Last Updated: Sunday, December 18, 2011, 16:55
झी 24 ताससाठी महेश पोतदार उस्मानाबाद करोडपती ठकसेन बाळासाहेब ऊर्फ दिगंबर खैरे पाटीलला उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा हिंगोलीचा असलेला हा ठकसेन अक्कलकोटमध्ये स्थायिक झाला आहे. तमाशा कलावंत असणा-या या ठकसेनाकडं विविध नेत्यांच्या आवाजात बोलण्याची लकब आहे. आणि त्याच जोरावर त्यानं आतापर्यंत अनेकांना गंडवलं.
माजी मंत्री राणा जगजितसिंह यांना त्यानं फोन करून, 'मी ओरिसाचा मुख्यमंत्री बोलतोय असं सांगितलं. आमच्या नातेवाईकांचा अपघात झाला असून तडजोडीसाठी 18 लाख रूपये द्या' अशी मागणी करण्यात आली. मात्र हा ठकसेन वारंवार फोन करत असल्यानं संशयावरून पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली.
पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठकसेनाला जेरबंद केलं. अपघाताचं कारण देऊन, अडचण सांगून त्यानं आतापर्यंत अनेकांना फसवलं आहे. यासाठी तो वेगवेगळे सिम कार्ड वापरायचा. बोलताना मंत्र्यांच्या आवाजात बोलायचा. त्यामुळं त्याचा संशय यायचा नाही. या माध्यमातून त्यानं अनेकांना फसवून
मोठी माया जमा केली.
या ठकसेनानं मोठ्या नेत्यांनाही फसवल्याची चर्चा आहे. मात्र बदनामीच्या भीतीनं तक्रार नोंदवली जात नसल्यानं त्याचं फावत होतं. अखेर त्याच्या पापांचा घडा भरल्यानं आता हा ठकसेन योग्य ठिकाणी म्हणजे तुरूंगात पोचला.
First Published: Sunday, December 18, 2011, 16:55