गावात काय आहे? - Marathi News 24taas.com

गावात काय आहे?

Tag:  

अमोल जोशी

मी गावात राहतो. जन्मापासून. गावातल्या शाळेत शिकलो. कॉलेजला तालुक्याच्या गावी गेलो. ग्रॅज्युएट झालो. सेकंड क्लास मिळाला. घरची परिस्थिती बेताची. ग्रॅज्युएट झालो तेव्हा वडील शेती करायचे. थकले होते. मी शेतीत कधी लक्ष घालतो याची वाट बघत होते. लवकरात लवकर कमवायला सुरूवात करायची होती. शेतीतही लक्ष घालायचं होतं. बरोबरचे काही मित्र पुढच्या शिक्षणासाठी गाव सोडून पुण्या-मुंबईला गेले. मी विचार केला, आपण गाव सोडणं बरोबर होणार नाही. शेती कोण करणार?आईवडिलांकडं कोण बघणार? शेती करायला सुरूवात केली. नोकरीचा शोध सुरू होताच. बरेच दिवस नोकरी मिळत नव्हती.

सरकारी नोकरी मिळवण्याएवढी ऐपतही नव्हती आणि ओळखही. दोन वर्षांनी शुगर फॅक्टरीत लागलो. पगार विचारू नका.

गाव सोडलेले मित्र फोन करायचे. काहीजणांचं शिक्षण संपून चांगली नोकरी मिळाली होती. काहीजण उच्च शिक्षणासाठी देशाबाहेर चालले होते. माझी नोकरी आणि शेती सुरू होती. नोकरी काही सरकारी नव्हती. ओळखीनं लागलेली. कागदावर नसलेल्या पण तोंडी मान्य केलेल्या अटी पाळाव्या लागायच्या. आजही लागतात. नोकरी टिकवण्यासाठी यांच्या मागेमागे फिरावं लागतं. सभांना जावंच लागतं. पटत नाही, पण घोषणाबाजी करावी लागते. नाहीतर कधी घरी बसवतील याचा नेम नाही. गाव सोडलेल्या मित्रांचं मात्र माझ्यापेक्षा बरं सुरू आहे. शेड्युल टाईट असतं म्हणतात.पण ड्युटी संपली की ते त्यांच्या मर्जीचे राजे. आमचं तसं नाही. गावात ग्रुप तर इतके झालेत, की बोलता सोय नाही. बरच्या गल्लीचा गट, खालच्या गल्लीचा गट, काँग्रेसचा गट, मनसेचा गट..

गावातला प्रत्येक तरुण कुठल्या ना कुठल्या गटात आहे. गटाला नावं द्यायची, टी-शर्ट छापायचे आणि शायनिंग मारत फिरायचं... बरं करणार तरी काय.. ज्याच्याकडं नोकरी आहे, तो कमीत कमी सात आठ तास तरी कामात असतो.पण गावात उडाणटप्पूच जास्त आहेत. वेळ काढणार तरी कसा...


शहरातल्या मित्रांचं बरं आहे. त्यांचेपण ग्रुप आहेत. पण ते संध्याकाळी वगैरे कोल्ड कॉफी, ब्रेकफास्ट किंवा सिगरेट बिगरेट पिण्यासाठी एकत्र येतात. सुट्टीदिवशी ट्रिप वगैरे काढतात. पण मला सुट्टी म्हटलं की अंगावर काटा येतो... दिवसभर करायचं काय? काय आहे गावात टाईमपासला? वेळ कसा काढायचा? राजकारणात आपल्याला रस नाही..गावातल्या पोरांना भेटावं म्हटलं तर एकमेकाचा काटा काढण्याशिवाय यांच्या डोक्यात दुसरा विषय नसतो... बरं ग्रुपचं कौतुक इतकं वाढलंय, की दुसऱ्या ग्रुपमधल्या कुणाशी बोलावं तरी पंचाईत. ह्याच्याशीच का बोलत होतास, म्हणून आमच्या ग्रुपवाले जाब विचारणार... तुला काय करायचंय असं म्हटलं, तर साहेबांपर्यंत नाव नेणार... मग सगळ्यांनाच शंका... साहेबांना संशय आला, तर मग नोकरी सोडून बसा घरी... ज्याच्याशी बोललो त्याचीपण गोची. एका गावात राहून लोकांशी बोलायची चोरी झालीय. शहरातल्या मित्रांचं बरं आहे. ते कुणाशी बोलतात यावर त्यांचं पोट अवलंबून नाही...

