सांगण्याजोगे... - Marathi News 24taas.com

सांगण्याजोगे...

 मंदार मुकुंद पुरकर
 
डॉ. शांताबाई गुलाबचंद यांचे हे जन्म शताब्दी वर्ष.  खरंतर वर्तमानपत्रात त्यासंबंधी फार काही छापून  आलं नाही. आता या कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर लवासा उभारणाऱ्या हिंदुस्थान  कंट्रशक्शन कंपनीच्या अजित गुलाबचंद यांच्या त्या मातोश्री. पण त्यांचे श्री विद्या प्रकाशनाने प्रसिध्द  केलेले ‘सांगण्याजोगे’ हे आठवणींच्या स्वरुपातले आत्मकथन वाचल्यानंतर एका संपन्न उत्तुंग  व्यक्तिमत्वाचा आपल्याला परिचय होतो.
 
 
अहमदनगरच्या सप्तर्षींच्या गर्भश्रीमंत जमीनदार कुटुंबात जन्मलेल्या शांताबाई गुलाबचंद आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर इंटर सायन्सला पहिल्या आल्या आणि मुंबईच्या जे.जे.हॉस्पिटलच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाल्या. एमबीबीएसच्या परीक्षेत देखील त्या पहिल्या आल्या आणि एफआरसीएस करण्यासाठी इंग्लंडला गेल्या. शांताबाईंनी सत्तर वर्षापूर्वी शिक्षणासाठी लंडनला प्रयाण केलं होतं यावरुन त्यांच्या घरचं वातावरण किती प्रागतिक होतं याची कल्पना यावी. शांताबाईंचे वडील नानासाहेब हे हिंदुमहासभेचे नेते होते आणि ते विधीमंडळावर निवडूनही गेले होते.
शांताबाईंच्या आठवणी वाचताना तेंव्हाचा काळ डोळ्यासमोर सहजपणे उभा राहतो. त्याकाळातल्या रुढी परंपरांचे दर्शन होते. शांताबाई १९३८ साली एफआरसीएस झाल्या आणि त्यानंतर त्यांनी स्वत:ला प्रॅक्टिसमध्ये झोकून दिलं. त्यावेळेस वैद्यकीय सेवेतच वाहून घ्यायचं असं त्यांनी ठरवलं पण एका क्षणी विवाह केला पाहिजे असं त्यांना जाणवलं. माणसाचं एकटेपण, मानसिक आधाराची गरज, शारीरिक सुख आणि मातृत्वाची ओढ हे सर्व नैसर्गिक असतं हे शांताबाईंनी अनेक समर्पक उदाहरणांमधून दाखवून दिलं आहे.
 
 
शांताबाईंनी या आठवणी अतिशय मनमोकळेपणाने लिहिल्या आहेत, त्यात हदयाला स्पर्श करणारा प्रांजळपणा आहे. आपल्या आयुष्यातल्या अनेकविध अनुभवांबद्दल मनस्वीपणे त्यांनी लिहिलं आहे. माहेरच्या सप्तर्षी तसेच सासरच्या दोशी कुटुंबातील सदस्यांची व्यक्तीचित्रं अगदी थोड्या शब्दात त्यांनी ताकदीने रेखाटली आहेत. आयुष्यात उशिरा आंतरधर्मीय विवाह करताना स्वकियांकडून झालेला विरोध, सासरच्या लोकांनी सामावून घेताना दिलेलं निर्व्याज प्रेम, दाखवलेला जिव्हाळा त्यांनी हातचं राखून न ठेवता शब्दबध्द केला आहे. वालचंद उद्योगसमुहाचे संस्थापक वालचंद हिराचंद यांचे भाऊ गुलाबचंद हिराचंद यांच्याशी विवाह केल्यानंतर एका सर्वस्वी नव्या जगाची झालेली ओळख, त्यानंतर उद्योगक्षेत्रात, राजकारणातला त्यांचा प्रवेश हे निश्चितच स्तीमित करणारं आहे. वालचंद उद्योगसमुहात त्यांनी अनेक वर्षे संचालक म्हणून कामकाज पाहिलं हे वाचल्यानंतर अनेकविध क्षेत्रातली शांताबाईंच्या कर्तबगारीची भरारी पाहून आपल्याला नतमस्तक व्हायला होतं.
 
दिगंबर जैन समाजतल्या कर्मठ विचारांनी संस्कारित गुलाबचंद हिराचंद यांच्या बरोबर संसार करताना करावी लागलेली तारेवरची कसरत आणि त्यांच्या स्वभावतले बारीक कंगोरे शांताबाईंनी अतिशय सूक्ष्मपणे रेखाटले आहेत. गुलाबचंद हिराचंद आणि त्यांच्या भावंडांमध्ये असलेला प्रेम आणि जिव्हाळा याचाही उल्लेख अनेक ठिकाणी वाचायला मिळतो. आज उद्योगक्षेत्रात भाऊबंदकीने माजलेल्या बेदिलीच्या पार्श्वभूमीवर बदलत्या काळाचे नातेसंबंधावर झालेले परिणाम की दुष्परिणाम याची जाणीव होते. वैद्यकीय क्षेत्रातले त्यांचे गुरु मार्गदर्शक डॉ. म्हसकर यांच्या आठवणींनाही त्यांनी आदरपूर्वक उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे त्या काळातही वैद्यकीय क्षेत्रात अपप्रवृतीची लागण झाली होती याचीही उदाहरणे शांताबाईंनी दिली आहेत.
 
 
स्त्रीमुक्तीच्या टोकाच्या कल्पना मनात बाळगाणाऱ्यांनी तर हे पुस्तक जरुर वाचण्याजोगं आहे. आयुष्याकडे समतोलपणे पाहण्याची एक नवी दृष्टी ‘सांगण्याजोगं’च्या वाचनाने आपल्याला लाभते. डॉ.शांताबाई गुलाबचंद यांच्या पुस्तकातल्या काही भागाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यास काहीच हरकत नसावी. आयुष्यातल्या आव्हानांचा निर्धाराने सामना करण्याचा वस्तुपाठच हे आत्मकथन आपल्याला देऊन जातं.
 
 
 

First Published: Sunday, December 25, 2011, 22:40


comments powered by Disqus