Last Updated: Friday, January 27, 2012, 22:11
नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खंडणी, धमक्यांसंदर्भातही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अरिहंत या कंपनीला धमकावल्याचा आरोप आहे. बांदल य़ांच्या कारवायांना कंटाळून दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्तावही दिला होता.
याच बांदल यांना जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. ही यादी जाहीर करण्यासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, बांदल यांच्याबद्दल काहीच माहिती नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.
बांदल यांनाही आपण काही चुकीचं केलं आहे, असं वाटत नाही. बांदल यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्या यादीत जाहीर केली. पण ७५ पैकी ५१ उमेदवारांची नावंच जाहीर करणं त्यांना जमलं. जुन्नर, आंबेगाव आणि दौंड तालुक्यातला एकही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.
First Published: Friday, January 27, 2012, 22:11