गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला शानदार सुरूवात , Goa Marathi Film Festival

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला शानदार सुरूवात

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला शानदार सुरूवात
www.24taas.com, झी मीडिया, पणजी

चंदेरी दुनियेचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या सहाव्या झी 24 तास गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला पणजीत शानदार सुरूवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. महोत्सवाला मराठी कलाक्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित होते.

गोव्याची राजधानी पणजीत मराठी सिनेमांचा मेळा भरलाय... सिनेसंस्कृती विकसित करण्यासह रसिकांना दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद घेता यावा यासाठी गोवा सरकार, कला अकादमी आणि विन्सन वर्ल्डच्या वतीनं पणजीत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतो.

यंदापासून या महोत्सवाचं नामकरण झी 24 तास चित्रपट महोत्सव असं करण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि विधानसभा सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्या उपस्थितीत चित्रपट महोत्सवाचं उदघाटन झालं....गोव्यात भव्य चित्रपटनगरी उभारावी असं मत यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

उदघाटनानंतर प्रेमसूत्र या सिनेमानं महोत्सवाची सुरुवात झाली. आपल्या दमदार अभिनयानं रसिकांच्या काळजात अढळ स्थान प्राप्त केलेल्या अभिनेते विक्रम गोखले यांना यावेळी कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं...
या महोत्सवाच्या निमित्ताने पणजीत मराठी कलाकारांची मांदियाळी भरलीय.

उदघाटन सोहळ्यात सादर करण्यात आलेल्या रंगतदार कार्यक्रमानं महोत्सवाची रंगत वाढवली. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात १६ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळं हा सिनेमांचा महामेळा रसिकांना मनोरंजनाची ट्रीट देणारा ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 29, 2013, 15:17


comments powered by Disqus