Last Updated: Friday, December 23, 2011, 15:45

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राकडे नवनिर्माण सेनेने दुर्लक्ष्य केलं अशी टीका होते, परंतु ही टीका स्वाभाविक आहे, पक्ष वाढवताना टप्प्याटप्याने पावलं टाकण्याचं मी ठरवलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणुका लढवण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ माझ्याकडे नाही. त्यामुळे मी आता त्या लढवू इच्छित नाही. गेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत एका एका मतासाठी १० हजार रुपये द्यावे लागत होते. तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान, या भागात फेर फटका मारला तर तुमच्या सहज लक्षात येईल. तेवढा पैसा माझाकडे नाही.
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मी ठराविक मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं आणि त्यात १३ जागांवर विजय मिळवला तसंच लोकसभेच्याही फक्त ११ जागा लढवल्या त्यात लाखाच्यावर मतं मिळवली. त्यामुळेच घाई गर्दी न करता महाराष्ट्रात सर्वत्र पोहचण्याचा मानस आहे. अशी वाटचाल करून राज्याची सत्ता काबीज करू.
शर?द पवारांना टोला देशाचे कृषी मंत्री शरद पवारांनी आपल्याला महाराष्ट्रात अधिक दौरा करण्याविषयी सल्ला दिला होता. त्यांना मी एकच सांगतो, आज महाराष्ट्रात जितके पण नेते असतील, त्यात शरद पवारचाही समावेश होतो. ज्यांनी खरोखर महाराष्ट्राच्या तालुका पातळीवर दौरा केला असले, अशा पहिल्या तीन नेत्यांमध्ये माझा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात तालुका पातळीवर मी आजवर पाचवेळा फिरलो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याची भौगोलिक, आर्थिक, कृषी परिस्थिती मला चांगल्या रितीने माहिती आहे. आता हा सल्ला ते सुप्रियाताईंना किंवा अजितदादांना का देत नाही कदाचीत त्यांना त्यांच्याकडून फार अपेक्षा नसाव्यात.
अण्णांना सरकार दाद देणार नाहीअण्णा हजारेंचा मार्ग योग्य असला तरी त्यांच्या उपोषणाला निर्ढावलेली राजकारणी मंडळी दाद देणार नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यासाठी माझाच मार्ग योग्य असल्याचं सांगताना सत्तेत असलेल्या लोकांना त्रास होत नाही तोवर त्यांचे डोकं ठिकाणावर येत नाही.
शेतीला ग्लॅमर हवेशेतीला ग्लॅमर आणि उत्पन्न नसल्याने आजचा तरुण वर्ग त्याकडे वळत नाही. आज सामंत, चौगुले यासारखी मंडळी द्राक्ष बागातून शॅम्पेनच्या निर्मितीत उतरल्यानंतर त्याला एक ग्लॅमर प्राप्त झालं आहे आणि निर्यातीतून पैसेही चांगले मिळू लागल्याने तरुण शेतकरी वर्ग त्याकडे वळू लागला आहे.
आजकाल कोणालाही विचारलं तर त्याला डॉक्टर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचं आहे पण शिक्षक कोणालाही व्हायचं नाही. दुसरं कोणतीही काम जमत नसल्यास कसंतरी डीएड बीएड होऊन सरकारी शिक्षक म्हणून भरती होण्याकडे तरुण वर्गाचा कल आहे. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात दर्जाची घसरण झाली आहे. परदेशात शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोन आदराचा असतो तशी आपल्याकडे परिस्थिती नाही ती निर्माण होणं गरजेचं आहे.
महाविद्यालयीन निवडणुका माझ्यामुळे बंदराज्य सरकारने महाविद्यालयातील निवडणुकांवर बंदी घातल्याने कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया बंद पडली. या संदर्भात मी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याकडे जाऊन या संबंधी मागणी केली होती, पण त्यांनी अर्धी मागणीच मान्य केली. त्यावेळेस महाविद्यालयातील विद्यापीठ प्रतिनिधींना फक्त पाच महिन्यांचा कालावधी मिळतो, तो दोन वर्षांचा करावा अशी मी मागणी केली होती ती मात्र, मान्य झाली नाही. महाविद्यालयातून विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून जाणाऱ्यांना कोणतेही अधिकार नसतात आणि केवळ वेळेचा अपव्यय त्यातून होतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि विद्यार्थिनींना डांबणे, निवडून आलेल्या प्रतिनिधींना पळवणे असे प्रकार सर्रास होतात यातून कार्यकर्ते किंवा नेतृत्व घडत नाही.
