अमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल, devyani khobragade Clothes descend inquiry

अमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल

अमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल
www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

अमेरिकेतील भारतीय दुतावास कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल भारतामध्ये संतापाची लाट उसळलीय. परंतु तरीही अमेरिकेचा उर्मटपणा अद्याप कमी झालेला नाही. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याऐवजी अमेरिकेने चक्क या कृत्याचं समर्थन केलंय.

अमेरिकेने अट्टल गुन्हेगारासारखी वागणूक दिल्यानं देवयानी खोब्रागडे कोलमडून गेल्यात. अमेरिकेत आपणावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती देणारा ई मेल त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतील आपल्या सहका-यांना पाठवून दिलाय.

या मेलमध्ये त्यांनी म्हटलंय, मुलीच्या समोरच माझ्या हातात बेड्या घालण्यात आल्या. अट्टल गुन्हेगार आणि ड्रग्ज सेवन करणा-या व्यसनी लोकांसोबत मला कोठडीत डांबण्यात आलं. एवढंच नव्हे तर कपडे काढून माझी अंगझडती घेण्यात आली. दुतावास अधिकारी असतानाही अशी वाईट वागणूक देण्यात आली. त्यामुळं मला वारंवार रडू कोसळत होतं. पण त्याही परिस्थितीत मी स्वतःला सावरलं. कारण मी अमेरिकेत भारताचं प्रतिनिधीत्व करतेय.

या प्रकारानंतर अमेरिकेपासून भारतापर्यंत संतापाचा स्फोट झालाय... अमेरिकेच्या उद्दामपणाच्या निषेधार्थ भारतानंही मंगळवारी जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. अमेरिकन दुतावासाबाहेरची सुरक्षा बॅरिकेड्स काढून घेण्यात आली. अमेरिकन दुतावास अधिका-यांना दिलेल्या अनेक सवलतीही रद्द करण्यात आल्या. राज्यसभेतही त्यावरून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार संताप व्यक्त केला.

देवयानी खोब्रागडे या दलित समाजातील असल्यानं सरकारनं कारवाईला उशीर लावला, अशी घणाघाती टीका करत मायावती यांनी नव्या वादाला तोंड फोडलं. तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी यानिमित्तानं अमेरिकेवर तोफ डागली. आता बोलण्याची नव्हे तर करून दाखवण्याची वेळ आलीय, असं ते म्हणाले.

कधी नव्हे ते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही अमेरिकेच्या विरोधात आपलं तोंड उघडलंय. देवयानी यांना देण्यात आलेली वागणूक अत्यंत वाईट आणि निषेधार्ह होती, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केलीय.झाल्या प्रकाराबद्दल अमेरिकेने बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी भारताच्या वतीनं करण्यात आलीय. परंतु अमेरिकेचा उर्मटपणा आणि उद्दामपणा अजूनही संपलेला नाही. देवयानी यांची कपडे काढून अंगझडती घेण्यात आल्याची कबुली अमेरिकेने दिलीय. मात्र एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर जी कारवाई नियमानुसार केली जाते, तीच देवयानी यांच्याबाबतीतही लागू करण्यात आली, अशा शब्दांत अमेरिकेच्या मार्शल सेवेने आपल्या हिणकस कृत्याचं समर्थन केलंय... त्यामुळं अमेरिकेच्या या दादागिरीविरूद्ध भारत पुढचं पाऊल काय उचलणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हि़डिओ

First Published: Wednesday, December 18, 2013, 22:38


comments powered by Disqus