पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीची 'बंद'ची हाक - Marathi News 24taas.com

पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीची 'बंद'ची हाक

www.24taas.com, सोलापूर
 
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी सोलापूरला देण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. सोलापूरला एक टीमसी पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं परांडा तालुका बंदी हाक दिली आहे.
 
राष्ट्रवादीनं पुकारलेल्या या बंदला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळं उस्मानाबाद विरुद्ध सोलापूर असा संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय. यापूर्वी उस्मानाबादकरांनी पाणी देण्याच्या निर्णयाला विरोध करत थेट सीना कोळेगाव धरणाच्या प्रवेशद्वारालाच टाळं ठोकून आंदोलन केलं होतं. तसंच सोलापूरमधल्या पाटबंधारे खात्यातल्या अधिकाऱ्यांनाही पिटाळून लावलं होतं.
 
सीना–कोळेगावचं पाणी सोलापूरला देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिला आहे, त्यामध्ये विचित्र आणि अव्यवहार्य अटी  आहेत. सोलापूर जिल्ह्यात सीना नदीवर असणा-या २१ बंधा-यात साठलेलं पाणी अगोदर खाली सोडावं लागणार आहे. नदीकाठी असणा-या,१५० किलोमीटर अंतरावरील शेतक-याचं वीज कनेक्शन तोडून टाकावं लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच सीना–कोळेगावचं पाणी सोडण्यात यावं असं आदेशात म्हटलंय. मात्र वीज कनेक्शन तोडायला सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा , माढा, मोहोळ तालुक्यातल्या शेतक-यांचा मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

First Published: Tuesday, May 22, 2012, 13:29


comments powered by Disqus