मराठी सिनेनिर्मार्त्यांनी पैसा कमवावा
मराठी सिनेमांच्या बाबतीत मराठी सिनेनिर्मात्यांनी यशस्वी सिनेमे काढण्यावर भर दिला पाहिजे. मराठी सिनेनिर्माते एकदम सत्यजीत रे किंवा बिमल रॉय यांच्यासारखे सिनेमा काढण्याचा विचार करतात. ते करण्यापेक्षा चांगले दर्जेदार आणि यशस्वी सिनेनिर्मिती केली पाहिजे. मराठी कलाकार नाक्या नाक्यावर दिसतात. मग त्यांना थिएटरमध्ये जाऊन कोण पाहिल. हिंदीतले आघाडीचे अभिनेते सलमान किंवा शाहरुख हे तुम्हाला कधी सहजासहजी दृष्टीस पडत नाही. ते त्यांच्या कोषात रममाण असतात त्यांनी त्यांच्या भोवती एक वलय निर्माण केलं आहे, हे आपल्या मराठी अभिनेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
सरकार संकल्पना नष्ट करण्याचा डावमहाराष्ट्रातील सत्तेवर असलेल्या प्रत्येकाला सरकार ही संकल्पनाच नष्ट करायची आहे. सरकारने चालविलेल्या शिक्षण संस्था असो किंवा जनतेच्या गरजा भागवणाऱ्या सरकारी संस्था असो या सर्व संस्था बंद करुन तिथे स्वत:ची खासगी संस्थाने निर्माण करायची आहेत. त्यामुळेच आरे सारख्या दुग्ध उत्पादन संस्था बंद करुन त्यांच्या जमिनींची विक्री करुन त्यातून नफेखोरी करताना आजचे सत्ताधारी दिसतात. सरकार शाळा बंद पाडून खासगी शिक्षण संस्थांना उत्तेजन सरकार देत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
हिंदी ही राष्ट्र भाषा नाहीहिंदी ही राष्ट्र भाषा नाही असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. यासंदर्भात गुजरात उच्च न्यायालयानेही निकाल दिला आहे. पंडित नेहरूंना इंग्रजी, डॉ आंबेडकर यांना संस्कृत तर महात्मा गांधींना हिंदी भाषेला राष्ट्र भाषेचा दर्जा दिला जावा असं वाटत होतं. हा तिढा सुटू शकला नाही. महाराष्ट्राची राज भाषा जशी मराठी आहे, तशीच हिंदी ही उत्तर प्रदेशची राजभाषा आहे. त्यामुळे हिंदी राष्ट्र भाषा असल्याचं प्रचार हिंदी भाषिक करतात तो साफ चुकीचा आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारचा उल्लेख राष्ट्र गीतात नाही आधी त्यांनी स्वत: राष्ट्रगीतात स्थान मिळवावं मग बोलावं. हिंदी भाषिक दोन तीन हजार मैलांवरून येऊन मुंबईत दादागिरी करत असतील तर ती खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी कोणताही संघर्ष करण्याची आपली तयारी आहे.
माझ्या आंदोलनानंतर मराठीचा दरारा माझ्या आंदोलनानंतरच आता सिनेसृष्टीतील लोक मराठी शिकू लागली आहेत. अमीर खानने मराठी शिकलं की नाही, का हो यापूर्वी राजेश खन्ना शिकला नाही, किंवा अमिताभ बच्चन शिकला नाही. अक्षय कुमारला मराठी येत होतं ना, मग तो आत्ताच का बोलायला लागला आहे. थोडंस खळ्ळ आणि खट्याक केल्यानंतरच त्यांना त्यांची डोकं ठिकाणावर येतात. आता पाहा ना, सेलफोनवर मराठी ऐकू येऊ लागलं आहे ना?.
कोणतीही भाषा शिकण्यात गैर नाहीकोणतीही भाषा ती परकीय असली तरी ती आत्मसात करण्यात काय गैर आहे, असं सवालही राज ठाकरे यांनी केला. आपल्या वडिलांचे उर्दूवर असामान्य प्रभूत्व होतं, त्यामुळेच मोहम्मद रफीला त्यांनी मराठी गाणं उर्दूत लिहून दिलं आणि शिकवलं. त्यामुळे भाषा कोणतीही असली तरी तिच्यावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. मराठीत काय कमतरता आहे म्हणून आपण तिला नाकरायचं.
शब्दांकन - मंदार मुकुंद पुरकर
First Published: Friday, December 23, 2011, 15:45