Last Updated: Monday, November 21, 2011, 06:31
आशा ताईंबरोबरची मुलाखत नेहमीच वेगळी ठरते. नुकतीच दिवाळीनिमित्त आशाताईंच्या घरी जाणं झालं. जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तर दिसलं की खुद्द आशाताई घरात पाटावर रांगोळी काढत होत्या. मला हे अगदी अनपेक्षित होतं. मला पाहताच त्यांनी नेहमीप्रमाणेच माझं अगदी प्रसन्नतेने स्वागत केलं. या वयातला त्यांचा उत्साह, हा खरच तरुणांनाही थक्क करणारा असाच आहे. एरव्ही मी त्यांच्या घरी कधी गेली की त्या नेहमी किचनमध्येच दिसतात. मात्र त्यांना पाटावर रांगोळी काढताना पाहून मला खरोखच खूप आश्चर्यच वाटलं. एवढी महान गायिका आणि पाटावर रांगोळी काढतेय ? यामधून आशाताईचं सेलिब्रिटीपेक्षाही गृहणीचं रुप प्रकर्षाने दिसून आलं.
आशाताई मुलाखतीमध्ये नेहमीच मनमोकळ्या बोलतात. हातचं राखून काही बोलणं हे त्यांच्या स्वभावातच नाही. त्यांचा मनमोकळा स्वभाव नेहमीच त्यांच्या मुलाखतीमध्ये दिसून येतो. तसा तो यावेळीही मुलाखतीमध्ये दिसून आला.
दिवाळीनिमित्ताने झी २४ तासने त्यांना दिलेलं त्यांचं रांगोळी रुपात साकारलेलं व्यक्तिचित्रं त्यांना खूपच आवडलं. या सरप्राईज गिफ्टला त्यांनी मनापासून दाद दिली. रांगोळीमध्ये स्वत:चं प्रतिबिंब पाहून आशाताई फारच आनंदित झाल्या.

या मुलाखतीमध्ये आशाताईंनी त्यांच्या बालपणीच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणींमध्ये आशाताई अगदी रमून गेल्या होत्या. बालपणी सर्व भावंडासोबत साजरी केलेल्या दिवाळीच्या आठवणी यानिमित्ताने त्यांनी मला सांगितल्या. माईंबरोबरची अविस्मरणीय दिवाळी, कोल्हापूरच्या घराघरात जाऊन केलेला फराळ, लतादीदींची फटाके वाजवताना होणारी गंमत सांगताना आशाताई पुन्हा त्या काळातच निघून गेल्या होत्या.
आशाताई म्हणाल्या, “लहानपणी माई पाटाभोवती रांगोळी काढून सगळ्यांना तेल लावून आंघोळ घालायची. आंघोळीनंतर कुंकू लावल्यानंतर सगळी भावंडे एकत्र बसून फराळ खायचो. तसंच कोल्हापूरला घराघरात कंरज्या, लाडू केवळ खायलाच नाही तर, करायलासुद्धा आपण आवर्जून सगळ्यांक़डे जायचे . लहानपणी मी दांडगट असल्यामुळे सगळी मोठी कामं मलाच
दिली जायची.”
अविस्मरणीय दिवाळीची आठवण सांगताना आशाताईंनी साता-याच्या दिवाळीचा आवर्जून उल्लेख केला. आशाताई म्हणाल्या, “साता-याला असताना माईने एकदा एका विंगमधून दुस-या विंगमध्ये नेऊन थंडीत कुडकुडत आपल्याला आंघोळ घातली होती. ती दिवाळी मी कधीच विसरणार नाही”
या गमती जमतींबरोबरच दिवाळीनिमित्त घडलेले संस्कारही त्यांनी आवर्जून मला सांगितले. नरकचर्तुर्थीला सूर्य उगवायच्या आधी आंघोळ झालीच पाहीजे, हा लहानपणापासून सुरू झालेला पायंडा आजपर्यंत आपण पाळत असल्याचं त्यांनी सांगितलं.

“खरंतर दिवाळी माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असते. पण, यंदा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये माझ्या नावाची नोंद झाली आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय. त्यामुळे यंदाची दिवाळी माझ्यासाठी खास आहे” असं आशाताईंनी सांगितलं.
आशाताई पुढे म्हणाल्या. “मी भारतीय आहे, मराठी मातीतली आहे. त्यामुळे गिनीज बुकमध्ये माझ्या नावाची झालेली नोंद हा फक्त माझा एकटीचा सन्मान नसून हा या महाराष्ट्राचा आणि या देशाचा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो.”
आशाताईंच्या व्यक्तिमत्त्वाच्या आज नेहमीपेक्षा वेगळ्या पैलूचं दर्शन मला झालं. काही प्रमाणात एका जगद्विख्यात स्वरसम्राज्ञीच्या अंतरंगात डोकवायला मिळालं. आशाताईंनी आपल्या अनेक जुन्या गीतांबरोबरच जुन्या आठवणींनाही उजाळा दिल्यामुळेच माझ्यासाठी यंदाची दिवाळी सुरेल आणि अविस्मरणीय हे मात्र खरं !
First Published: Monday, November 21, 2011, 06:31