दुष्काळामुळे लांबली गावांमधली लग्नं Weddings postpone due to drought

दुष्काळामुळे लांबली गावांमधली लग्नं

दुष्काळामुळे लांबली गावांमधली लग्नं
www.24taas.com, जालना

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयाण आहे. मुलींच्या लग्नासाठीही लोकांकडे पैसे नाहीत. त्यामुळं यावर्षी होणारं लग्न आता पुढं ढकलण्याची वेळ जालना जिल्ह्यातील शेतक-यांवर आली आहे.

जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील वडगावच्या परमेश्वर वैद्य यांना सध्या एकच चिंता सतावत आहे... ती त्यांच्या मुलीच्या लग्नाची...गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी प्रियंकाच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. पण यंदाच्या दुष्काळानं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालंय. पावसानं दगा दिल्यानं शेतात दोनदा केलेली पेरणी फुकट गेली आणि केलेला खर्चही वाया गेला. आर्थिक अडचणीमुळे मुलीच्या लग्नासाठी खर्च करायला पैसे नसल्यानं ते हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणं आधीच घेतलेले कर्ज परत न करता पुन्हा सावकाराकडं कर्ज कसं मागायचं, मुलीचं लग्न लांबलं तर लोकांच्या नाना प्रश्नांना काय उत्तरं द्यायची असे प्रश्न वैद्य कुटुंबीयांना पडलाय.

या गावात अनेक घरांमध्ये हीच परिस्थिती आहे. सरकारही तात्काळ मदत करणार नसेल तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहून जगायचं असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय.

First Published: Thursday, January 3, 2013, 18:56


comments powered by Disqus