एक गट मोदींचा... दुसरा अडवाणींचा
अडवाणींच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये सरळ सरळ उभे दोन गट पडलेत. एक आहे अडवाणींच्या बाजूने तर दुसरा आहे मोदींच्या... अडवाणींचा राजीनामा पक्षाकडून नामंजूर करण्यात आला असला तरी त्यांना समजावण्यात किंवा त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला काही यश मिळालेलं नाही. एक नजर टाकुयात मोदींच्या गटातील आणि अडवाणींच्या गटातील चेहऱ्यांवर...
अरुण जेटली
अडवाणी यांच्या नाराजीला अतिमहत्त्व देण्यास अरुण जेटलींनी नकार दिलाय. आपल्याला काहीच माहित नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मीडिया उगाचच या गोष्टीला महत्त्व देतंय, असं जेटली यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मोदींच्या नावाला नेत्यांचीच नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांची मान्यता आहे. प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला तुमचा सर्वश्रेष्ठ डाव टाकायचा असतो आणि भाजपाध्यक्षांनी हेच केलंय.
राजनाथ सिंह
मोदींची निवड हा आपल्या आजवरच्या राजकीय जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे, असं भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ‘निवडणुकीत यश मिळवायचं असेल, तर हाच मार्ग योग्य आहे. या निर्णयानंतर मला आनंत आणि शांती लाभलीय. देशासाठी आज काहीतरी केलंय, असं वाटतंय. आपण भाजप कार्यकर्त्यांना एक असा नेता दिलाय ज्याची वाहवा संपूर्ण जगभरात होईल’
मनोहर पर्रीकर
मोदींच्या पक्षात जाहीरपणे, बेधडकपणे बोलणाऱ्यांपैकी एक आहेत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर... पर्रीकर यांनी जवळजवळ दोन वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना खराब झालेल्या लोणच्याची उपमा दिली होती. ‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मी हे सांगतोय की मोदी हाच भाजपचा खरा चेहरा आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदावर विराजमान होण्याविषयी आत्ताच काही सांगू शकत नाही. पण ते आगामी निवडणूकीत नक्कीच भाजपच्या चेहऱ्याचं काम करतील’ असं पर्रिकर म्हणतात.
अमित शाह
अमित शाह यांना भाजपचा नवा यूपी प्रभारी बनवण्यास राजनाथ सिंह यांनी नकार दिला होता. परंतू सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातील आरोपींपैकी एक असलेले शाह हे मोदींच्या खास व्यक्तींपैकी एक आहेत. १२ जून रोजी शाह पहिल्यांदा लखनौ जाणार आहेत. यावेळी मोदींच्या सांगण्यावरून ते कल्याण सिंह यांची भेट घेणार आहेत.
सुषमा स्वराज
गेल्या आठवड्यापर्यंत सुषमा स्वराज लालकृष्ण आडवाणी यांना भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून संबोधत होत्या. पक्षाचे वरिष्ठ नेते अडवाणी यांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मागे पडल्याच्या विधानांनाही त्यांनी नकार दिला होता. ‘मोदींना सगळ्यात लोकप्रिय नेता असं संबोधनं राजनाथ सिंह यांचं वैयक्तिक मत असू शकतं. त्याचा अर्थ हा नाही की पक्षात आणखी लोकप्रिय नेते नाहीत’ असा टोला त्यांनी राजनाथ सिंहांना लगावला होता.
यशवंत सिन्हा
‘माझ्यात रुजलेली भारतीय संस्कृतीची मूल्यं मला अडवाणींना समर्थन देण्यास भाग पाडतात. आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण भारतीय संस्कृतीत दिली जाते. याच भावनेतून मी म्हटलं होतं की जर अडवाणींनी स्वत: पुढे आले तर पक्षात दुसऱ्या नेतृत्वाचा प्रश्नच उद्भवत नाही’ असं यशवंत सिन्हा यांचं म्हणणं आहे.
अनंत कुमार
अडवाणी कॅम्पमधील प्रमुख लोकांमध्ये एक नाव अनंत कुमार यांचंही आहे. अडवाणींनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं मन वळवण्यासाठी सर्वात अगोदर त्यांच्या घरी धडकलेल्या नेत्यांमध्ये अनंत कुमारही होते.
जसवंत सिंह
जीवनाच्या ज्या टप्प्यातून सध्या अडवाणी प्रवास करत आहेत त्याच पायरीवर जसवंत सिंहही उभे आहेत. गोव्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत जसवंत सिंह अनुपस्थित राहिले होते. अडवाणींच्या अगदी जवळचे मानले जाणारे जसवंत सिंह सध्या खूप शांत भूमिकेत आहेत. मीडियापासून चार हात लांब राहणंच त्यांनी सध्या पसंत केलंय.
स्मृति इरानी
भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिनेत्री स्मृती इरानी यांनी गोव्यात मोदींच्या नावाच्या औपचारिक घोषणेपूर्वी मीडियाशी बोलाताना म्हटलं होतं की, आम्हाला माहित आहे की भारताच्या जनतेला काय हवं? आम्हाला हेही माहित आहे भाजप कार्यकर्त्यांना काय हवंय? देशातील युवकांना पुढे सरण्याची संधी देणारे नरेंद्र मोदी नव्या विचारांनाही प्रोत्साहन देतात. आणि तेच पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती आहेत.
उमा भारती
हा वाद विनाकारण आहे. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची स्तृती करताना अडवाणींनी दुसऱ्या कोणत्याही भाजप मुख्यमंत्र्याची निंदा केलेली नाही. मोदी हे त्यांना मुलाप्रमाणे आहेत. त्यांनीच मोदींना गुजरातचा मुख्यमंत्री बनवलंय. संपूर्ण पक्षच अडवाणींचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आहे. मीदेखील त्यांच्या मुलीप्रमाणे आहे. दिल्लीला पोहचल्यानंतर मीदेखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीन आणि मला संपूर्ण विश्वास आहे की ते आम्हाला समजून घेतील आणि आपला हट्ट सोडतील.
/marathi/slideshow/मोदींचा-करिष्मा-अडवाणींचा-वरचष्मा_229.html