अण्णांचे आंदोलन, काँग्रेसचा आत्मक्लेश - Marathi News 24taas.com

अण्णांचे आंदोलन, काँग्रेसचा आत्मक्लेश

Tag:  

संतोष गोरे
santosh.gore@zeenetwork.com
 
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळणा-या पाठिंब्यामुळे धास्तावलेल्या काँग्रेस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली. आणि त्यानंतर काँग्रेस सरकारचे सगळे निर्णयही चुकत गेले. अण्णा हजारेंना उपोषणाची परवानगी देण्यात आली नाही. जेपी पार्ककडे निघालेल्या अण्णांना अटक करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आंदोलनासाठी बिनशर्त अटींवर अडून बसलेल्या अण्णांनी तिहारमध्येच उपोषण सुरू ठेवलं. तर तिहारच्या बाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढत गेली. अखेर सरकारने अण्णांना रामलीला मैदानावर उपोषणाची परवानगी दिली. काँग्रेस सरकारमध्ये या मुद्यावर किती गोंधळ उडालेला आहे, आणि या सरकारने आत्मविश्वास गमावल्याचं या घटनाक्रमातून सिद्ध होतं.
 
अण्णा हजारेंवर बेछूट आरोप करण्याची काँग्रेसच्या चाणक्यांची नीती सपशेल फसली. मनीष तिवारींच्या बेताल वक्तव्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली. तर पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अंबिका सोनी यांनीही त्यांच्या पातळीवर जितका गोंधळ उडवून देता येईल तितका उडवून दिला. अण्णांच्या मागण्या मान्य होतील किंवा नाही, हा एक विषय आहे. मात्र इथं आपल्या चर्चा करायची आहे ती या मुद्यावर की, अण्णांना इतका पाठिंबा का मिळतोय ?
सामान्य नागरिकांचा विशेषत: तरूणांचा राजकीय पक्षांवरील विश्वास उडू लागला आहे का ? आणि जर याचं उत्तर होय असेल तर हा आपल्या लोकशाहीप्रधान देशाला धोकाच म्हणायला हवा. कारण आपल्या देशाचा जो काही विकास झाला आहे, तो याच पद्धतीतून झाला आहे. अर्थात देशाचं जे काही वाटोळं झालंय, तेही याच माध्यमातून झालंय हे ही नाकारता येणार नाही.
 
देशातल्या वाढत्या भ्रष्टाचारामुळं इथला तरूण व्यथित झालाय. सत्ताधारी भ्रष्टाचार संपवण्यासाठी नालायक आहेत. इतकंच नव्हे तर भ्रष्टाचा-यांना सरकारचा पाठिंबा आहे की काय ? असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी फक्त काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनाच तुरूंगात टाकण्यात आलं. मात्र या भ्रष्टाचारात सामील असलेले त्यांचे वरिष्ठ कधी गजाआड होणार ? हा सवाल सामान्य जनतेच्या आणि तरूणांच्या मनात आहे.
 
सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकीय नेत्यांची उघड होणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे देशातला तरूण निराश झाला होता. ही परिस्थिती त्याला बदलायची होती. मात्र विरोधी पक्ष या प्रश्नावर रस्त्यावर उतरत नव्हते. या प्रश्नावर लढण्याची ताकद आणि ऊर्मीसुध्दा विरोधी पक्षांनी गमावली की काय ? असा सवाल उपस्थित होत होता.
 
नालायक सत्ताधारी आणि निष्क्रीय विरोधक यांच्यातली ही स्पेस अण्णा हजारेंनी भरून काढली. एकाचवेळी सत्ताधा-यांवर आसूड ओढत असतानाच त्यांनी विरोधी पक्षांची भूमिकाही पार पाडली. इंडिया अगेनस्ट करप्शन या संघटनेचीही अण्णांना चांगलीच साथ मिळत आहे. मीडियानेही हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. अण्णांच्या आंदोलनाला मिळणा-या LIVE प्रसिद्धीमुळेही समाजात चांगलीच जनजागृती निर्माण होऊ लागली आहे. परिणामी अण्णांचे आंदोलन व्यापक होत चालले आहे. तर मधल्या मधे चुकीच्या निर्णयांमुळे काँग्रेसवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे.

First Published: Saturday, October 22, 2011, 16:05


comments powered by Disqus