माऊली... माऊली... माऊली... - Marathi News 24taas.com

माऊली... माऊली... माऊली...

माऊली... माऊली... माऊली...

ऋषी देसाई, वृत्तनिवेदक
www.24taas.com


युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. आषाढी कार्तिकीची वारी हा मराठी मनाचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि आनंदाच्या परमोच्च सोहळ्यात माऊलीचा ही आनंदवारी सुरु होते.. सातशे वर्षापुर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी - माझे जीवाची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी असा निर्धार केला होता. माऊलीनी प्रकट केलेली ती इच्छा आजही चढत्या वाढत्या उत्साहानं अवघा महाराष्ट्र भक्तीभावानं पुर्ण करतोय आणि त्या अविरत उत्साहाचं नाव म्हणजेच आनंदवारी.. आनंदवारी,पंढरीच्या विठूरायाची.. आनंदवारी, महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताची...

ज्येष्ठाची पौर्णिमा संपली की उभ्या मराठी मनाला वेध लागतात ते आनंदवारीचे... अवघ्या मराठी मनात हरीनामाचा गजर दुमदुमू लागतो. वर्षभर काळ्या आईची सेवा आणि संसारात बुडलेल्या मनाला, जय जय रामकृष्ण हरी या सुरांची साद घालू लागते. सदोदीत संसाराचा व्याप घेऊन जगणा-या या देहाच्या मस्तकावर  तुळशी वृंदावन ठेवण्याची आस लागते. आयुष्याचं रहाटगाडगं ओढणारे हात,  टाळ मृदूंग घेण्यासाठी सरसावतात.. सोन्याचा दर तीस हजाराचा आकडा  पार करतोय हे पाहून  इतरांचा हेवा करणारा गळा, तुळशी माळेची श्रीमंती गळ्यात मिरवण्याच्या कल्पनेनंच श्रीमंत होतो.. हा बदल होतो फक्त तीन अक्षरांनी.. विठ्ठल.. प्रत्येक वर्षी विठ्ठलासाठी आनंदवारी आणि आनंदवारीतला विठ्ठल हा आनंदयोग सुरुच आहे चिरंतन.. निरंतर..विठ्ठल या तीन अक्षरांची जादू काय आहे याचा शोध प्रत्येक वर्षी आनंदवारीत घेतला जातो.. आणि दरवेळी विठ्ठल शोधायासी जावे आणि विठ्ठल बनावे हीच अवस्था देहाची होते..

माऊली... माऊली... माऊली...

या शोधांच उत्तर शोधता शोधता स्वताचा शोध लागतो आणि आयुष्य कधी कधी विठ्ठलमय बनुन जात हे कळतच नाही.. ज्ञानश्वरांपासून ते हैबतबाबापर्यंत हा शोध सुरुच आहे.  हा कानडा राजा पंढरीत आल्यापासून त्यानं  अवघ्या मराठी मनाला हरीनामाचे वेड लावलय.  विठूमाऊली केवळ हरीनामावर वारक-यांना प्रेमपाशात गुंग करतेय.. कुठलाही तंत्र-मंत्र नाही.. अवजड नामावलीचे स्तोम नाही,  जय जय रामकृष्ण हरी म्हणा आणि भवसागरात तरुन जा.. विठ्ठला, इट्टला, पांडूरंगा, विठोबा,सावळ्या.. काहीही हाक मारा , हाक तिथपर्यंत पोहोचते.. आणि मनात कर कटीवर असणारी सावळी मुर्ती उभी राहते आणि गजर सुरु होतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.. सर्व जगाचे कुतूहल बनुन राहीलेली अशी ही पंढरीची वारी.. शेकडो वर्षापूर्वी या विराट जनसमुदायाचे नेतृत्व करणा-यांमध्ये  संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव अशी अनेक अलौकिक नावे होती. भागवत धर्माची  पताका या संतश्रेष्ठांनी  आपल्या खांद्यावरुन वाहत आणली.
माऊली... माऊली... माऊली...

विश्वंभर बाबा आणि हैबतबाबा यानी सुरु केलेली ही वारी आज केवळ महाराष्ट्राच्या नाही तर सा-या जगाचं लक्ष वेधून घेतूय.. स्वार्थ, कलियुग, मोहाचा पगडा असलेल्या या जगात लाखो माणसे निस्वार्थी भावनेनं एकत्र जमत आनंदवारीत सामील होतात... टाळमृदूंगाचा गजर, पालख्याचं चैतन्यदायी अस्तित्व, दिंड्या पताकानी भारलेले वातावरण, वारक-यानी धरलेला फेर आणि डोईवर तुळशी वृदांवन घेतलेल्या बायाबापड्या या सर्वांवर मुक्तपणे अबीर गुलाल उधळला जातो तेव्हा या चराचरात  फक्त दोनच गोष्टी उरतात.. चंद्रभागेच्या तिरावरच्या गाभा-यातला ती विठूमाऊली आणि त्याच्या दर्शनासाठी व्याकुळलेली लेकरांची अवघी आनंदवारी.. आनंदवारी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 29, 2012, 22:17


comments powered by Disqus