Last Updated: Friday, January 13, 2012, 16:59
ऋषी देसाईrishi.desai@zeenetwork.com खरतर आपल्या कॅलेंडरच्या पानापानावर प्रत्येक दिवशी इतिहासातल्या एकतर आठवणीची किवा भुतकाळातल्या त्या दिवशीच्या आठवणीची नोंद असतेच. अशा ३६५ दिवसातला महाराष्ट्राचा स्वत:चा दिवस म्हणजे १४ जानेवारी. कारण याच दिवशी जोडला गेलाय संदर्भ पानिपताचा.
थोडसं आश्चर्य वाटेल की, पानिपत म्हणजे महाराष्ट्राला विसरावी अशी आठवण. पण मग त्याची उजळणी का आणि कशासाठी? पण नाही, १४ जानेवारी म्हणजे पानपताचा रणसंग्राम आठवून मस्तकाला कुंकुमतिलक लावण्याचाचं दिवस. पुन्हा थोडस् विचित्र वाटेल. वाटणारच ! कारण, आजपर्यंत इतिहासाच्या पानापानात पानिपत म्हणजे पराभव.. पानिपत म्हणजे नामुष्की.. पानिपत म्हणजे नाचक्की.. पानिपतम्हणजे मराठी साम्राज्याचा अस्त.. एवढच शिकवल गेल... आणि हो, हे वारंवार घोकून घेतल जायच... पण हे सगळ करताना आम्ही आपल्याइतिहासाचच पानिपत कधी करुन टाकल हे कळलच नाही... पानिपत म्हटले, की मराठी माणसांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त पराभवाचाइतिहास...!

पानिपतावरील लढाईने मराठी साम्राज्याला मोठा धक्का बसला असल्याने या भूमिबाबत मराठी माणसांना तसे फारसे प्रेम नाही; पण याच भूमिवर पानिपताच्या लढाईत कित्येक मराठी शूरांनी आपल्या छातीचा कोट करीत जिगरबाज झुंज दिली. पराभवाचा इतिहास विसरून मराठीशूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा इतिहास नव्या पिढीला कळणार कसा. काऱण आपल्याला फक्त विजयाचे पोवाडे ऐकायला आवडते. विजयझाला की सारेच असतात, आणि पराभव झाला की पराभवाला असतो फक्त बाजीराव!
दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा, असं म्हटलं की छाती भरुन येते. पण कधी विचार केलाय का, किती दिवस म्हणायचे रे, ''दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण '' दिल्लीच्या तख्तावरी बैसला महाराष्ट्र'' माझा असं कधी म्हणणार? की ते शिकवायला अब्दाली यायला लागणार का ? असो...
पानिपतच्या युद्धासंदर्भात मान्यवरांची मते फार विचारात घेण्यासारखी... १) "पानिपत हा मराठी मनाचा दुखरा कोपरा आहे. त्यावर फुंकर घालत किती दिवस जगणार? पानिपतच्या पराभवातूनच आजचा भारत उभा आहे ना!पराभवाने पिचणारे मन हे मराठी, किंबहुना भारतीय असूच शकत नाही ", असं न्या. शिरपूरकरानी एके ठिकाणी म्हटलं होत.
२) "तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा संपूर्ण पराभव झाला असता तर पानिपतोत्तर काळात एक प्रभावी सत्ता म्हणून मराठ्यांचा वावर झालानसता", असे प्रतिपादन नागपूरच्या डॉ. यादव गुजर यांनी केले होते.
३) "पानिपतचे युद्ध झाले नसते तर अहमदशाह अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व जिहादी राजसत्ता व प्रवृत्ती येथे रुजली असती. मात्र, यायुद्धामुळेच भारतात धर्मनिरपेक्षता अबाधित राखली गेली,'' असे विधान प्रा. सदानंद मोरे यानी म्हटलं होत.
४) पानिपतच्या निमीत्तानं शोध घेताना विचारवंताचे हे बोल खरच विचार करायला लावतात... १८५७ चे समर तोंडपाठ पण मग १७६१ चं का सपाट झालयं ?

