गोष्ट...बालपण हरवलेल्या वाघाची !, Tiger lost childhood?

गोष्ट...बालपण हरवलेल्या वाघाची !

गोष्ट...बालपण हरवलेल्या वाघाची !
रमेश जोशी, असिस्टंट प्रोड्युसर, झी २४ तास

गोष्टीतलं एक जंगल होतं.... जसा काळ बदलला तसं जंगलही आधुनिक झालेलं... आजीकडून ऐकलेल्या गोष्टीतल्या जंगलासारखं हे जंगल नव्हतं. ते पूर्ण आधुनिक झालं होतं... या जंगलात आता लोकशाही आली होती. प्राण्यांनी प्राण्यांसाठी केलेलं राज्य अशी इथल्या लोकशाहीची व्याख्या होती. असं असलं तरी प्राण्याच्या लोकशाहीतही वाघोबाशाही निर्माण झाली होती. एका वाघानं स्वतःचं राज्य निर्माण केलं होतं. वाघोबा राजासारखाच वागत होता. वाघोबाच्या एका डरकाळीनं पूर्ण जंगल गप्पगार होत असायचं...वाघोबा बंद म्हणाला की रानात एक चिटपाखरुही दिसायचं नाही. सगळीकडं सामसूम अशा या वाघाचा दरारा संपूर्ण जंगलात निर्माण झाला होता.

वाघोबा म्हणजे सेन्सॉर बोर्डच म्हणाना... वाघोबा म्हणाला की हे चालणार नाही तर नाहीच... वाघोबाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ होती... वाघोबा हळूहळू म्हातारा झाला. वाघोबाचा मुलगा वाघोबाचं राज्य पाहू लागला. वाघोबाचा दरारा तो वाघ निर्माण करू शकला नाही. त्या वाघाला स्वतःच्या काही मर्यादा होत्या. आपल्या शब्दात सांगयचं तर वाघोबा ‘रावडी राठोड’ होता, तर वाघाचा मुलगा अगदीच अमोल पालेकर म्हणाना. आणखी सोपंच सागांयचं तर वाघोबा अमिताभ बच्चन होता. आणि वाघाचा मुलगा अभिषेक बच्चन. तर या वाघाच्या मुलालाही एक बछडा झाला... वाघोबा अजोबा झाले होते... तर त्यांचा मुलगा ‘वाघबाबा’ झाला होता.

वाघोबाशाहीच्या तिस-या पिढीचा ताबेदार जन्माला आला होता. छोटासा बछडा म्याऊ... म्याऊ करायचा... मोठ्या वाघोबा अजोबांच्या अंगाखांद्यावर खेळाचचा.... जंगलात दुडूदुडू उड्या मारायचा.... वाघिण आईनं दिलेलं बोर्नव्हिटा पिऊन गुहेच्या परिसरातील प्राण्यांच्या मुलांमध्ये खेळायचा. बोनव्हिटा पिऊन आलेल्या छोट्या छोट्या बेटकुळ्या दाखवायचा. आता कुठं बछ़ड़्याच्या पंज्याला छोटी छोटी नखं आली होती. या पंजात अजून ससुलेही येत नव्हते... बाघोबा अजोबा कधीकधी मस्करीत म्हणायचे. ‘बछड्या तुला मोठ्या शिकारी करायच्या आहेत’ बछ़ड्याला काय ते कळत नव्हतं. पण वाघोबा अजोबा काही तरी मोठी शिकार करायला शिकवणार याची कल्पना आली होती. बछड्याला अजून शिकारीतलं काहीच कळत नव्हतं. फक्त दुधावर हा बछ़डा जगत होता.

छान मित्र परिवार होता. त्यांच्यासोबत मजेत दिवस जायचा बछड्याचा.. बछडा थोडासा वयात येऊ लागला होता. अंगावरचे पट्टे थोडेफार गडद होऊ लागले होते. सोबतच्या सवंगड्यांच्या अनेक मैत्रिणी होत्या. आपल्याही मैत्रिणी असाव्यात असं बछड्याला वाटू लागलं होतं. सगळ्यांची नजर चुकवून मैत्रिणीला जंगलातल्या तळ्यावर डेटसाठी न्यावं असं त्याला वाटायचं. फेसबुकवर, ऑर्कूटवर मैत्रिणींचा गोतावळा निर्माण करावसा वाटत होता. वाघोबाअजोबाचं वलय असल्यामुळं थोड्या अडचणी होत्या. मात्र त्याचा खेळण्याबागडण्यावर फारसा प्रभाव नव्हता... अजोबा वाघाची मात्र थोडीशी वेगळी चिंता होती.
गोष्ट...बालपण हरवलेल्या वाघाची !

