काय म्हणाले राज ठाकरे?
अटक करण्यात आलेल्या व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठराखण केलीय. त्यांनी देशद्रोहाचा असा काय गुन्हा केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. खरे देशद्रोही मोकाटच, मात्र त्रिवेंदीना अटक, हा उलटा न्याय असल्याचं त्यांनी म्हटलय. त्रिवेदींना तातडीनं सोडून द्या, अशी मागणीही राज यांनी केलीय. त्यांच्या व्यंगचित्राचा उद्देश समजून घ्या, असंही त्यांनी म्हटलंय. आणखी कुठकुठल्या विषयावर बोलले राज ठाकरे... पाहूया
आर आर पाटील यांना व्यंगचित्रांतलं काय कळणार?
आर आर पाटील यांची गोष्ट मी समजू शकतो, आर आर पाटील यांना गृहखातंच धड समजत नाही, त्यांना व्यंगचित्रं समजणं अशक्य आहे. व्यंगचित्रांतून सामान्य माणसांचा राग व्यक्त होत असतो. जर तो गुन्हा असेल, तर राग कसा व्यक्त करायचा? की राग व्यक्तच करायचा नाही. आर आर पाटील यांना व्यंगचित्रातलं कळत नाही, तुम्हाला इतरही काही कळत नाही.
व्यंगचित्रांमागचा उद्देश समजून घ्या. वाटेल त्या गोष्टीवरून गुन्हा दाखल केला जातोय. विजय तेंडुलकरांना तर यांनी रोज जेलमध्ये टाकलं असतं. हायकोर्टानेही त्रिवेदींना सोडायला सांगितलं, तरीही आर आर पाटील म्हणतात, की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू मग कलमं काढू.. हे अतिशय घाणेरडी गोष्ट आहे.
मिफ्तासाठी गेलेलो, हिरानंदानींसाठी नाही!
मी हिरानंदानींसाठी गेलेलो नव्हतो, मी मिफ्तासाठी गेलेलो. मला महेश मांजरेकरने सांगितलं, म्हणून मी गेलो होतो. तिथे समोर हिरानंदानी उभा. व्यासपीठावर गेल्यावर कळलं की व्यासपीठावर हे ही बसलंय.. मिफ्तासाठी मदत करणाऱ्यांचा सत्कार होता. तेवढ्यात एक गुच्छ आल्यावर हिरानंदानींना देण्यास सांगितलं. त्यावेळी मी पुष्पगुच्छ काय परत करायला हवा का?
मला या गोष्टीबद्दल पूर्वकल्पना नव्हती. मला आयोजकांनी आधी कळवलं नव्हतं. मी बाहेरगावाहून आलो होतो. मिफ्ताच्या उद्घाटनाला उद्धवला बोलावलं होतं. समारोपासाठी मला बोलावलं होतं. मला नव्हतं माहीत की बाकीचीपण झेंगाटं असतील तिथे. याबद्दल तुम्ही आयोजकांना विचारायला हवं.
बाळासाहेबांनी मला शिकवलं होतं...
असीम त्रिवेदींपूर्वीही अशी अनेक चित्रं काढली गेलीत. ही चित्रं तर काहीच नाहीत, बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांतून तर याहूनही अधिक फटकारे मारले गेले होतो सिस्टमवर... व्यंगचित्रकाराचा हेतू समजून घ्या. वाढत्या भ्रष्टाचारावर काय केलं सरकारने? भ्रष्टाचार करणाऱ्यांवर काही कारवाई केली आहे का सरकारने, मग व्यंगचित्रं काढल्याबद्दल का देशद्रोहाचा गुन्हा?
व्यंगचित्रं समजायला कठीण असतात, पण समजून घ्या. यात संविधानाचा अपमान नव्हता. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण हे त्याने व्यंगचित्रांतून विचारलं होतं. जगभरातली व्यंगचित्रं पाहा, समजून घ्या. लहानपणी मी व्यंगचित्रं शिकत असताना मला बाळासाहेबांनी समजावलेलं की माणसाच्या व्यंगावर व्यंगचित्रं काढू नयेत. काही गोष्टी असतात, ज्या तुम्हाला पाळाव्या लागतात. पण असीमच्या व्यंगचित्रांमध्ये तसं काही नव्हतं. ती प्रतिकात्मकच असतात.
असीम त्रिवेदींना अटक कशासाठी?
असीम त्रिवेदींवर १२४ अ हे देशद्रोहाचं कलम का लावण्यात आलंय? ज्या व्यंगचित्रांवर देशद्रोहाचं कलम लावणं चुकीचं आहे. जे खरे देशद्रोही आहेत, त्यांना शिक्षा होत नाही, हा देशद्रोह नाही?
अफझल गुरूने संसदेत धुमाकूळ घातला, त्याला शिक्षा होऊनही अंमलबजावणी होत नाही, ते देशद्रोही अजून जीवंत आहेत आणि ज्यांनी फक्त व्यंगचित्रं काढलं त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतात?
बाहेरच्या देशातले लोक येतात, गुन्हे करतात, पण त्यांना अजूनही शिक्षा होत नाही. मात्र त्यावर भाष्य केलं तर मात्र देशद्रोह ठरतो... हे चुकीचं आहे. चित्रांतून भावना व्यक्त करणं चुकीचं नाही.
/marathi/slideshow/राज-ठाकरे-असीमच्या-पाठिशी_125.html