Last Updated: Monday, September 16, 2013, 15:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईजेव्हा बॉलिवूडमध्ये भयपट बनतात, तेव्हा ते भीतीदायक कमी आणि हास्यास्पद जास्त असतात. रामसे ब्रदर्सच्या चित्रविचित्र भुताटकी पाहिल्यामुळे भारतीय प्रेक्षक हॉलिवूडचे भयपट पाहातात. मधल्या काळात राम गोपाल वर्माने चांगले भयपट निर्माण केले होते. मात्र त्यातही तोचतोचपणा आला. सध्या विक्रम भट्ट चांगले भयपट बनवत आहे. १९२०, १९२० रिटर्न्स, हॉण्टेड सारख्या भयपटांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता रिलीज झालेला `हॉरर स्टोरी` हा सिनेमाही प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी होईल.
`हॉरर स्टोरी` सिनेमा सात तरुणांची कथा आहे. अचिंत (निशांत मलकानी), मंगेश (रवीश देसाई), सम्राट (हसन झैदी), मॅगी (अपर्णा बाजपेयी), नीना (राधिका मेनन), सोनिया (नंदिनी वैद) आणि नील (करण कुंद्रा) हे जुने कॉलेज फ्रेंड्स बऱ्याच वर्षांनी एकत्र येतात. करिअरसाठी परदेशी चाललेल्या नीलची ती भारतातली शेवटची रात्र असते. यावेळी टीव्हीवर एक हॉटेल भुताटकीच्या वास्तव्यामुळे बंद केल्याची बातमी मित्रांना समजते. तेव्हा आव्हान म्हणून या बंद करण्यात आलेल्या मंतरलेल्या हॉटेलात घुसखोरी करतात. मात्र त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं, की ती रात्र त्यांच्या आयुष्यातली सर्वांत भयानक रात्र असते... कदाचित शेवटचीही...
झपाटलेल्या हॉटेलमध्ये अडकलेले सात तरुण तरुणी... हे भयपटासाठी चांगलं कथानक आहे. आयुष रैना या नवोदित दिग्दर्शकाने यशस्वीपणे या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमातील अनेक प्रसंगांमुळे बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहातो. पाहाताना दरदरून घामही फुटतो. या सिनेमात अनेक ठिकाणी पार्श्वसंगीत, शांतता आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांच्यामुळे काळजाचे ठोके चुकतात. तुम्हाला जर भीती वाटून घेण्याची आवड असेल, तर हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 15, 2013, 18:48