अजित दादांच्या वर्चस्वाला सुरूंगाची शक्यता? - Marathi News 24taas.com

अजित दादांच्या वर्चस्वाला सुरूंगाची शक्यता?

झी 24 ताससाठी पुण्याहून कैलास पुरी
पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला...जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील सज्ज झालेत. तर युतीनं पवारांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसलीय.
 
पुणे जिल्हा परीषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यारुपानं राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. 2007 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं एकूण 75 जागांपैकी 48 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तसंच निवडून आलेल्य़ा 5 अपक्षांपैकी चार जणांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. काँग्रेसला 14 जागा, शिवसेनेला 5 भाजपला दोन तर पुरंदरमध्ये जनता दलानं एक जागा जिंकली होती.
 
आता जनता दलातल्या नेत्यांनी मनसेची वाट धरलेली आहे. गेल्या वेळच्या निकालाची यावेळीही पुनरावृत्ती करु असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत.
 
पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार असले तरी स्थानिक स्वरज्या संस्शेत शिवसेनेची तादक मर्यादित आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टक्कर देऊ आणि जिल्हा परिषदेत भाजपच्या मदतीनं शिवसेनेची सत्ता आणू असा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलाय.
 
पुणे जिल्ह्यात हर्षवर्धन पाटील आणि अनंतराव थोपटे हे पवारांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला जशास तसं उत्तर देऊन त्यांना पर्यायही देऊ असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत.
 
दोन्ही महापालिकेसोबत जिल्हा परिषदेतची एकहाती सत्ता ठेवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे. तर उपमुख्यमंत्र्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी युती आणि काँग्रेस सरसावले आहेत.
 

First Published: Monday, January 16, 2012, 19:55


comments powered by Disqus