आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष - Marathi News 24taas.com

आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष


www.24taas.comरत्नागिरी/कणकवली
 
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे.  त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.
 


रत्नागिरी जिल्ह्यात दोन्ही कॉंग्रेसमधील आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही पक्ष आमने-सामने उभे आहेत. त्यातच संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचाच वरचष्मा आहे. दोन्ही कॉंग्रेसमधील मत विभाजणाचा फायदा हा सेनेला होण्याची शक्यता आहे. त्यातर बहुजन विकास आघाडी, कुणबीसेना आणि आरपीआय हे पक्ष या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मनसेने आपली ताकत अजमवण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. याचा फटका हा दोन्ही कॉंग्रेसला बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.
 
 
सिंधुदुर्गात कॉंग्रेसला रोखण्यासाठी सर्वपक्षीय महायुतीत कॉंग्रेसविरोधक एकत्र आलेत. असे असताना कॉंग्रेसलाच सर्वाधिक बंडखोरीचा फटका बसला. आता या बंडखोरांचे मन वळविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जयेंद्र रावराणे वगळता इतरांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. कॉंग्रेसने बंडखोरी शमविण्याबरोबरच अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, यात किती यश येते यावर बरेच काही अवलंबून आहे.
 
 

सिंधुदुर्गात कॉंग्रेसने उमेदवारी यादी जाहीर करण्यास वेळ लावला. त्यांच्या रणनीतीवर लक्ष ठेवून असलेली महायुतीही यामुळे चाचपडत राहिली. या पक्षाकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती. यादी कशी आली तरी अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी होण्याची शक्‍यता कायम होती. कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे तिकीट न मिळालेले नेते संतापले. काहींना कोणता झेंडा घेऊ हाती, असा  प्रश्‍न पडला. कॉंग्रेसच्या इच्छुकांमध्ये तब्बल ६९६ जण मुलाखतीसाठी उपस्थित होते. तिकीट मात्र दीडशे जणांनाच मिळणार होते. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी बंडाचे निशाण हाती घेऊन कॉंग्रेसलाच नामोहरम करण्याचा इशारा दिला. ही संधी साधून कॉंग्रेसविरोधी पक्षांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढले.
 
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गुरू सावंत, माजी सभापती प्रकाश कवठणकर, उपसभापती पंढरीनाथ राऊळ यांना थेट पक्षात प्रवेश दिला. त्या पाठोपाठ माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, माजी उपाध्यक्ष जनार्दन तेली आणि माजी सभापती जयेंद्र रावराणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. याचबरोबर ग्रामीण भागातील काही इच्छुकांनी आपापल्या सोयीच्या मतदारसंघात अपक्ष आणि कॉंग्रेसच्या नावाने उमेदवारी दाखल केली. काहींनी अधिकृत उमेदवारावर नाराजी व्यक्त करत, तर काहींनी स्वतः निवडून येण्याचा दावा करत बंडखोरी केली आहे. काही ठिकाणी मतदारसंघाबाहेरील उमेदवार दिल्याने बंडखोरीला पेव फुटले आहे.
 
 
ज्या बंडखोरांचे अर्ज वैध ठरले, अशांची मनधरणी सुरू झाली आहे. यात जयेंद्र रावराणे यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. इतर मात्र आजही तळ्यात मळ्यात आहेत. कॉंग्रेसमधील सक्षम अपक्षांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा महाआघाडीचे नेते देऊ लागले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची अस्वस्थता वाढू लागली आहे. दरम्यान,  राष्ट्रवादीची जेथे ताकद नाही तेथे त्यांचे उमेदवार दिल्याने युतीचे घटकपक्ष नाराज आहेत.
 

First Published: Saturday, January 28, 2012, 17:04


comments powered by Disqus