Last Updated: Thursday, August 16, 2012, 14:10
विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबादऔरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांनी सध्या हैदौस घातला आहे, बाईकवर जाताना कुत्रा हमखास मागे लागतो असे काहीसे चित्र आहे. य़ा मोकाट कुत्र्यांनी गेल्या सात महिन्य़ात दोन हजार लोकांचे लचके तोडले आहेत.
औरंगाबादेत सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. शहरात अनेक कचार कुंड्या ओसंडून वाहत आहेत. या कच-यावर कुत्र्यांनी संसार मांडलाय.. महापालिकेकडे कुत्रे पकडण्यासाठी यंत्रणा अपुरी आहे मात्र याचा फटका बसतोय सामान्य औरंगाबादकरांना.. शहरात रात्रीच्या वेळेस दुचाकी चालवणेही कठीण झाले आहे.. चौकाचौकांत गुंडांसारखे या कुत्र्यांनी आपले ठाण मांडले आहे. कुत्रे मागे लागत असल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सात महिन्यात तब्बल 2 हजार औरंगाबादकरांना या भटक्या कुत्र्यांची चावा घेतलाय.
महिनानिहाय डॉग बाईटच्या केसेसची आकडेवारी
जानेवारी -321 रुग्ण
फेब्रुवारी -254 रुग्ण
मार्च -255 रुग्ण
एप्रिल -339 रुग्ण
मे -285 रुग्ण
जून -294 रुग्ण
जुलै -203 रुग्ण
महापालिकेकडे भटके कुत्रे पकडण्यासाठी अपुरी यंत्रणा आहे, दोन गाड्या आणि नऊ कर्मचाऱ्यांवर शहराची जबाबदारी आहे.. ही यंत्रणा अपुरी असल्याचं प्रशासन मान्यही करतेय, मात्र नाईलाज असल्याचं उत्तर देत आपली सुटका करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरु आहे,
दुसरीकडे शहरात रस्त्यांची चाळण झाली आहे अशा परिस्थितीत कुत्रा मागे लागला तर गाडीही पळवता येत नाही, म्हणजे कुत्रा चावला तरी संकट आणि खड्ड्यातून जातांना गाडी पळवली तरी संकट अशा परिस्थीतीत कुत्र्यांपासून सूटका करावी तरी कशी असा प्रश्न नागरिकांना पडलाय...
शहरात कच-याचे ढीग साचले असल्याने या ठिकाणी अन्न खाण्यासाठी कुत्र्यांची झुंबड उडते आणि त्यातून कुत्र्यांची संख्याही वाढत चालली आहे.. महापालिकेनं कुत्र्यांची तक्रार करण्यासाठी कॉल सेटंरही स्थापन केले खरे मात्र ब-याचदा हा फोनच कुणी उचलत नाही, त्यामुळे आता कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तरी कुणी असा प्रश्न नागरिकांना सतावतोय...
First Published: Thursday, August 16, 2012, 14:10