Last Updated: Thursday, June 28, 2012, 16:03
www.24taas.com, नवी दिल्ली बॉलिवूडमधली लग्नाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आणि सर्वात जास्त चर्चेत राहणारी आणखी एका जोडीनं अखेर आपल्या लग्नाची तारीख जाहीर केलीय. ही जोडी आहे... करिना कपूर आणि सैफ अली खान... येत्या १६ ऑक्टोबर रोजी हे दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. तसंच लग्नानंतर बेबोनं धर्मपरिवर्तन करण्याची गरज नाही, असं सैफ अली खाननं म्हटलंय.
पण या लग्नानंतर करिना मात्र आपल्या सासूच्या पावलावर पाऊल ठेवणार नाही. हिंदू बंगाली असलेल्या शर्मिलानं मन्सूर अली खान यांच्या लग्न करताना इस्लाम धर्म स्विकारला होता. तसंच आपलं नाव बदलून आएशा बेगम ठेवलं होतं. पण, बेबो मात्र लग्नानंतर आपला धर्म बदलणार नाही. तिचा भावी पती सैफ अली खानलाही तेच वाटतंय. ‘मलाही करिनानं आपला धर्म बदलावा असं मलाही वाटत नाही. त्यामुळे धर्मांचा गुंता आणखी वाढतो आणि माझा त्यावर विश्वासही नाही. जेव्हा कधी आम्ही लग्न करू, आमच्यापैकी कुणीही धर्मांतर करणार नाही’ असं सैफू म्हणतो.
असं म्हणतानाच सैफ आणि करिना दोघंही लग्नाची बातमी मीडियापासून दूर ठेवणंच पसंत करतायत. पण पतौडी संस्थानाच्या आप्तेष्ठांकडून मात्र या बातमीला दुजोरा मिळालाय. येत्या १६ ऑक्टोबर रोजी करिना आणि सैफ यांचा विवाह सोहळा ‘पतौडी पॅलेस’ मध्ये रजिस्टर पद्धतीनं होईल. रिसेप्शन मात्र मुंबईत होईल.
हे तर जाहीर आहे की, लग्नामध्ये आपल्या भावी सासूचा (शर्मिला टागोर) शरारा परिधान करण्यासाठी बेबो कधीही ‘नाही’ म्हणणार नाही. हाच शरारा शर्मिला यांनी ४३ वर्षांपूर्वी आपल्या लग्नात वापरला होता. यावर बी-टाऊनला प्रश्न पडलाय तो असा, की हा शरारा बेबो कुठे कुठे अल्टर करून घालणार. याचं उत्तर बेबोच्या भावी सासूनच दिलय. करिना या शराऱ्यात काहीही बदल किंवा अल्टरेशन न करता तो परिधान करणार असल्याचा दावा शर्मिलानं केलाय. यासाठी करिनाचा मित्र आणि डिझायनर मनिष मल्होत्रा (याच मनिषनं करिष्मा कपूरच्या लग्नाचा ड्रेस डिझाईन केला होता) याला बरीच कसरत करावी लागेल असंच दिसतंय.
First Published: Thursday, June 28, 2012, 16:03