अॅक्शन रिप्ले
१९६० ते २००० या दशकांमध्ये हिंदी सिनेमा बहरला. त्याने नवनवे प्रयोग केले. कमालीचं यश मिळवलं. हिंदी सिनेमात या दशकांमध्ये विविधता आली. कसे घडत गेले या दशकांमध्ये बदल?
१९६०
या दशकाला सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ मानलं जातं. या काळात बनवली गेलेली गाणी तेव्हा रेडिओवर आणि अजूनही आयपॉडवर रसिक ऐकत असतात. या दशकातील सिनेमातले संवादही अतिशय घरंदाज, सुसंस्कृत वाटत. खलनायक नायिकेच्या प्रेमात असत आणि नायिकेचं त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी नायक सज्ज असत. नायक-नायिकेचं प्रेम म्हणजे बागेत झाडांभोवती नाचणं- गाणं असे. प्रेमभंग झाल्यावर पार्टीत पियानो वाजवत दर्दभरं गीत गाणं ही नायकाची आणखी एक खासियत होती. रस्त्यांवर व्हिंटेज कार्स फिरताना दिसायच्या. हिरॉइन्स मोठमोठे गॉगल्स घालायच्या. त्यांचे फॅशनेबल कपडे म्हणजे टाइट चुडीदार असायचे. श्रीमंतांचे बंगले म्हणजे घरात गोलाकार जीने असत. गरिबी म्हणजे स्लीलच्या भांज्यात एकवेळचं जेवणारे गरीब दिसत. सिनेमाला रंग येऊ लागला होता. प्रथमच हिंदी सिनेमा परदेशात शूट होऊ लागला होता. संगम, लव्ह इन टोकयो, ऍन इव्हिनिंग इन पॅरीस यांसारख्या सिनेमांतून ते पाहायला मिळालं.
१९७०
या दशकामध्ये अँग्री यंग मॅनची प्रतिमा पडदा गाजवू लागली होता. नायकाचं प्रमुख काम व्हिलनचा बदला घेणं हेच असायचं. खलनायक सहसा स्मरलर असायचे. नायकाचे आई किंवा वडील किंवा दोघेही लहानपणीच खलनायकाकडून देवाघरी पाठवले गेले असायचे. अमिताभ बच्चनने हा काळ चांगलाच गाजवला. या जमान्यातल्या हिरॉइन्स काहीशा बोल्ड दिसू लागल्या होत्या. रंगीबेरंगी कपडे, भलेमोठे गॉगल्स घालणं ही या नट्यांची फॅशन होती. झीनत अमान, परवीन बाबी या नट्यांनी तरुणांच्या मनात घर करायला सुरूवात केली होती. बदलत्या राजकीय व्यवस्थेमुळे समाजात असंतोष निर्माण झाला होता. याचा उद्रेक सिनेमातून दिसून येऊ लागला होता. मारधाडीशिवाय काही हळवे आणि विनोदी सिनेमेही या काळात बनले. गोलमाल, छोटीसी बात, आंधी, मौसम, कोशिश, आनंद यांसारखे नितांत सुंदर सिनेमेही याच काळात गाजले.
१९८०
हा काळ हिंदी सिनेमातला वाईट काळ मानला जातो. या काळातलं संगीत म्हणजे पाश्चात्य संगीताचं चौर्यकर्म होतं. सिनेमांच्या कथा ७० च्या दशकातल्या असल्या, तरी बटबटीत होऊ लागल्या होत्या. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक दिसू लागला होता. सिनेमांच्या कथा सरधोपट असत. तरी त्यातल्या त्यात वेगळ्या धाटणीचे सुंदर सिनेमेही या दशकाने दिले. इजाजत, मासूम, अर्थ, चश्मेबद्दूर, सिलसिला, मि. इंडिया, एक दुजे के लिये असे सिनेमे या काळात आले. तसंच कयामत से कयामत तक, चांदनी, मैने प्यार किया हे सिनेमेही या दशकात नवी झुळूक घेऊन आले.
१९९०
नव्वदीच्या दशकामध्येही फारसा बदल दिसला नसला, तरी काही आशादायक चित्र दिसून येऊ लागलं होतं. प्रेमपटांच्या कथा नव्याने लिहिल्या जाऊ लागल्या. बदलत्या अर्थव्यवस्थेचं प्रतिबिंब सिनेमांमध्ये प्रकर्षाने दिसू लागलं. काही प्रमाणात राजकारणी खलनायक दिसत असले, तरी एकंदर खलनायकांचं सिनेमातील प्रमाण कमी होऊ लागलं. घरातील वडीलधारी माणसंच कधी काहीशी खलनायकी दाखवली जात किंवा प्रेमाला पाठिंबा देणारी दाखवली जाऊ लागली. दिल, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, हम है राही प्यार के, हम दिल दे चुके सनम, राजा हिंदुस्तानी अशा सिनेमांना लोक वारंवार गर्दी करू लागले. रंगीला, सत्यासारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमेही लोक पाहू लागले.
२०००
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वांत जास्त विविधता देणारं, नाविन्याने ओतप्रोत भरलेलं दशक म्हणून २००० च्या दशकाकडे पाहिलं जातं. या दशकात भारतीय सिनेमा नव्या उंचीवर जाऊन पोहोचला. मल्टिप्लेक्स संस्कृतीमुळे एकाहून एक भन्नाट प्रयोग सिनेमांमध्ये होऊ लागले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतीय सिनेमे बनू लागले. कहो ना प्यार है, दिल चाहता है, रंग दे बसंती या सिनेमांतून तारुण्याची स्पंदनं टिपली गेली. लगान, चक दे इंडिया सारख्या सिनेमांतून खेळाचा समावेश सिनेमासाठी योग्य प्रकारे केला गेला. ओमकारा, मकबूल या सिनेमांनी शेक्सपिअरदेखील भारतीय सिनेमात मिसळू शकतो, हे दाखवून दिलं. हेरा फेरी, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, ३ इडियट्स यांसारख्या सिनेमांनी नवा ताजा विनोद लोकांसमोर आणला. तारे जमीन पर, पा, गुजारीश सारख्या सिनेमांतून आजारांचे विषयही संयतपणे हाताळले गेले. धूम सारख्या सिनेमांतून हॉलिवूड स्टाइलचं तंत्रज्ञान भारतीय सिनेमांत दिसलं. पेज ३, चांदनी बार यांसारख्या वास्तरवदर्शी सिनेमांतून अकथित जग पडद्यावर अवतरलं. आर्ट फिल्म्सच्या नावाखाली ठराविक लोकांसाठीच बनवले जाणारे सिनेमे अधिकाधिक प्रेक्षक मिळवू लागले आणि भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर नावाजला जाऊ लागला.
/marathi/slideshow/अॅक्शन-रिप्ले_216.html