Last Updated: Monday, November 19, 2012, 17:15
www.24taas.com,मुंबईशिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी शिवसैनिकांकडून इच्छा आहे.
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन झाले. शिवाजी पार्क, शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिक यांचं अतूट नातं होतं. त्याच शिवाजी पार्कवर आपल्या लाखो शिवसैनिकांच्या साक्षीनं बाळासाहेबांनी अखेरचा निरोप घेतला. बाळासाहेबांच्या जाण्यानं शिवसैनिक पोरके झालेत, शिवाजी पार्क सुन्न झाले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं ही शिवसैनिकांकडून इच्छा आहे, अशी माहिती मनोहर जोशी यांनी दिली.
दरम्यान, स्मारकाबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्मारकाबाबत सकारात्मक प्रतिसाद दाखविला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवतीर्थावर लाखोंच्या संख्येनं उसळलेल्या जनसागरानं साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. मातोश्रीवरून काल रविवारी सकाळी ९ वाजता निघालेली बाळासाहेबांची महायात्रा तब्बल सात-आठ तासांनंतर शिवाजी पार्कवर पोहचली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी राज ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंबीय शिवजी पार्कवर हजर होते. बाळासाहेबांच्या अखेरच्या दर्शनानं सारा महाराष्ट्र गहिवरला. शिवतीर्थावर जमलेल्या लाखो नयनांच्या अश्रूंचा बांध फुटला. बाळासाहेबांना अंत्यदर्शनासाठी देशभरातून दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.
शिवसेनाप्रमुखांना निरोप देण्यासाठी वांद्रेच्या कलानगरपासून थेट दादरच्या शिवाजी पार्कपर्यंत सर्व रस्त्यांवर दुतर्फा लाखोंचा जनसागर उसळलेला होता. बाळासाहेबांची एक झलक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पूलावर, इमारतींच्या गच्चींवर जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती.
First Published: Monday, November 19, 2012, 14:03