लगान इन 'टाईम' - Marathi News 24taas.com

लगान इन 'टाईम'


 झी २४ तास वेब टीम, न्यूयॉर्क
 
ऑस्करपर्यंत धडक मारलेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि आमीर खान अभिनीत चित्रपटाच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 'टाइम मासिका'ने खेळावर आधारित आजवरच्या सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत 'लगान- वन्स अपॉन अ टाईम इन इंडिया'चा समावेश केला आहे. २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाला या यादीत चौदावे स्थान मिळाले आहे.
 
ब्रिटिशांनी लादलेला जाचक शेतसारा माफ व्हावा, खेडूतांनी किक्रेटचा सामना खेळण्याचे स्वीकारलेले आव्हान आणि नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांचा केलेला पराभव, या कथानकाला आशुतोषने ' 'लगान- वन्स अपॉन अ टाईम इन इंडिया'' मधून मांडले होते. ए. आर. रहमानचं सुमधूर संगीत, क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेत गुंगवून टाकण्याचे कसब, आमीर खानसह सर्व कलाकारांची अदाकारी यामुळे लगान बॉलिवुडमध्ये सुपरहिट ठरलाच. आता तर टाइम मासिकाने ऑल टाइम बेस्ट स्पोर्ट्स मूव्हीमध्ये या सिनेमाची निवड केली आहे. विशेष म्हणजे हा फक्त खेळावरचा सिनेमा नाही तर त्याला सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीही आहे. शिवाय रहमानची ताल धरायला लावणारी गाणी आहे, त्यामुळेच लगान हा नुसता खेळावरचा सिनेमा नाही तर ऑल टाइम ऑल राऊंडर सिनेमा अशा शब्दांत या सिनेमाचा गौरव करण्यात आला आहे. या यादीत 'द बिग लेबोव्हस्की' पहिल्या स्थानावर आहे. 'बॉडी अँड सोल', 'ब्रेकिंग अवे', 'बुल डरहॅम', 'कॅडशॅक' यांना पहिल्या पाचांत स्थान मिळाले आहे.

First Published: Sunday, October 9, 2011, 13:27


comments powered by Disqus