महत्त्वाचे ‘कॉफी प्लेअर्स’
थकलेल्या अवस्थेत कॉफीचा एक आपुलकीनं कुणी पुढे केला तर आपला सगळा मूडच बदलून जातो आणि काही बिझनेस जगतानंही त्याची चांगलीच दखल घेतलीय. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत ‘रेडी टू ड्रिंक’ पेय - चहा आणि कॉफीचं विश्व चांगलंच फोफावलंय.
रिपोर्टसनुसार, २०१७ पर्यंत हेच कॉफीचं विश्व २,२५० करोडोंपर्यंत झेप घेण्याची शक्यता आहे. आता सध्या १,१०० करोड रुपयांच्या घरात खेळणाऱ्या या स्थानिक मार्केटमध्ये कॅफे कॉफी डे, बरिस्ता, कॉस्ता कॉफी, कॉफी वर्ल्ड, लवासा, कॉफी बीन आणि टी लिफ यांसारख्या अनेक खेळाडूंची आपला जम बसवलाय. याच खेळडूंना धक्का द्यायला नुकताच ‘स्टारबक्स’नं या मार्केटमध्ये एन्ट्री घेतलीय. आणखी बरेच खेळाडूंची डोळेही इकडे लागलेले आहेत.
गेल्या दशकात १,२०० पेक्षा जास्त कॅफेजचं जाळं संपूर्ण भारतात पसरत चाललंय. दरवर्षी जवळजवळ ४० ट्क्क्यांनी वाढ या क्षेत्रात दिसून येतेय. यामध्ये सहा महत्त्वाच्या नावांचा उल्लेख करावा लागेल. चला तर नजर टाकुयात याच काही महत्त्वाच्या ‘कॉफी प्लेअर्स’वर…
कॅफे कॉफी डे
कॅफे कॉफी डे (सीसीडी) हा तर सध्या तरुणाईचा कट्टाच बनलाय. हाच सीसीडी भारतातील सर्वांत मोठी कॉफे चेनही आहे. ११ जुलै १९९६ मध्ये बंगलोरमधल्या ब्रिगेड रोडवर पहिला-वहिला कॅफे उभारून सीसीडीनं भारतात आपलं पाऊल रोवलं होतं आणि ऑगस्ट २०१२ पर्यंत याच सीसीडीनं १३१९ आऊटलेट्स भारतातील २८ राज्यांमध्ये उभारलेत.
सीसीडीच्या या यशाचं श्रेय जातं ते व्ही. जी. सिद्धार्थ यांना. सिद्धार्थ हे अमालगॅमेटेड बीन कॉफी ट्रेडिंग कंपनी लिमिटेड (ABCTCL) चे अध्यक्ष आहेत. अमालगॅमेटेडच्या स्वत:च्या मालकीच्या १०,००० एकर जमिनीवर कॉफीची लागवड केली जाते. सीसीडी हा ABCTCL चाच एक भाग आहे.
सीसीडी सध्या आपल्या ब्रान्ड पसरवण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत याच नावाच्या मिनरल वॉटर, कुकीज आणि चिप्स तुमच्या हातात पडल्या तर आश्चर्य वाटायला नको. २०१४ पर्यंत २००० आऊटलेटसचा टप्पा गाठणं सध्या सीसीडीचं ध्येय आहे.
बरिस्ता लवाझा...
‘बरिस्ता कॉफी कंपनी लिमिटेड’ ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं रिटेल क्षेत्रातील कॅफे चेनचं जाळं... २०१० पर्यंत बरिस्ताचे २२५ आऊटलेट भारताभर पाहायला मिळाले. फेब्रुवारी २००० मध्ये बरिस्तानं आपलं बस्तान मांडलं होतं.
२००१ साली ‘टाटा कॉफी’नं बरिस्ताचे ३४.३ टक्के इक्विटी स्टेक विकत घेतले तर उरलेले ६५ टक्के शेअर्स ‘स्टर्लिंग ग्रुप’नं (सी. शिवाशंकरन) २००४ साली विकत घेतले. त्यानंतर स्टर्लिंगनं टाटाकडून सर्व शेअर्स आपल्या ताब्यात घेतले.
