चंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष - Marathi News 24taas.com

चंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष


www.24taas.com , डॉ. बाबासाहेब साहित्यनगरी (चंद्रपूर)
 
 
डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्‍वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली.
 
 
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव सादर करणाऱ्या ग्रंथदिंडीने शुक्रवारी सकाळी   ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरूवात झाली. स्थानिक आझाद बाग चौकातून संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते  या दिंडीला सुरुवात झाली. दींडीच्या अग्रस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत डहाके, त्यांच्या अर्धांगिनी डॉ. प्रभा गणोरकर,महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष उत्तम कांबळे, दिल्लीचे डॉ. महिपसिंग हे मान्यवर चालत होते. सिने लावंत पंढरीनाथ कांबळे, सुबोध भावे आणि रमेश भाटकर यांनीही आपल्या उपस्थितीने दींडीत उत्साह निर्माण केला. तब्बल ३३ वर्षांनंतर चंद्रपुरात संमेलन होत आहे.
 
 

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रभा गणोरकर, संमेलनाचे मावळते अध्यक्ष उत्तम कांबळे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे, दिल्लीचे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. महिपसिंह, स्वागताध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, गोंडवन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, कार्याध्यक्ष प्राचार्य मदन धनकर, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, मुख्य कार्यवाह प्राचार्य डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, कार्यवाह उज्ज्वला मेहंदळे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, न्या. नरेंद्र चपळगावकर, न्या. विकास सिरपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार,  कवी डॉ. विठ्ठल वाघ यांची प्रेक्षकांमध्ये उपस्थिती होती.
 

 
 
दगड अंगावर झेलण्याची तयारी ठेवा प्रा. डहाके
 
कुठलीही घटना घडली तरी असहिष्णुतेने दगड घेऊन बाहेर पडणारे आपण लोक सत्य मांडताना का घाबरतो? जे सत्य आहे ते उघड करताना साहित्यिकांनी, विशेषतः नव्या साहित्यिकांनी निर्भय होऊन लिखाण केले पाहिजे. दगड अंगावर झेलण्याची तयारी ठेवल्याशिवाय लिखाणाची ऊर्मी मिळणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी शुक्रवारी केले.
 
 
समाजाच्या कल्याणासाठी लिहिताना लेखणी आक्रमक करायची असेल तर प्रतिसादाची काळजी न करता लिहा. त्यातून नवे काहीतरी चांगले निर्माण झाले पाहिजे. शांती प्रस्थापित झाली पाहिजे. जागतिकीकरणाच्या झपाट्यापासून, चंगळवादाच्या धबडग्यापासून मुक्ती मिळेल, असे लिखाण झाले पाहिजे. सध्याचा काळ अशाप्रकारचे लिखाण करण्यासाठी सर्वोत्तम आहे, असे मला वाटते. मराठी भाषेला कुठल्याही प्रकारचा आजार झालेला नाही की ती शेवटची घटका मोजत असेल. माझ्या दृष्टीने जी भाषा दोन हजार वर्षे जगली तिला मरण येण्याची कल्पनाही आपण कशी करू शकतो? फक्त मराठीतील बोलींचे शासनाने, समाजाने संवर्धन करावे, एवढीच अपेक्षा आहे', असेही ते म्हणाले. महात्मा गांधींनी दाखविलेली अहिंसेची आणि मार्क्‍सने दाखविलेली परिवर्तनाची वाट आपण विसरलोय, अशी खंतही असे प्रा. वसंत डहाके यांनी व्यक्त केली.
 
 
न्या. धर्माधिकारी -
साने गुरुजींनी सांगितलेली आंतर भारतीची संकल्पना आपण राबवायला पाहिजे. केवळ एक दोन पाहुणे बाहेरचे बोलावले म्हणजे अखिल भारतीय होत नाही तर त्याचे संमेलनात दर्शन झाले पाहिजे. वाचक हा साहित्याचा विधाता आहे की विषय आहे, याची एकदा शहानिशा झाली पाहिजे. साहित्य आमच्यासाठी आहे काय, आदिवासींचे दुःख मांडणारे आहे काय, याची उत्तरे देता येतील का?  ज्यांच्या पंखात शक्ती नाही, त्यांना शक्ती देण्यासाठी लिहा. गोठलेल्या समाजातून साहित्य निर्माण होत नाही. त्यामुळे समाजाच्या व्यथा डोळ्यापुढे ठेवून नव्या पिढीसाठी लिहा.
 
 
संमेलनाचे मावळते अध्यक्ष उत्तम कांबळे  
आपल्या शेजारची राज्ये भाषेसाठी काय करीत आहेत याचा शासनाने पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. राज्य शासनाने भाषेच्या विकासासाठी अधिकाधिक निधी खर्च करावा.

First Published: Saturday, February 4, 2012, 09:04


comments powered by Disqus