महायुतीचा 'भीम'टोला ! - Marathi News 24taas.com

महायुतीचा 'भीम'टोला !

Tag:  
संतोष गोरे
santosh.gore@zeenetwork.com
खडकवासला मतदारसंघात महायुतीनं मिळवलेला अनपेक्षित विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मस्तवाल राजकारणाला सणसणीत चपराक लगावणारा ठरला आहे. रमेश वांजळेंच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली सहानभुती, राष्ट्रवादीची मनी आणि मसल पॉवर, हातात असणारी सर्व सत्ताकेंद्र यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं पहिल्या दिवसापासूनच जड मानलं जात होतं. मात्र मी सांगेन तेच धोरण आणि तोरण, म्हणणा-यांचं मतदारांनी राजकीय सरणच इथं करून टाकलं.
 
मनसेच्या तिकीटावर निवडून आलेल्या रमेश वांजळेंच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या गोटात ओढून आणलं. रमेश वांजळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असं विधान सुप्रिया सुळे यांनी नागपूरात करून टाकलं होतं. रमेश वांजळेंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सलोख्याचे संबंध होते, असं सांगण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबडून खाण्याची ही स्वार्थी राजकीय प्रवृत्ती सामान्य मतदारांना मुळीच पसंत पडली नाही.
 
हर्षदा वांजळे या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. विधानसभा निवडणुकीत कै. रमेश वांजळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. मात्र तिथं त्यांची हेटाळणी करण्यात आली. नंतर ते मनसेच्या तिकीटावर निवडूनही आले. अर्थात हा इतिहास सर्वांना माहित आहे. तोच इतिहास मतदारांच्याही लक्षात होता. त्यामुळे हर्षदा वांजळेंची राजकीय कोलांटउडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबाडण्याच्या प्रवृत्तीचा मतदारांना वीट आला. आणि याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात दादा आणि ताईच्या साक्षीनं पराभवाला सामोरं जावं लागलं.
 
वेगवेगळ्या पक्षातले नेते फोडून पक्ष मोठा होत नाही. तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष मोठा होतो हे आता अजित पवारांनी समजून घेण्याची गरज आहे. मात्र हे त्यांना समजणार नाही. कारण हे त्यांच्या काकांनाही कधी समजलं नाही. ज्या पक्षाची निर्मितीच मुळात वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांच्या जीवावर झालेली आहे, तिथं या पेक्षा वेगळं काही घडण्याची अपेक्षाही ठेवण्याची गरज नाही.

आता शिवसेना, भाजप, रिपाइं या महायुतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. या पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यशैलीत बदल होईल अशा भ्रमात विरोधी पक्षांनी राहू नये. याचा वचपा काढण्यासाठी आता आगामी काळात पुण्यात पुन्हा जातीय राजकारणाला वेग दिला जाईल. जेम्स लेन, दादोजी कोंडदेव या सारखे मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेटवले जातील. दादरचं चैत्यभूमी नामांतर करण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरेल. शिवशक्ती - भीमशक्तीमध्ये कशा प्रकारे विघ्न आणली जातील यासाठी विविध मुद्दे मांडले जातील. कारण शिवशक्ती - भीमशक्तीच्या जोरदार टोल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला घरातच तोंडावर आपटावं लागलं आहे.

 
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न न सोडवता दलित समाजाला झुलवण्याचं काम काँग्रेसनं केलं होतं, हा इतिहास इथं विसरता येणार नाही. आता त्याच काँग्रेसमधून फुटून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस जुना इतिहास साकारण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सुचवलेला मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा पर्याय सरकारने स्वीकारला. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार सर्व जनतेनं स्वीकारला. आता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाला रोखण्यासाठी 'दादर चैत्यभूमी' असा नामविस्तार करण्यात काय हरकत आहे ?

First Published: Saturday, October 22, 2011, 14:46


comments powered by Disqus