२००७ साली स्टर्लिंगनं ‘बरिस्ता’ लवाझाच्या हवाली केलं. ‘लवाझा’ ही मूळची इटालियन कॉफी प्रोडक्ट बनविणारी कंपनी. सध्याचा ‘बरिस्ता लवाझा’ची वार्षिक मिळकत २०० करोडोंच्या घरात आहे.
कोस्ता कॉफी
तिसऱ्या नंबरवर आहे कोस्ता कॉफी. यूकेमधला सर्वांत मोठा कॉफी ब्रँड. सप्टेंबर २००५ मध्ये कोस्ता कॉफीनं ‘देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड’ या फ्रँचायझीच्या मदतीनं भारतात प्रवेश केला.
कोस्ता ही ब्रिटिश मल्टिनॅशनल कंपनी आहे. जगात ‘स्टारबक्स’नंतर कॉफीहाऊस चेनमध्ये कोस्ताचा दुसरा क्रमांक लागतो. ‘कोस्ता’लाही भारतात ३०० आऊटलेटसपर्यंत मजल मारायचीय. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, गुरगाव, नोएडा, पुणे, आग्रा आणि जयपूर यांसारख्या भारतातील महत्त्वाच्या शहरांत कोस्तानं आपला जम बसवलाय. गेल्या वर्षी कोस्तानं मुंबईमध्ये आपलं शंभरावं केफे सुरू केलं होतं.
स्टारबक्स
भारतीय मार्केटमध्ये ‘स्टारबक्स’नं नुकतीच जोरदार एन्ट्री घेतलीय. ‘टाटा ग्लोबल बिव्हेरेजेस’बरोबर पार्टनरशीपमध्ये २०१२ साली ‘स्टारबक्स’नं भारतात प्रवेश मिळवला.
स्टारबक्स या ‘सिएटल’ स्थित कंपनीचा कारभार विविध ६१ देशांपर्यंत पोहचलेला आहे. गेल्या पाच वर्षांपासून भारतात पाय रोवण्यासाठी या कंपनीचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू होते. अखेर, ऑक्टोबर २०१२ मध्ये मुंबईमध्ये स्टारबक्सचं पहिलं वहिलं आऊटलेट सुरू झालंच. दिल्ली आणि मुंबईनंतर कंपनीला भारतातील इतर शहरांवरही लक्ष केंद्रीत करायचंय. त्यासाठी पुरेपूर तयारीही सुरू आहे.
इतर कॉफी चेन्स...
भारतातील कॉफीच्या मार्केटमध्ये आणखीही काही छोटे छोटे पण दखल घेण्यासारखे कॅफे चेन्स आहेत. त्यांनी काही महत्त्वाच्या शहरातं आपले आऊटलेट प्रस्थापित करून आपल्या बिझनेसची सुरूवात केली. पण हळूहळू आपले पाळंमुळं घट्ट रोवण्यासही त्यांनी प्रारंभ केलाय.
२००८ साली भारतात आलेली ऑस्ट्रेलियन कॅफे चेन ग्लोरिया जिन्स कॉफी – सिटीमॅक्सनं मार्केटमध्ये चांगलं बस्तान बसवलंय. येत्या काही वर्षांत ३६-४० आऊटलेट सुरू करण्याच्या प्रयत्नात सध्या सिटीमॅक्स आहे.
२००८ साली भारतात दाखल झालेल्या ‘कॉफी बीन अँड टी लिफ’नंही नवी दिल्लीत आपले आऊटलेटस् सुरू करून आपली सुरूवात केली. सीबीटीएलचे जगभरात ८१२ आऊटलेट असले तरी भारतात मात्र त्यापैकी १७ आऊटलेटस् आहेत.
/marathi/slideshow/कॉफीच्या-विश्वात_223.html