काय झालं होत त्या दिवशी? नेमकं कोणामुळे आपण हरलो? परकीय शत्रूमुळे की स्वकीय फितुरांमुळे? थेट फितूर तर कोणीच नव्हते. पण एकदा कामराठा जिंकला की तो आवरणार नाही. आणि मराठा एकदा जिथं भगवा गाडतो तिथ भगवा उतरवायला आधी वादळवा-याशी सामना करावा लागणारआणि नंतर महाराष्ट्रातील कळीकाळांशी...
पानिपताचा इतिहास या क्षणाला आठवतोय तो असा.१७६१ च्या मकरसंक्रांतीचा दिवस, संपूर्ण महाराष्ट्र संक्रातीच्या आनंदात होता आणि रणांगणावर प्रत्यक्ष संक्रात कोसळली होती. घरादारातरांगोळ्यांचे सडे पडले होते, तर पानपतावर रक्ताचे सडे. महाराष्ट्रातल्या आयाबहिणीच्या माथ्यावर कुंकू सौभाग्य सजवत होत. तर महाराष्ट्रातल्यालेकीसूनांचं सौभाग्य मस्तकावर रक्ताभिषेक करुन घेत होतं. दुपारपर्यंत मराठी सैन्य विजयाकडे झुकले होते.
लढाईवर मराठ्यांचा ताबा होता. काहीदगाबाज, फुटीरता अशाच चुका नडल्या. नको ते निर्णय घेतले नी सैन्य वेढ्यात सापडले आणि रक्ताचे पाट वाहिले. १ लाख बांगडी फुटली, ९ लाखबांगड्याचा चुराडा झाला. २७ मोहरा हरवल्या. कित्येक खुर्दा झाला त्याचा तो थांगपत्ता नाही. मलाही नाही इतिहासात रमायचय. खर पानिपत तर पुढंच आहे. खरे मराठे पानिपत एकदाच हरले.. मेले मात्र इतिहासाच्या पानापानात. अन् बोथटझालेल्या मराठी मनामनात. तर मनातून तर आपण पानिपत पुसतोय.
तरी कुठं हे पानिपत?
दिल्लीपासून पंजाब अमृतसर हायवेवर हरियाणा राज्यात पानिपत हे शहर सुमारे ९० किलोमीटरवर आहे. हायवेवरून पंजाबकडे पानिपत गावातउजवीकडे सुनौती गावाची एक पाटी लागते. तेथून चार ते सहा किलोमीटरवर पानिपत बाजारपेठेतून जावे लागते. एक दर्गा आहे व त्या दर्ग्यापासूनदोन किलोमीटरवर "कालाआम' नावाने प्रसिद्ध असलेले हे ठिकाण म्हणजेच पानिपत युद्धाचे स्मारक.
हे पाहिल्यावर आपल्या वीरांबद्दल आपण कृतघ्न असल्याची जाणीव होते. आज २५० वर्ष होतायत, पण त्या मराठा वीरांचा संग्राम लोकांसमोर येतनाही. त्या समराची पाटी नाही. भावी पिढीला हा इतिहास, त्याची वीरता देशासाठीचा प्राणत्याग कळणार कसा? हे केवळ मराठा वीरांनी लढलेले युद्धनव्हे; भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्रातून तरणीबांड पिढी पानिपत युद्धात पेशव्यांच्या अधिपत्याखाली लढली. हे आपल्याला कधीकळणार ?
सुदैवानं आज पानिपतावर, पानिपत महोत्सव साजरा होतोय, मैत्रीद्वार उभारलं जाणाराय. इतिहासावर प्रेम करणारी माणसं खूप मनापासून वारसा जोपासतायत, बर वाटतं.. स्मारकाचा इश्यु न करताही इतिहास जपता येतो हे पानिपत महोत्सवानं दाखवून दिलयं. असो स्मारकावर नाहीकाथ्याकुट करायची. नुसते चार दगड बसवले तरी स्मारक होत की राव. पण त्या दगडांचा इतिहासच ठावुक नसला तरी आपल्याला ते थडगचदिसणार. पण खरा इतिहास ठावुक असला तर तिथली माती ही भाळी लावावीशी वाटत. हा फरक समजुन घेण आज गरजेचं बनलय. महाराष्ट्रातलापराक्रमाचा इतिहासच आपण बेदखल करतोय तिच पानिपतच काय बोलणार ! पण पानिपतचा लढा महाराष्ट्रासाठी नव्हता तो होता संपूर्ण हिदुंस्थानसाठी. पेशव्यानी आणि मराठ्यानी स्वताच्या राज्यावर ,प्राणावर, आणि जिवावर बेतुन मांडलेला महासंग्राम. पण मराठा गडी यशाचा धनीएवढच आपल्याला ऐकायला आवडत... अपयशाचा धनी हे ऐकायच नाही अन् बघायचं पण नाही.
