणवेशाचे, चपलांचे काहींचे घरगुती प्रश्न आहेत.. आम्ही आमच्या परीनं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.. परिसरात अनेक वीट भट्ट्या आहेत, तिथं काम करणाऱ्यांची सतत भटकंती सुरु असते. मुलांचं शिक्षण नाही, एका ठिकाणी घरही नाही. काही हुशार मुलं आहेत, त्यांना शिकायचंय, पण परिस्थिती साथ देत नाहीये..
गेल्या केवळ एका वर्षांत केलेल्या कामाचे हे काही अनुभव आहेत.. हे सांगताना, तुम्ही काही करु शकाल, हा प्रश्नही विचारायचा आहे.. आम्हाला आर्थिक मदतीची अपेक्षा नाही, पण अशा काही घटकांसाठी एक तास देऊ शकाल काय, असा प्रश्न आहे.. मदत देणारी माणसंही खूप आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी माणसांची आवश्यकता आहे.. आम्हाला मदत करायला बदलापुरात या, ही पण अपेक्षा नाही, तुमच्या आजूबाजूलाही हीच परिस्थिती आहे, जरा डोळे उघडलेत..जरा कोष रुंद केलेत, तर ही परिस्थिती जाणवेल.. कुणालाही प्रत्यक्ष मदत करण्याचा अनुभव अधिक समृद्ध करणारा आहे.. आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्यांनी वर्षाकाठी काही पैसे अशा कामांना द्या, संस्थांनाही देऊ नका, प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहचवा, असा सल्ला आहे..
या कामासाठी काही गंभीरपणे करण्याची गरज नाही, अगदी मजेत, गप्पांमध्ये, प्रवासात तुम्ही हे करु शकता, हा माझा अनुभव आहे.. आम्ही वर्षभरापासून हे करतोय, यात काहीही मोठेपणा नाही, अशी माणसं वाढावीत एवढीच अपेक्षा आहे.. ‘चलो जलाए दीप वहाँ, जहाँ अभीभी अंधेरा है’, हे आपण नेहमी ऐकतोच.. खरंच एक दिवा घेऊन चालू शकाल काय, हा कळीचा प्रश्न आहे..
First Published: Friday, June 22, 2012, 22:22