Last Updated: Monday, December 10, 2012, 16:54
www.24taas.com, मुंबईप्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचा मुलगा गुरदीप अभिनेता बनून सिनेमातून पदार्पण करत आहे. ‘मेरी शादी करवाओ’ या सिनेमातून गुरदीप हिरो बनून बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. मात्र सिनेमात अभिनेता म्हणून जरी येणार असला, तरी गुरदीप आपल्या धर्माचं पालन करत पगडी सोडणार नाही आणि दाढी मिशीलाही कात्री लावणार नाही.
“प्रथमच हिंदी सिनेमामध्ये कुणी खरा सरदार हिरोच्या भूमिकेत पाहायला मिळेल. अनेक कलाकारांनी सरदारजी हिरोची पात्रं रंगवली, तरी त्यातील कुणीच खरे सरदार नव्हते. मात्र मी बॉलिवूडमधला ओरिजिनल सरदार हिरो असेन. मी बॉलिवूडमध्ये शीख समाजाचा खरा प्रतिनिधी असेन.” असं गुरदीपने सिनेमाबद्दल बोलताना सांगितलं.
२३ वर्षीय गुरदीप आपल्या पहिल्या सिनेमाबद्दल खूप उत्तेजित झाला आहे. या सिनेमात दलेर मेहंदीचं संपूर्ण खानदानच सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. “या सिनेमात मी प्रमुख भुमिकेत आहेच. पण माझी आई देखील या सिनेमात छोट्या भुमिकेत पडद्यावर झळकेल. माझ्या धाकट्या बहिणीने या सिनेमामध्ये गाणं गायलं आहे. मी देखील या सिनेमात ४ गाणी गायली आहेत. पण मी कधीही गायलो, तरी माझी तुलना माझ्या वडिलांशी केली जाते. त्यामुळे मी गायनाऐवजी अभिनयाकडे वळलो.” असं गुरदीप म्हणाला.
गायकी ही त्याच्या घराण्यात असली, तरी गुरदीपला मात्र अभिनयाचे वेध लागले आहेत. त्यामुळे लवकरच आपल्याला पडद्यावर खरा ‘सन ऑफ सरदार’ पाहायला मिळणार आहे.
First Published: Monday, December 10, 2012, 16:54