वाघबाबा अजोबांच्या जंगलातल्या राज्याचा कारभार खूपच उशिरा पहायला लागला होता. त्यामुळं बाबावाघासमोर अनेक आव्हानं निर्माण झाली होती. पण अजोबावाघाच्या करिष्म्यानं ही आव्हानं त्यांनी परतून लावली होती. हीच अडचण बछड्यासमोर उभी राहू नये म्हणून बछड्याचा राजतिलक करायचा असं ठरलं....बहुतेक वाघिण आईच्या डोक्यात ही आयडियाची कल्पना आली होती. मगं काय प्राणी लागले कामाला.... वाघाच्या शिलेदारांनी मोठी नीलगाय मारली. ती नीलगाय बछड्यानं मारली असं सांगून त्याचा राज्याभिषेक केला.

अजून पूर्ण न वाढलेले सुळेदार दात त्याला दाखवावे लागले. म्याऊ म्याऊ करण्याच्या वयात एक नकली डरकाळी फोडावी लागली. बछ़ड्याचा राजकुमार म्हणून राज्याभिषेक झाला होता. जंगलातल्या प्राण्यांसाठी ही विशेष गोष्ट नव्हती. मात्र त्या एका घटनेनं बछड्याचं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. वाघिण आई आता बोर्नव्हिटा देत नव्हती... ती सारखी म्हणायची आता तु मोठा झालास.. मोठ्या वाघासारखं वाग... रोज सकाळी जबरदस्तीनं लवकर उठवायची... लोकांसमोर मोठा वाघ झाल्यासारखं वागायला सांगायची. सवंगड्यांमध्येही सगळेच आता टरकून वागू लागले.

ज्या मैत्रिणी मला आवडायच्या त्या मैत्रिणी आता वा-यालाही उभ्या राहत नव्हत्या. फेसबुक आणि ऑर्कूटवर कोणीही चॅटिंग करीत नव्हत. कुणा मैत्रिणीला प्रेमात हाक मारली तर ती अदबीनं युवराज म्हणून लवून मुजरा करायची. सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. अचानक आलेला मोठेपणा पचवण्यास जड जात होता. धड मिशाही आल्या नव्हत्या. वाघिणआई उगाचच डरकाळ्या फोडायला सांगायची. शिकार करणे हा वाघोबाच्या कुळाचा उपजत गुण पण तोही धड आत्मसात करता आला नाही. पहिल्यांदा सशाची शिकार करायची, मग हरणाची पिल्लं, मग गवा अशी प्रगतीच करता आली नाही. शिकारीचे डावपेच शिकायचे राहून गेले. शिकारीतल्या खाणाखूणा शिकायच्या राहूनच गेल्या.

बछड्यावर लादलेले मोठेपण पावलोपावली जाणवतं होतं. बछड्यात तरुणपणाही राहिला नव्हता आणि प्रौढत्वही आलं नव्हतं. कदाचित त्या बछड्याला स्वच्छंदी खेळू दिलं असतं. चांगल्या वाईट गोष्टी स्वतःच शिकायला लावल्या असत्या. तर तो मोठा वाघ झाला असता. अनेकवेळा शिकार हातची निसटून गेली असती. पण त्या अपयशातून शिकारीत प्रवीण झाला असता. कदाचित तो अजोबावाघांपेक्षा मोठा शिकारी झाला असता. दुखः या सगळ्यांचं आहे. खरं दुखः आहे ते एका वाघाच्या बछड्याचं बालपण अकाली हरवण्याचं.... कारण बालपण परत येत नाही.... याच बालपणातील मौजमजा, स्वच्छंदीपणा आयुष्यातील पुढच्या संघर्षासाठी ऊर्जा देणारं इंधन असतं. हे बहुतेक वाघाचं कुटुंब विसरलं असेल,,, तुम्ही विसरु नका..... तुमच्या बछड्यांना स्वच्छंदी जगू द्या.

First Published: Tuesday, May 7, 2013, 12:16


comments powered by Disqus