Last Updated: Monday, October 15, 2012, 11:29
www.24taas.com, नांदेडमहापालिका निवडणुकीत झालेल्या ८० जागांसाठीच्या मतमोजणीला आज सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ८६ टेबलांवर मतमोजणी सुरु असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ८० पैकी ६५ जागांचे कल स्पष्ट झाले आहेत. यापैकी काँग्रेसने ३० जागांवर आघाडी घेत बहुमताकडे वाटचाल सरु केली आहे.
राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असून, त्यांचे केवळ १० उमेदवार आघाडीवर आहेत. महायुतीचे उमेदवार १४ जागांवर आघाडी आहेत. अपक्ष ११ जागेवर आघाडीवर आहेत. मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही.
दुपारी एकपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे मतमोजणी अधिका-यांनी सांगितले आहे. महापालिका निवडणुकीसाठी रविवारी सुमारे ६२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ४० प्रभागांतून ८० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ५१० उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांतच प्रमुख लढत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रभाग क्रमांक २५ मधून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल फसिया फिरदोस बिनविरोध निवडून आले आहेत.
First Published: Monday, October 15, 2012, 11:25