काय म्हणाले राज ठाकरे...
आज राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी राज ठाकरे वेगवेगळ्या विषयांवर आपल्या नेहमीच्या शैलीत टोलेबाजी केलीय. देशभरातील सध्याच्या घडामोडींचा लेखाजोखा घेत त्यांनी आपले मुद्दे मांडले. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या धोरणांना पाठिंबा जाहीर केला. कोळसा घोटाळा, एफडीआय आणि त्यातून निर्माण होणारी रोजगार निर्मिती, त्यात स्थानिकांना प्राधान्य अशा काही मुद्यांवर राज ठाकरेंनी भाष्य केलंय. ‘एफडीआय’ला मनसेचा पाठिंबा असेल मात्र, डिझेल दरवाढीला विरोध असे तर गणपती उत्सव असल्याने २० तारखेच्या भारत बंदला पाठिंबा देणार नाही, असं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय. तर ‘एफडीआय’ला पाठिंबा देत असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रातीयांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
‘भारत बंद’ला मनसेचा आक्षेप
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २० सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या ‘भारत बंद’मध्ये मनसे सहभागी होणार नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. यावेळी एफडीआयला आपला पाठिंबा असल्याचं सांगत महाराष्ट्रासह देशात गणेशोत्सव सुरु असताना कसला `भारत बंद` करता? यामुळे लोकांना त्रास होईल याची जाणीव या दिल्लीतील नेत्यांना नको का? असा सवाल राज ठाकरेंनी भारत बंद पुकारणाऱ्या विरोधी पक्षांना केलाय. मनसेचा एफडीआयला पाठिंबा असेल तरी दरवाढीला आणि महागाईला मनसेचा विरोध राहिल असं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय.
परकीय गुंतवणूकीला पाठिंबा
एफडीआय म्हणजेच भारतात केंद्रीय सरकारनं जाहीर केलेल्या परकीय गुंतवणूकीला राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. एफडीआय भारतात यायलाच हवं, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. यावेळी ‘एफडीआय’ला पाठिंबा देणारी राज्यं आणि ‘एफडीआय’ला नाकारणारी राज्यं यांची यादीच राज ठाकरेंनी वाचून दाखवली. ‘एफडीआय’मुळे भारताची लूट होईल, असं म्हणणाऱ्यांना राज ठाकरे म्हणाले, की भारताची आधीच लूट झालेली आहे. परकीय गुंतवणूकीमुळे उलट होणारी लूट थांबेल. मात्र, जेव्हा एफडीआय महाराष्ट्रात येईल, तेव्हा स्थानिक मराठी तरूण-तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे.
काँग्रेसला विरोध का?
विरोध करायाचा म्हणून विरोधक विरोध करतात, याला काहीच अर्थ नाही. जर का एखादी गोष्ट चांगली घडत असेल तर तिला पाठिंबा हा दिला गेलाच पाहिजे. कशासाठी विरोध करायचा? जर का काँग्रेसने एखादी गोष्ट चांगली केली असेल तर तिला आमचा पाठिंबा राहिल. जर एनडीएने काही चांगली गोष्ट केली असेल तर तिलाही आमचा पाठिंबा राहील.
एफडीआयचा फायदा शेतक-यांबरोबरच ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रिटेलमधील परदेशी कंपन्यां नी जरुर यावे. मात्र येथे येताना त्यांनी स्थानिक व मराठी माणसाला रोजगारात प्राधान्य द्यावे, नाहीतर मी दुकाने उघडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
घोटाळ्यांमध्ये चांगली प्रगती
देशात चालू असलेल्या घोटाळ्यांबद्दल बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं, की देश दररोज घोटाळ्यांमध्ये प्रगती करत आहे. आधी काही हजार कोटींचे घोटाळे व्हायचे. आता काही लाख कोटींचे घोटाळे होत आहेत. यावेळी कॉमनवेल्थ घोटाळ्याचा इल्लेख करून राज ठाकरे यांनी सुरेश कलमाडींवर ताशेरे ओढले. कॉमनवेल्थ घोटाळा करूनही सुरेश कलमाडी बोटांनी व्ही फॉर व्हिक्टरीचं चिन्हं दाखवता. ऑलिम्पिकसाठी जायला निघतचात.. असं म्हणत कलमाडींचा चांगलाच समाचार घेतला.
स्थानिकांना रोजगारात प्राधान्य
‘एफडीआय’ला मनसेचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रात परदेशी कंपन्यांनी माझ्या मराठी माणसाला रोजगार दिलाच पाहिजे’ असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केलं. महाराष्ट्रात येणा-या परदेशी कंपन्यांनी आमच्या भुमिपूत्रांना व मराठी माणसांनाच नोकरीत प्राधान्य दिले गेले पाहिजे, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपलं रोखठोक मत पुन्हा एकदा माडलं.
पुन्हा टार्गेट ‘परप्रांतीय’
जर स्थानिक तरुण – तरुणींना रोजगारात प्रधान्य मिळालं नाही तर मात्र या कंपन्या मी उभ्या राहून देणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. जी राज्ये एफडीआयला विरोध दर्शवतायेत अशा राज्यांनी मात्र मग त्यांची लोक महाराष्ट्रात कामधंद्यासाठी येणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर त्यांचे लोंढे आमच्यावर आदळतील, असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांना ‘टार्गेट’ केलं.
सुशीलकुमारांना टोला
सुशीलकुमार शिंदे असताना आपण कोणतेही घोटाळे विसरू शकत नाही, असा टोला यानिमित्तानं राजनं लगावलाय. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
‘लोक बोफोर्स विसरले, कोळसा घोटाळाही विसरतील... कोळशामुळे हात थोडे काळे होतात हे खरे, पण धुतले की पुन्हा स्वच्छ होतात, हेही खरे... रालोआ सरकारमधील पेट्रोल पंप वाटप प्रकरणही आता लोकांच्या विस्मरणात गेले आहे’असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यात केलं होतं. मात्र, विरोधकांनी उठवलेल्या टीकेच्या झोडीमुळे सुशीलकुमारांची ही गंमत काँग्रेसच्या चांगलीच अंगलट आली होती. सुशीलकुमार शिंदेच्या या बेजबाबदार वक्तव्यावर त्यांनीही टाळ्या आणि हशा मिळवला होता. सुशीलकुमारांच्या याच गमतीशीर वक्तव्याचा समाचार राज ठाकरेंनी आज त्यांच्याच पद्धतीनं घेतला. सुशीलकुमारांसारख्या व्यक्ती लोकांना काहीही विसरू देणार नाही, या राज यांच्या वक्तव्यावर उपस्थितांनामध्ये एकच हास्यकल्लोळ माजला.
/marathi/slideshow/एफडीआय-ला-मनसेचा-पाठिंबा_131.html