पण शहरातले मित्र कधीकधी भिकेचे डोहाळे लागल्यासारखं करतात. काल एकजण मुंबईहून गावात आला होता.. टिव्हीत कामाला आहे. बातम्या सांगतो... बोलता बोलता बोलला," तुम्ही गावात राहता. नशीबवान आहात... धावपळ नाही, गोंधळ नाही.. शुद्ध हवा. चांगलं अन्न... ताजं दूध..." त्याला म्हटलं की अख्खा जन्म शहरात गेल्यासारखा फिल्मी बोलू नको..

दिवसभर काय करायचं हा प्रश्न पडत असेल, तर ताजी हवा काय करायचीय? मला म्हणत होता की गावात खर्च पण कमी होतो. आता पैसेच नाहीत पोरांकडं तर खर्च करणार कुठून... गावातल्या पोरांचं शिक्षण बघितलं, तर बीए, बी.कॉम किंवा बी.एस्सी.. याच्यापुढं आणि याहून वेगळं जी शिकली, ती एकतर बाहेर पडली,किंवा त्यांचं बरं सुरू आहे. पण ९० टक्के जनता बीए, बी,कॉम आणि बी.एस्सी. नोकऱ्या मिळणार त्या पण पाच हजार, सात हजार किंवा जास्तीत जास्त दहा हजार.  त्याला पण वशीला पाहिजे...आणि पाच दहा हजारात काय होतंय हल्ली? त्याला म्हटलं लेका तू मिडीयात आहेस, टीव्हीवर दिसतोस, लोक बघतात. पोटापाण्याचं टेन्शन नाही,सगळं सेटल आहे.  म्हणून तुला हे सगळं हवा, अन्न, ताजं दूध बिध आठवतंय. तर मला म्हणाला की गावाची ओढ काय असते, हे

गाव सोडून गेल्याशिवाय कळणार नाही.गप्प बसलो. मनात म्हटलं की यांची जळत नाही, म्हणून बोलतायत.

मला म्हणाला की मुंबई सोडून गावात राहायला यावं, असं वाटतं. मी म्हणालो आहेस तिथं बेस्ट आहेस. तिकडं कंटाळा आला, की वर्षातनं दोन चारवेळा गावाकडं यायचं...मोकळी हवा घ्यायची... शांत व्हायचं आणि पुन्हा निघून जायचं. यातच भलं आहे.नाहीतर आमच्यासारखी गत होईल... त्याला काही हे पटल्यासारखं वाटलं नाही. पण मित्र म्हणून आपलं काम आहे, खरं काय ते सांगायचं.. जाताना म्हणाला ये एकदा मुंबईला फोन करून.. म्हटलं बघूया. मागच्या वर्षी एकदा गेलो होतो त्याच्या घरी.. पण मुंबईत कुणाकडंही गेलो तरी आपण त्यांना अडचण करतोय असंच वाटतं.. म्हणून जाता जाता त्याला म्हणालो, "तू गावाकडं आलास की तुला परत मुंबईला जाऊ नये,असं वाटतं. पण आम्हाला मात्र मुंबईला आल्यावर कधी एकदा परत गावाकडं येतो,असं होतं."

First Published: Saturday, January 28, 2012, 13:17


comments powered by Disqus