पानिपतच्या महासंग्रामाला आता अडीजशे वर्ष पूर्ण होतील. त्यावेळी तरी त्या बहाद्दुरांच्या पराक्रमाची साक्ष देणार काही असेल का? कि तिथंही फक्तपानिपतच का! पानिपतच्या परीसरात आजही त्या लढाईतील सैनिक, सरदार मराठ्याचे वंशज तिथेच राहतात. कुठल्या इच्छेसाठी कसबागणपतीच्या पाया पडायचं? खंडोबाचा भंडारा कुठल्या अभिमानानं भाळी फासायचा? भीमा- नर्मदेच्या पात्रात कशासाठी तोंड धुवायच? त्रंबकेश्वरालाकाय म्हणून बिल्वदले वाहायची? कशासाठी महाराष्ट्रात यायच? आणि आहे तरी कोण तिथं आपलं? थोडी थोडकी नाही तरी साडेसहा लाखाहून जास्तपानिपत वंशज कुटुंब राहतात. भोसले ,पाटील, चोपडे नावाची कुटुंब ही मराठी कुटुंब, आपल्याच रक्ताशी नाती सांगणारी ही माणसे. देशासाठीलढायला म्हणून गेली अन् गावाला मात्र पारखी झाली. ज्या गावच्या मातीत ही लेकर वाढली तीच माती आपल्या लेकरांना मूठमाती द्यायला कानाकारु लागली. ज्या लेकरानी स्वातंत्र्यसाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं त्याच्या नावाने आसवे गाळणारं सोडा पण फुलं वाहणारे कोणी असूनये, याला काय म्हणाव ?
मी खूप वेड्यासारख लिहीतोय.. माझ्या घरातल कोणी नाही होत रे त्या लढ्यात. किबहुंना मी पूण्याचा पण नाही.. तरी पण वाईट वाटतय... फार वर्षापूर्वी रणागंण नाटक पाहिल होतं. त्या नाटकात अस म्हटलय.. मकरसंक्रातीच्या रात्री मराठ्याचे आत्मे महाराष्ट्रात येतात.
य़ावेळी पण येतील का १४ जानेवारीच्या रात्री ? कुठे असतील यावेळी ते आत्मे कोल्हापूरच्या आईच्या महाद्वार रोडवरुनं आईला पहात की जेजुरीच्या पायथ्याशीभंडारा शोधत? सारसबागेतील तळ्यातील गणपतीचं दुरुन दर्शन घेत की घृष्णेश्वराच्या कळसाचं दर्शन घेत कि वेड लागल्यासारख चंद्रभागेच्या काठीनाचत आसमंतात वाळु उधळून लावत असतील? काय करत असतील ठावुक नाही. पण हा, सुर्योदय व्हायच्या आत पुन्हा तिथच जायचं.. तुमच्यापानपतावर... हा महाराष्ट्र शूरांचा आहे.. तेजस्वी इतिहासाचा आहे... इथ तुम्हाला जागा नाही.
बस्स की आता मलाही जायचय. लेख संपवतोय. कारण माझ्यासारख्या भटकणाया आत्म्यानं मानवी देह नाही सोडला, तर हा पोरगा अन् त्याचा आत्माअसाच भ़टकत राहील.. पानिपत, पानिपत करत आणि कळणार पण ,पुढे काय झाल ते भाऊस्वामीसांरख.
जय पानिपत, जय महाराष्ट्र
First Published: Friday, January 13, 2012, 16:59