शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची वेगळी बाजू! - Marathi News 24taas.com

शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची वेगळी बाजू!

मंदार मुकुंद पुरकर
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब यांच्या आग्रा दरबाराला दिलेली भेट आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतेपर्यंतच्या घडामोडी हा आजवर अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्वपूर्ण कालखंड होता. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अंमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय  वाटणारी कामगिरी महाराजांनी फत्ते केली. त्यासंदर्भात इतिहासकारांना वाटणारं कुतहूल आणि आकर्षण स्वाभाविकच म्हणावं लागेल. त्यामुळेच केवळ मराठीतच नव्हे तर भारतीय भाषांमध्येही शिवाजी महाराजांच्या या कालखंडाचा अभ्यास अनेकांना करावासा वाटतो. अशाच अभ्यासकांपैकी एक आहेत राजस्थानातील घनश्याम माथुर.
 
 
घनश्याम माथुर यांनी दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागार तसंच राजस्थान राज्य अभिलेखागारात प्रदीर्घ काळ सेवा केली. माथुर यांनी शिवाजी की आगरा यात्रा’ या पुस्तकात महाराजांच्या आग्रा वास्तव्यात नेमकं काय घडलं याचा वेध अस्सल ऐतिहासिक दस्तावेजांच्या सहाय्याने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य १२ मे ते १८ ऑगस्ट १६६६ या तीन महिने आणि ६ दिवसांच्या काळात आग्रा इथे होते. त्या काळातील घडामोडी आणि घटनाक्रमा संदर्भात माथुर यांनी अतिशय कष्टपूर्वक संशोधन करुन या पुस्तकाचे लिखाण केलं आहे. माथुर यांना मूळ ऐतिहासिक कागदपत्र, पत्रव्यवहार, साधने यांच्यामुळे नवीन माहिती आणि वास्तवाचं आकलन झालं. त्यामुळेच शिवाजी की आगरा यात्रा या पुस्तकाला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
 
 
माथुर यांच्या निष्कर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही औरंगजेबाच्या अटकेत नव्हते. तसंच त्यांची दरबारातही भेट झाली नाही. महाराजांची आणि औरंगजेबाची भेट एका अंतर्गत दालनात झाली आणि त्यावेळेस औरंगजेबाने महाराजांकडे बघण्याचं टाळलं. या संदर्भात माथुर यांचे निरीक्षण असं आहे की औरंगजेबाला त्याच्या सरदारांनी महाराजांच्या अनेकविध चमत्कारांची माहिती पत्राद्वारे कळवली होती. आणि त्यामुळेच औरंगजेबाला भयगंडाने ग्रासलं होतं. महाराज आकाशात झेप घेऊ शकतात तसंच दिवसाला साधारणत३० ते ४० कोस चालू शकतात अशा अनेक कल्पोकल्पित कहाण्या औरंगजेबाला कळल्यामुळे त्याने सुरक्षित ठिकाणीच भेट घेण्याचं ठरवलं.
 
 
औरंगजेबाच्या दालनात झालेली ही पहिली आणि शेवटची भेट ठरली. या सर्व घडामोडींमुळे महाराजांनाही औरंगजेबाने आपल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष्य केल्याने संताप अनावर झाला. त्यामुळेच औरंगाजेबाने पाठवलेली भेटवस्तूही महाराजांनी नाकारली. महाराजांनी भेटवस्तू नाकारल्यानंतर औरंगजेब झालेल्या अपमानाचा सूड त्यांची हत्या करुन उगवेल अशी खात्रीच आग्रावासीयांना वाटू लागली. तसा प्रयत्नही औरंगजेबाने करुन पाहिला पण त्यात यश आलं नाही.मिर्झा राजे जयसिंह यांचे पुत्र कुँवर रामसिंह यांनी त्या विषयी वेळीच सावधगिरी बाळगली होती.
 
 
कुँवर रामसिंहाने दरबारातील सर्वच महत्वाच्या माणसांना हातीशी धरुन महाराजांच्या सुटकेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि त्यासाठी आपला सारा खजिना रिता करुन टाकला. औरंगजेबाची बहीण जहाँनारा जी बडी बेगम या नावाने ओळखली जात होती, वजीर जफर खाँ यांना आपल्या बाजूने वळवण्यात महाराजांना आणि रामसिंहाना यश आलं. महाराजांसाठी आणि कुँवर रामसिंहासाठी १४ ते १८ ऑगस्ट या शेवटच्या चार दिवसातील परिस्थिती करो या मरो प्रमाणे होती. याच काळात आग्रा येथून बाहेर पडण्यासाठी अनुमती पत्र तयार करुन घेण्यात रामसिंहांना यश आलं. शिवाजी महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यात तेजसिंह, रिणसिंह, गिरधरलाल वकील आणि गिरधरलाला मुन्शी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
 
 
कुँवर रामसिंहाने आपला खजिना सढळ हाताने रिता केल्याने खुद्द औरंगजेबालाच आपल्याच आदेशांची अंमलबजावणी करता आली नाही. याचाच अर्थ राजवट कोणतीही असो धन अशी माया आहे की ती राज्यकर्त्याच्या अंमल सुद्धा निष्प्रभ करुन टाकते. असो अनुमती पत्राच्या आधारे महाराज सहीसलामत महाराष्ट्रात पोहचले तिकडे रामसिंहांवर औरंगजेबाची मर्जी खफा झाली. कुँवर रामसिंहांना आग्रा सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. रामसिंहांवर एकवेळ पैशासाठी उसनवारी करण्याची आली पण ते आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाला जागले होते. आणि त्यामुळेच कुँवर रामसिंहांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार कायम राहतील.
 
 
घनश्याम माथुरांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे अनेक नवे पैलू प्रकाशात आले आहेत आणि त्यामुळेच ते वाचावयास हवंच. माथुर हिंदीभाषी असूनही त्यांनी आपल्या अनेकविध व्यापात लिखाणाचा संकल्प पूर्णत्वास नेला याबद्दल त्यांना साष्टांग दंडवत.

First Published: Tuesday, January 10, 2012, 23:24


comments powered by Disqus