जियाची आत्महत्या नाही तर हत्या, Jiah Khan suicide case: Mother moves Bombay HC, says daughter was murdered

जियाची आत्महत्या नाही तर हत्या; आईचा दावा

जियाची आत्महत्या नाही तर हत्या; आईचा दावा

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा आरोप जियाची आई राबिया खान यांनी केलाय. त्यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून सीबीआय तपासाची मागणी केलीय.

राबिया खान यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळालंय. जियाच्या आईनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेत राबिया खान यांनी जियाची हत्या झाल्याचा दावा केलाय. जियाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केलीय.
जियाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, जियानं गळफास लावून आत्महत्या केली असती तर तीची जीभ आणि डोळे बाहेर आले असते. परंतु, जियाचा मृतदेह पाहून अशा कोणत्याही गोष्टी दिसून आल्या नाहीत. यासोबतच जियाच्या वकिलांनी आणखीही काही कारणं दिली आहेत, ज्यामुळे जियाचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला जातोय. वकिलांच्या म्हणण्यानुसार, जियाच्या गळ्यावर फाशीचे वळ सरळ होते. तीनं आत्महत्या केली असती तर हेच निशाण गोलाकार आकारात असतं.

जियाच्या आईच्या म्हणण्यानुसार, जियासोबत अगोदर मारहाण करण्यात आली होती त्यानंतर तीची हत्या करण्यात आली. ज्या रुममध्ये जियाचा मृत्यू झाला त्या रुममध्ये एसी सुरू होता आणि खिडक्या उघडलेल्या होत्या. या रुममध्ये कुणीतरी प्रवेश केल्याचा अंदाजा होता परंतु पोलिसांनी याकडे लक्ष दिलं नाही.

जियाच्या आईच्या म्हणण्यानुसार, गळफास लावण्यासाठी स्टुलाची आवश्यकता होती, परंतु घरात तर स्टुल उपलब्धच नव्हता. याशिवाय घरात दोन ठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले होते परंतु पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष करत हे नमूनेही तपासणीसाठी घेतले नाहीत.

वकिलांच्या म्हणण्यानुसार, जियानं घरी परतल्यानंतर ट्रॅक पॅन्ट परिधान केली होती परंतु तीचं शव मात्र नाईटीमध्ये सापडलं. यावेळी जियाच्या गळ्यावर, खांद्यावर आणि हातांवर जखमाही सापडल्या होत्या.

३ जून रोजी जिया खान हिचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करताना जियानं आत्महत्या केल्याचं नमूद केलं होतं. या प्रकरणात जियाचा मित्र सूरज पांचोली याला पोलिसांनी अटकही केली होती. सूरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, October 4, 2013, 18:40


comments powered by Disqus