विलासरावांच्या लातुरात दुष्काळ - Marathi News 24taas.com

विलासरावांच्या लातुरात दुष्काळ

www.24taas.com,  लातूर
 
राज्याच्या इतर भागाप्रमाणे मराठवाड्याला दुष्काळाचा झळा बसतायेत. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात तर दुष्काळाची  तीव्रता जरा जास्तच आहे. मात्र तिथल्या नेत्यांना दुष्काळाची फारशी चिंता असल्याचं दिसत नाही. विलासरावांच्या लातुरात दुष्काळ, काय आहे रिपोर्ट.
 
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या शिवली गावात पाण्यासाठी अशी लांबच लांग रांग लागलीय. पाणी भरण्याचं हे ठिकाणी शिवली गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. शिवली गावाप्रमाणेच औसा तालुक्यातल्या 34 गावांची स्थिती आहे. तळी, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळं नागरिकांना मुलाबाळांसह पाण्यासाठी वणवण करावी लागतीय.
 
औसा तालुक्यातली 34 गावं टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलीत. मात्र एकाही गावात अजून टँकर सुरू झालेला नाही. गावातल्या काही तरुणांनी एकत्र येऊन विंधन विहीर खोदलीय. सध्या त्यावरच गावाची पाण्याच तहान भागवली जातेय.
 
दिल्लीत आणि मुंबईत वजन असलेल्या नेत्यांचा हा जिल्हा आहे. नेत्यांचा आणि मंत्र्यांचा सुकाळ असलेल्या या जिल्ह्यातल्या जनतेला दुष्काळ मात्र पाचवीलाच पुजलेला आहे. हे वजनदार नेते जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्तांसाठी पाणी मिळावं यासाठी आपलं वजन कधी खर्ची करणार असा प्रश्न इथल्या जनतेला पडलाय.
 

First Published: Thursday, May 17, 2012, 15:56


comments powered by Disqus