पक्षाचा चेहरा
प्रत्येक पक्षाला एखादा चेहरा असणं, आजच्या राजकारणातला अविभाज्य भाग बनलाय. मग तो काँग्रेस असो भाजप किंवा अन्य कोणताही... राजकारणातले हे ब्रॅन्डस् केवळ आपल्या जनसंपर्काच्या साहाय्यानं आणि व्यक्तिमत्त्वातून लोकांना आपल्याकडे आकर्षित करताना दिसतात.
एक नजर टाकुयात... अशाच काही आत्तापर्यंतच्या भारतीय राजकारणातील ब्रॅन्डसवर...
पंडीत जवाहरलाल नेहरू
शांतीदूत म्हणून गौरविण्यात येणारे भारताचे पहिले पंतप्रधान आपल्या भाषा प्रभुत्वामुळे सामान्य व्यक्तींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत असत. पंचशील, आणि अलिप्ततावादी धोरणामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण केली. `डिस्कव्हरी ऑफ इंडिया` या पुस्तकातून त्यांच्या इंग्रजी भाषा प्रभुत्वाची साक्ष पटते. नेहरु उर्दूचे उत्तम जाणकार होते. हिंदी भाषेतून किस्से सांगून श्रोत्यांना आपलेसे करून घेत असत. प्रसंगी प्रक्षोभक जमावाला शांत करण्यासाठी स्वतः गर्दीत शिरून जमावाला शांत करण्याचे कसब नेहरूंमध्ये होते
महात्मा गांधी
महात्मा गांधी आपल्या प्रत्येक कृतीतून संदेश देत असत. एक प्रकारचा करिश्मा त्यांच्या वागण्या-बोलण्यात होता. आपल्या मृदू आणि शांत आवाजात ते जन-समुहावर हुकूमत गाजवत. महात्मा गांधीनी जाणिवपूर्वक सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि त्यांची चांगली तत्त्वे आचरणात आणली. त्यामुळे सर्वांना ते जवळचे वाटायचे. त्यावेळच्या भारतीय राजकारणात बापूंचा शब्द अंतिम मानला जायचा.
इंदिरा गांधी
भारताच्या `आयर्न लेडी` ज्या राज्यात जात त्या राज्यातील पारंपारिक वेश परिधान करत. साधेपणा आणि कणखरपणा यांचे चमत्कारिक मिश्रण त्यांच्या वागण्यात असायचं. इंदिरा गांधींनी बांग्लादेशची निर्मिती करून जगाला आपली दखल घ्यायला लावली. देशात आणीबाणी लावून विरोधकांना नामोहरम करणाऱ्या इंदिरा गांधीच्या राजवटीतील घटना आजही चर्चेचा विषय होतात. चेहऱ्यावरील करारीपणाचा हा राजकिय ब्रँड `फायर ब्रँड` म्हणून ओळखला जायचा, हेच पोखरणच्या अणू चाचणीने स्पष्ट केलं.
राजीव गांधी
इंदिरा गांधीच्या निधनानंतर अचानकपणे राजीव गांधींच्या नेमस्त राजकारणाला सुरूवात झाली. चेहऱ्यावरची निरागसता, वागण्यातील साधेपणा, संवादातील सहजता या गुणांमुळे लोक राजीव गांधींकडे आकर्षित होत गेले. संगणक क्रांतीचे स्वप्न पाहणारा हा नेता तरूणांमध्ये लोकप्रिय होता .
अटल बिहारी वाजपेयी
कवी, पत्रकार, राजकारणी असा आपला जीवन प्रवास करणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींचा स्वतःचा असा एक करिश्मा होता. अटलजींची स्तुती त्यांचे विरोधकही करत. उत्तम कवी असणारे अटलजी जेव्हा स्वतःच्या कविता वाचत तेव्हा त्याच्या कवितेने उपस्थीत मंत्रमुग्ध होऊन जात. त्यांच्याच काळात मिळवलेला कारगिलमधील विजय हा भारतीय अस्मितेच प्रतिक आहे.
/marathi/slideshow/राजकारणातले-ब्रॅन्डस्_305.html